भाष्य : संतप्त समिंदर, भडकति वारे

निसर्ग चक्रीवादळात सहा जण मृत्युमुखी पडले होते. ‘तौक्ते’मुळे भारतीय भूमीवर २५० व पाकिस्तानात पाच जण मरण पावले. पण ‘तौक्ते’चे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रातले हाहाकार.
Sea Waves
Sea WavesSakal

‘तौक्ते’ची खासियत ठरलेले समुद्रातले हाहाकार तराफ्यांच्या मालकांच्या भराभर तेल उपसत राहून पैसे कमावण्याच्या लालचीची निष्पत्ति होती. आता जागे होऊन आपण संयमशील नॉर्वेच्या समाज कल्याणकारी राजवटीचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षी तीन जूनला निसर्ग आणि यंदा १७ मेला तौक्ते. हे काय चालले आहे? हे आहेत एका बाजूने पृथ्वी अधिकाधिक गतीने तापत असण्याचे परिणाम, आणि दुसऱ्या बाजूने भारतात आज राबत असलेल्या विकृत विकास वासनेच्या वक्रगतीचे चक्राकार आविष्कार. आज जगाचे वातावरण सुमारे एक अंश सेल्सिअसने गरम झाले आहे. पाणी हवेपेक्षा सावकाश तापते. याशिवाय सागरात पाण्याचा प्रचंड साठा आहे. तरीही आता हा जलनिधी इतका तापला आहे, की त्यातून मोठे बदल होऊ लागले आहेत. गेली काही वर्षे अरबी समुद्रावर चक्रीवादळे येण्याचे प्रमाण वाढत होते, परंतु तीव्र चक्रीवादळे आपल्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे जात होती. गेल्या वर्षी प्रथमच ‘निसर्ग’ हे तीव्र चक्रीवादळ आपल्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकले. याची पुढची पायरी म्हणजे तौक्ते हे अतितीव्र चक्रीवादळ आहे. परिणामी तौक्तेमुळे ‘निसर्ग’हूनही मोठ्या प्रमाणात जीविताची, मालमत्तेची हानी झाली आहे.

आनंदी देशाचे उदाहरण

निसर्ग चक्रीवादळात सहा जण मृत्युमुखी पडले होते. ‘तौक्ते’मुळे भारतीय भूमीवर २५० व पाकिस्तानात पाच जण मरण पावले. पण ‘तौक्ते’चे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रातले हाहाकार. मुंबईपासून १७५ किलोमीटरवर खम्बायतच्या आखातात ७५ मीटर खोलीच्या पाण्यात समुद्र तळावर तेलाचा प्रचंड साठा आहे. त्या भागात अनेक तराफे नांगर टाकून उभे ठाकतात आणि दिवसेंदिवस समुद्रतळ खोदून, तेल ओढून घेतात. असे अनेक तराफे तौक्ते चक्रीवादळाच्या तावडीत सापडले, आणि त्यात निदान ७५ जण दगावले. या उप्पर मोठे आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच. खरे तर त्यांचे असे तावडीत सापडणे अक्षम्य होते. आजच्या इंटरनेटच्या युगात आपल्या सर्वांनाच तौक्ते चक्रीवादळाच्या मार्गक्रमणाची, तीव्रतेची माहिती सहज उपलब्ध होती. तेल उपसणाऱ्या तराफ्यांना ती अगदी वेळेवर पुरवली होती. तराफ्यांवरच्या खुलाशांना आपल्या जिवाची काळजी होती; पण त्यांनी विनवण्या केल्या तरी कप्तानांनी, मालकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले, असे आरोप केले जाताहेत. असे दुर्लक्ष का केले? या मागे आहे गौतम बुद्धांच्या शब्दात तृष्णा – लोभ, हव्यास, लालच. भराभर तेल उपसत राहून आणखी आणखी पैसे कमावण्याची हाव. गौतम बुद्ध सांगतो हे जग दुःखमय आहे, आणि त्याचे कारण आहे मानवाची तृष्णा. पण लोभावर मात करणे अशक्य नाही. याचे उत्तम उदाहरण आहे नॉर्वे देश. नॉर्वेलगतच्या समुद्रतळावर तेलाचा असाच प्रचंड साठा आहे. पण नॉर्वेला तो भराभर उपसून संपवायची इच्छा बिलकुल नाही. त्यांनी हा साठा सावकाश किती वर्षात संपवावा, याचा हिशोब केला आहे. त्यातून दरवर्षी मिळतो तितका नफा देशाच्या तमाम नागरिकांच्या हितासाठी कायमस्वरूपी मिळत राहावा, अशी त्यांची योजना आहे. दर वर्षी मिळणारा नफा ते जगातल्या वेगवेगळ्या निधींत गुंतवताहेत आणि यावरचे व्याज देशाच्या नागरिकांना मोफत शिक्षण, आरोग्य व इतर सेवा पुरवण्यासाठी वापरताहेत. दरवर्षी अशी गुंतवणूक वाढते आहे आणि अखेर तेल संपेल तेव्हा ती इतकी पुरेशी असेल की त्यावरच्या व्याजातून नॉर्वे आपल्या नागरिकांना चिरकाल मोफत शिक्षण, आरोग्य व इतर सेवा पुरवत राहील. अशी आहे लोभ बाजूला सारून सर्व नागरिकांची हित साधण्याची आदर्श योजना. यातून नॉर्वे जगातला एकाच वेळी सर्वात अधिक दरडोई उत्पन्न असलेला, औद्योगिकदृष्ट्या प्रगत, पर्यावरण सांभाळण्यात अग्रस्थानावर आणि सर्वात आनंदी देश बनला आहे. आपण त्यांच्याकडून बरेच काही शिकू शकतो. शिकलो तर ‘तौक्ते’मुळे समुद्रातल्या तराफ्यांवर झाल्या तशा दुर्घटना टाळता येतील.

