मतदारांच्या पोटातले...

महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांतील पोटनिवडणुका दोघांसाठीही महत्त्वाच्या होत्या
पोटनिवडणुका
पोटनिवडणुका sakal

कोणत्याही पोटनिवडणुकांमधून देशभरातील जनमताचा कल काय, याविषयीचा निष्कर्ष काढता येत नाही, हे खरेच. तरीही अवघ्या दीड-पावणेदोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल राजकीय पक्षांना काही ना काही संदेश देऊन जातात, हे नक्की. देशातील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षाबरोबरच विरोधकांसाठीही दिशादर्शक आहेत. त्यातही महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांतील पोटनिवडणुका दोघांसाठीही महत्त्वाच्या होत्या.

त्याचे कारण म्हणजे या दोन राज्यांत अलीकडेच झालेल्या सत्तांतराची पार्श्वभूमी या पोटनिवडणुकांना होती. महाराष्ट्रात अंधेरी (पूर्व) या मतदारसंघात झालेली निवडणूक शेवटच्या क्षणी भाजप उमेदवाराने मोठ्या नाट्यपूर्ण रीतीने घेतलेल्या माघारीनंतर केवळ लुटुपुटीचीच होती आणि त्यात अपेक्षेप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला आहे; तर बिहारमधील मोकामा मतदारसंघ लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने जिंकला असला तरी गोपाळगंज येथे मात्र भाजपच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. गोपाळगंज जिल्हा हा लालूप्रसादांचा जिल्हा असल्याने, या यशामुळे भाजप आता आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक जोमाने कामास लागणार, हे उघड आहे.

या दोन राज्यांतील तीन जागांच्या पोटनिवडणुकांबरोबरच तेलगंणातील निवडणुकीकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्या राज्यात भाजप तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार खरेदी करू पाहत असल्याच्या आरोपांनंतर उभ्या राहिलेल्या वादंगात होते. तेथे भाजपच्या उमेदवाराने ज्या शर्थीने झुंज दिली, ती बघता आता तेथील राजकारण बदलू पाहत आहे, याची साक्ष मिळते. तेलंगणांत आजवर ‘टीआरएस’ आणि काँग्रेस यांच्यातच लढत होत असे. मात्र, आता भाजप तेथे दुसरे स्थान मिळविण्याचा अटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात गोला गोकर्णनाथ येथील जागा भाजप न जिंकता तरच नवल म्हणावे लागले असते. त्याचबरोबर हरयाना आणि ओडिशा येथेही मिळालेले विजय भाजपसाठी महत्त्वाचेच आहेत. एकंदरित या निकालांत भाजपला मोठे यश मिळाल्याचे दिसत असले, तरी विरोधकांची पतही किमान काही प्रमाणात राखली गेली आहे.

शिवसेनेत मोठी फूट पाडून, भाजपने घडवून आणलेल्या सत्तांतराच्या महानाट्यानंतर अंधेरीत झालेल्या या पोटनिवडणुकीकडे राजकीय निरीक्षकच नव्हे तर सर्वसामान्य मतदार तसेच शिवसैनिकही डोळे लावून होते. ऋतुजा लटके यांना उमेदवारीच मिळू नये, म्हणून हाती असलेल्या सर्व स्तरांवरील यंत्रणांचा वापर भाजपने केल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, उच्च न्यायालयानेच लगावलेल्या चपराकीनंतर अखेर ही लढत श्रीमती लटके विरुद्ध भाजप अशी होणार, हे स्पष्ट झाले. त्यानंतर भाजपला काय साक्षात्कार झाला, ते अयोध्येतील रामच जाणे! नंतरच्या अवघ्या २४ तासांत राज ठाकरे यांनी एक खुले पत्र लिहून भाजपला महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची आठवण करून दिली आणि अखेर शेवटच्या क्षणी भाजपने उमेदवारी मागे घेतली. तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिष्ठेच्या म्हणून गणल्या गेलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी पदरी पराभव येऊ नये म्हणूनच भाजपने माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.

मात्र, भाजपने माघार घेतल्यानंतरही काही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक ही झालीच; आणि त्यात अपेक्षेप्रमाणेच ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. आता या मतदानात ‘नोटा’ला झालेल्या काही हजार मतदानाच्या आकड्याकडे लक्ष वेधून, उद्धव ठाकरे यांना मुंबईत कसा पाठिंबा नाही, ते दाखवण्याचा प्रयत्न भाजपची काही वाचाळ मंडळी करत आहेत. मात्र, या निवडणुकीत ‘आपला’ उमेदवार नसला तरी ‘नोटा’ला मतदान करा, असा प्रचार कुजबुज मोहिमेतून गेले १५ दिवस कोण करत होते, ते लपून राहिलेले नाही. ‘नोटा’ला झालेले मतदान हे भाजप तसेच संघपरिवाराचे मतदान आहे आणि त्यांचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारास असणे शक्यच नव्हते, याकडे मात्र हे लोक सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.

‘नोटा’ला खूपच जास्त मते मिळाली असली तरी ते मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील नाराजीचे द्योतक आहे, असे त्यामुळेच म्हणता येणार नाही. एक मात्र खरे, की भाजपने माघार घेतल्यानंतर केवळ उद्धव ठाकरे गटच नव्हे तर ‘महाविकास आघाडी’तील इतर पक्षांनीही स्वारस्य न दाखवल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने जे आघाडीअंतर्गत एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची संधी होती, ती घटक पक्षांनी घालवली.

या पोटनिवडणुकांमुळे आणखी एक बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे या निवडणुकांत काँग्रेस कोठेच नाही. या सातही मतदारसंघांत खऱ्या अर्थाने लढती झाल्या त्या भाजप आणि त्या त्या राज्यातले प्रादेशिक पक्ष यांच्यातच. एकीकडे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला चांगला प्रतिसाद मिळत असतानाही, काँग्रेस निवडणुकीच्या राजकारणापासून दूर तर राहू पाहत नाही ना, असा प्रश्न यामुळे पुढे आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा विचार करणाऱ्या प्रादेशिक पक्षांना हे निकाल काही प्रमाणात तरी ‘बूस्टर डोस’ देणारे त्यामुळेच ठरू शकतात. हाच या पोटनिवडणुकांच्या निकालाचा अन्वयार्थ आहे.

विजयाच्या श्रेयाचे जनकत्व शेकडो व्यक्तींकडे असते; पराभव मात्र ‘अनाथ’ असतो!

- जॉन एफ. केनडी, माजी अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com