भाष्य : उघडी आहे मस्कची मूठ

माधव गाडगीळ
बुधवार, 5 जून 2019

आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया.

आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया.

चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक कवितेची सुरवात होते ः बया, उदासी बाई, आता उठवा इथुनी ठाणे, मज बघवेना हे मुख तुमचे सदैव ओखटवाणे! सभोवतीच्या निसर्गाची नासाडी पाहून, पृथ्वीच्या भडकणाऱ्या तापमानाच्या काळजीने चूर होऊन आज जगात अगणित चिंतोपंत उदासीन झाले आहेत. पण जगात असेही रंगराव आहेत, की ज्यांना वाटते की हताश होऊन काय फायदा? आपण आशावाद जागा ठेवून, वास्तवाचे आव्हान स्वीकारत जिद्दीने, उत्साहाने झगडत राहूया. एलॉन मस्क हे या पंथातले एक मोठे कर्तबगार तंत्रज्ञ आहेत. ते मानतात की तंत्रज्ञानाची घोडदौड चालू राहणारच, जोडीने अर्थव्यवस्थाही बदलत राहणार, अन्‌ याचे निसर्गावर आघात होत राहणारच. पण आपण आपल्याकडून तंत्रज्ञानाची आगेकूच योग्य दिशेने होत राहील यासाठी नक्कीच झटत राहू शकतो. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे आणि मस्क आज प्रत्यक्षात खूप काही ठोस करून दाखवताहेत.

जगातल्या धनिकांमध्ये मस्क चाळिसाव्या क्रमांकावर आहेत. पण त्यांना जास्तीत जास्ती पैसा कमावत बसायचे नाही आहे. ते कट्टर लोकशाहीवादी, समतावादी आहेत. मूठभर लोकांच्या हातात आर्थिक, राजकीय, तंत्रज्ञानावरच्या प्रभुत्वाची सत्ता एकवटता कामा नये, अशी त्यांची धारणा आहे; त्यांचा आग्रह आहे की धनदांडग्यांवर भरपूर कर लादावेत. त्यांची महत्त्वाकांक्षा आहे पृथ्वीवर शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्याची आणि इतर ग्रहांवर मानवी वसाहती पसरवण्याच्या दिशेने काही तरी भरघोस करून दाखवण्याची. त्यांच्यात असे खूपसे काही करून दाखवण्याची कर्तबगारी आहे, असे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. ते भौतिकशास्त्राच्या जोडीला आधुनिक संगणकशास्त्रातील, विशेषतः यंत्रबुद्धी, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रातील नवे आकलन वापरत नावीन्यपूर्ण, प्रभावी तंत्रे विकसित करू शकतात. मानवी वसाहती इतर ग्रहांवर पसरवण्यासाठी चांगली रॉकेट पाहिजेत. तेव्हा त्यांनी ‘स्पेस एक्‍स’ नावाची कंपनी स्थापली. स्वस्तात उच्च दर्जाची रॉकेट बनवायला काय करायला हवे? एकदा उडवलेले रॉकेट पुन्हा वापरता आले पाहिजे. इतर तज्ज्ञांच्या मते हे अशक्‍य होते. पण कल्पक मस्कने हे प्रत्यक्षात आणून दाखवले. २०१७ मध्ये ओळीने सोळा वेळा ‘स्पेस एक्‍स’च्या ‘फाल्कन’ मालिकेतील पहिल्या टप्प्याचे रॉकेट यशस्वीरीत्या खाली उतरवून पुन्हा वापरले गेले. त्यांना दुसरा ध्यास आहे शाश्‍वत विकासाचा, विशेषतः वाहतुकीच्या शाश्‍वत प्रणालींचा. तेव्हा ऊर्जेसाठी कोळसा, पेट्रोल, डिझेलचा वापर थांबवून सौरऊर्जेवर भिस्त ठेवली पाहिजे, या दिशेने त्यांनी दोन उद्योग सुरू केले आहेत; सौर कोष, सोलर सेल बनवण्यासाठी ‘सोलर सिटी’ आणि विजेवर चालणाऱ्या मोटारगाड्या बनवण्यासाठी ‘टेस्ला’. हे दोन्ही उद्योग कमीत कमी साधनसामग्री वापरत, नेटकी रचना करून गुणसंपन्न उत्पादने घडवत भरभराटीला आले आहेत. सौरऊर्जेवर पूर्ण अवलंबून राहणे अशक्‍य आहे, असा प्रचार केला जातो. त्याला उत्तर देण्यासाठी मस्कने सामोआ द्वीपसमूहातील ६०० वस्तीचे बेट निवडले. तेथे डिझेल जाळत वीज पुरवली जायची आणि वीजपुरवठा तुटत राहायचा. आता हे संपले आहे; सगळ्या घरांवर सौर कोषांची छपरे बसवली आहेत, सगळ्या मोटारगाड्या विजेवर चालतात आणि सूर्य तीन-तीन दिवस ढगाआड गेला, तरी आयुष्य सुरळीत चालू राहते.