समुद्रातून पुन्हा जमिनीकडे वळू या. पश्चिम किनाऱ्यावरच सगळीकडे ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे नियम डावलून बेकायदा इमारतींच्या, महामार्गांच्या बांधकामांचे पेव फुटले आहे. लोकांना बिलकुल नको असे गोव्यातल्या वास्को-द-गामा, कर्नाटकातल्या तदडी, केरळातल्या व्हिळिंगजम बंदरांचे प्रकल्प रेटले जाताहेत. हे सगळे बांधकाम, बंदरे, महामार्ग पुढच्या दहा-वीस वर्षांत जमीनदोस्त होण्याचा धोका आहे. कारण निसर्ग पहिले आणि ‘तौक्ते’ दुसरे असले तरी संतप्त सागराचे पश्चिम किनाऱ्यावरचे हे फटकारे वर्षानुवर्षे अधिकाधिक भडकत राहणार आहेत. या सगळ्यातून प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. त्याची भरपाई कशी होईल, ह्याची कल्पनाच करवत नाही. तेव्हा हे सगळे आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, असे म्हणणे हे वास्तवाचे विपरीत विडंबन आहे. ह्यातून केवळ मुठभर धनिकांना पैशाचा लाभ होतो आहे. ही मंडळी आपला काळा पैसा स्वित्झर्लंडच्या बँकांत ठेवतात. भारतात मात्र गरिबी हटलेली नाही आणि समाजातील वैमनस्य सतत वाढते आहे. हा कसला विकास? मग काय करायला हवे? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किनारपट्टीचे संरक्षण कवच पुन्हा प्रस्थापित करायला हवे.

जिथे नद्या, ओढे समुद्राला मिळतात तिथल्या चिखलाट जमिनीत खारफुटीची राने फोफावतात. ही खारफुटी समुद्राच्या लाटांचा हल्ला पेलतेच; पण त्याबरोबर तिथे मासे, झिंगे, शिंपले पोसले जातात. सगळीकडे या खारफुटीचा विध्वंस चालू आहे. नेहमीच्या सरकारी पद्धतीप्रमाणे अनेक ठिकाणी ही अस्तित्वात नाहीच, असे दाखवले जाते. आज उपग्रहाच्या चित्रावर खारफुटी सहज ओळखता येते. यातले काही जाणकार शास्त्रज्ञ माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटले, की सरकारी कागदोपत्री पेणच्या किनाऱ्यावर खारफुटी नाहीच, असे दाखवले आहे. पण ती तुम्हालाही स्पष्ट दिसत असणारच. ते म्हणाले, की हो स्पष्ट दिसते; पण सरकारचे नम्र सेवक असल्यामुळे आम्ही नाईलाजाने `ती तिथे नाही’ च्या नाटकात सामील होतो. जिथे नाकारणे अशक्य असते तिथे पर्यावरण खात्याचे माननीय मंत्री म्हणतात, ‘ही तोडली तर काय बिघडते, आम्ही त्याच्या दसपट झाडे दुसरीकडे, कुठल्या तरी वैराण माळांवर लावणार आहोत.’ ते विसरतात की निसर्गात वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे विशिष्ट स्थान असते तिथून त्या नष्ट करून त्याची भरपाई अजिबातच करता येत नाही. अशी दसपट भरपाई म्हणजे एक दुभती जाफराबादी म्हैस जप्त करून तिच्या जागी शेतकऱ्याला १० सशाची पिल्ले देण्यासारखे आहे.

काही समुद्रकिनारे खडकाळ असतात, काही ठिकाणी रेतीची पुळण असते. तिथे खारफुटी नसते. पण ब्रिटिशपूर्व काळात गावसमाजांनी या सर्व प्रकारच्या किनाऱ्यांना लागून उंडीच्या झाडांची एक तटबंदी उभारलेली होती. हा साठ फुटांपर्यंत उंच होणारा वृक्ष डोलकाठीसाठी खास उपयोगाचा आहे. तेव्हा इंग्रजांनी कब्जा केल्या- केल्या किनाऱ्याजवळची ही तटबंदी आपल्या आरमारासाठी ओरबाडत तोडून टाकली. आता पुन्हा खारफुटी वाढवली पाहिजे, उंडीच्या झाडांची तटबंदी पुन्हा किनाऱ्याला लागून उभारली पाहिजे, आणि अशा निसर्गाच्या पुनरुज्जीवनाच्या उपक्रमांतून सर्वसामान्य जनतेला रोजगार पुरवला पाहिजे. हा असेल खराखुरा सबका साथ – सबका विकास.

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com