चार वर्षांपूर्वीपर्यंत मस्क नावीन्यपूर्ण तंत्रावर पेटंट घेत होते. पण त्यांनी ठरवले की पेटंटशिवाय कोणीच नावीन्यपूर्ण तंत्रे शोधून काढणार नाही, हे बिलकुल खरे नाही. बिल गेट्‌सच्या सगळ्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवर मक्तेदारी प्रस्थापित करत, ते आपल्या घट्ट मुठीत बंद करून ठेवण्याच्या खटपटीच्या विरोधात उभे राहिलेले खुले, सहकाराधिष्ठित ‘ओपन सोअर्स’ सॉफ्टवेअर हे असे काहीही संरक्षण नसताना झपाट्याने प्रगती करत आहे. आपण याचेच अनुकरण करूया. डिसेंबर २०१४ मध्ये टेस्ला कंपनीने आपली सर्व पेटंट ‘ओपन सोअर्स’च्या तत्त्वानुसार खुली केली. ‘ओपन सोअर्स’चे तत्त्व काय आहे? परिपूर्ण ज्ञानासह मूळ स्रोतासह - सोअर्स कोडसह - सगळे सर्वांना विनामूल्य उपलब्ध असणार. ते खुशाल वापरावे, बदलावे, सुधारावे. मात्र अशा ‘ओपन सोअर्स’च्या आधारावर काहीही नवे निर्माण केले, तर ते पेटंट करता येणार नाही, निर्माणकर्त्याने ते सर्वांना खुलेपणे उपलब्ध करून दिले पाहिजे. आजच्या ज्ञानयुगात मुठी बंद ठेवण्याचा अट्टहास सोडून दिला पाहिजे. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ असा पंथ स्वीकारला पाहिजे.  मस्क अचाट कर्तृत्वाचे, उच्चशिक्षित तंत्रज्ञ आहेत; ते समाजासाठी जे काय करून दाखवू शकतात ते फारच थोड्यांना साध्य आहे. परंतु, आजच्या भडकत्या आर्थिक विषमतेच्या जगात ज्ञानविश्‍वातील विषमता मात्र झपाट्याने घटते आहे. सध्याच्या स्मार्टफोनच्या युगात माहिती, ज्ञान अगदी सामन्यातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोचते आहे. लोकांच्या दबावाने सरकारला आपली झाकली मूठ उघडायला लागून माहिती हक्काचा कायदा अमलात आणावा लागला आहे. या चळवळीचे अध्वर्यू अण्णा हजारे ग्रामीण मुलुखातील एका साध्या कुटुंबात जन्मले, केवळ सातवीपर्यंत शिकू शकले. पण त्यांनी कोणीही भारतीय व्यक्ती कर्तृत्वाच्या, जिद्दीच्या बळावर समाजासाठी मोठे योगदान करू शकते, हे सिद्ध केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सामूहिक वनहक्क मिळालेल्या ग्रामसभांनी त्यांच्या गावांतून पाठवलेल्या २७ तरुण-तरुणींना पाच महिन्यांचे प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमात मी नुकताच भाग घेतला. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही त्यांना माहिती हक्क कायद्याची व्यवस्थित माहिती दिली आणि गृहपाठ म्हणून या कायद्याअंतर्गत त्यांच्या व त्यांच्या ग्रामसभांच्या एखाद्या जिव्हाळ्याच्या विषयावर माहितीसाठी अर्ज करा म्हणून सांगितले. अनेकांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या खर्चाचा तपशील मागितला. सामान्यतः हा तपशील दडपून सरपंच व ग्रामसेवक संगनमताने गैरव्यवहार करतात. माहिती हक्काचे अर्ज आल्यावर ग्रामसेवकांनी त्यांना उडवून लावण्याचा प्रयत्न केला, पण कायद्याच्या पक्‍क्‍या माहितीच्या आधारावर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दाद दिली नाही. आता ते सांगत आहेत की सगळ्याच्या सगळ्या गावांत सरपंच, ग्रामसेवक मऊ झाले आहेत. पैसे ग्रामस्थांना हवे तसे खर्च होण्याची शक्‍यता दिसते आहे. आज गडचिरोलीतल्या दुर्गम खेड्यांतसुद्धा कोणा ना कोणाच्या हाती स्मार्टफोन आहे, त्यावर मराठी वापरण्याची उत्तम सुविधा आहे. ते त्याचा वापर करत आपापल्या जिव्हाळ्याच्या माहितीचा सतत मागोवा घेत आहेत. विशेषतः त्यासाठी ‘गुगल सर्च’ मारत आहेत. अशा सर्चमध्ये मराठी विकिपीडीयातले लेख विश्‍वसनीय म्हणून अग्रक्रमाने दिसतात. आपण सगळे तऱ्हतऱ्हेची समाजोपयोगी माहिती सोप्या भाषेत मराठी विकिपीडीयातल्या लेखात, किंवा सचित्र सादरीकरणाच्या रूपात ‘यू-ट्यूब’वर चढवू शकू आणि समाजासाठी अल्पसे का होईना योगदान करून आजच्या ज्ञानयुगात आपल्या परीने खारीचा वाटा उचलू शकू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhav gadgil write technology Knowledge article in editorial