महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा केंद्रस्थानी!

राज्यात १८८ हून अधिक आमदारसंख्या असलेली महायुती वाईटरित्या पराभूत झाली आहे. मविआ १५९ विधानसभा जागांवर पुढे गेली.
maharashtra congress dominance lok sabha election 2024 politics
maharashtra congress dominance lok sabha election 2024 politicsSakal

महाराष्ट्राच्या राजकारणाला अडीच-तीन वर्षे रंगभूमी समजून प्रयोग करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. सर्वाधिक जागा भाजपचा शत्रू झालेल्या जुन्या भावाने शिवसेना उबाठाने नव्हे तर काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाराष्ट्राच्या रंगमंचावरचा प्रमुख लाभार्थी आहे काँग्रेस. राजकारणातल्या वेगळ्या नरेटिव्हचा उद्‍गाता.

राज्यात १८८ हून अधिक आमदारसंख्या असलेली महायुती वाईटरित्या पराभूत झाली आहे. मविआ १५९ विधानसभा जागांवर पुढे गेली. महायुती १२७ वर मर्यादित राहिली. नवी मंडळी येऊन बेरीज न होता वजाबाकी झाली आहे.

भाजपच्या खासदारकीच्या जागा सर्वाधिक गडगडल्या. दोन्ही बाजूंच्या मतसंख्येत फार फरक नाही हे खरे. तथापि जिंकून येण्याची घटना विरोधकांना बळ देते अन् सत्ताधाऱ्यांचा विश्वास डळमळवते. विधानसभेत २०१९ मध्ये निवडून आलेल्या युतीला सत्तारूढ होता आले नाही, हे भाजपचे दुर्दैव होते.

त्यानंतर स्थापन झालेले मविआचे सरकार अनैतिक, अनैसर्गिक हे मान्य केले तरीही ते कसे चुकीचे आहे, हे जनतेला समजावून सांगण्यात भाजपचे धुरीण कमी पडले. त्या घटनेचा हिशोब चुकता करण्यासाठी भाजपने जे केले ते लोकांना आवडले नाही, हे निकालाने दाखवून दिले.

शिंदे- फडणवीस- अजितदादा सरकारकडे जनतेची मते खेचणारी कोणतीही भव्य योजना नाही. सरकारने काय केले ते सांगायची सोय नाही. ‘मोदी है तो मुमकीन है..’ हे महाराष्ट्राला मान्य नाही. मोदी-शहांच्या गुजराती असण्याचा, फडणवीस उच्चवर्णीय असल्याचा महाराष्ट्रातील जनतेला राग असावा.

या दोन्ही गोष्टी बदलण्यासारख्या नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या महाअपयशावर तोडगा काढणे तोही केवळ काही महिन्यात तसे कठीण आहे. भाजपच्या १४ जागांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट प्रामुख्याने पवार कुटुंबाशी संबंधित आहे. ती जनतेला आवडलेली नाही.

अजित पवारांचे निकटचे सहकारी सुनील तटकरे मताधिक्य वाढवून निवडून आले. तथापि पक्षाचे हे यश एका जागेच्या पलिकडे गेले नाही. शरद पवारांनी ८ खासदार निवडून आणले. पक्ष फुटल्यानंतरही त्यांच्या जागा वाढल्या.

मोदींनी ‘भटकती आत्मा’ संबोधलेल्या याच शरद पवारांच्या मनात राज्याच्या विजयाची समीकरणे आकार घेत असतील. या व्यूहरचनेचा पाडाव करत भाजपच्या नेतृत्वातल्या महायुतीला केवळ चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडून यायचे आहे. हे अशक्य नसले तरी कठीण आहे.

पराभव केविलवाणा आहे अन् शत्रू वेगळाच आहे. भाजप सातत्याने उद्धार करीत असलेले उद्धव ठाकरे निकालाचे उपविजेते आहेत. विजेते आहेत मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गडातल्या जागा भाजपच्या मदतीने निवडून आणल्या. त्यांचे यश हे भाजपच्या अपयशात नाही म्हणायला भर टाकणारे ठरले.

भाजपला खरे अपयश आले ते काँग्रेसने मुसंडी मारल्याने. हा या निवडणुकीतला सर्वांत महत्त्वाचा भाग आहे, काहीसा दुर्लक्षित. महाराष्ट्रात भाजप अन्य प्रांतांसारखी रुजू शकली नाही ती काँग्रेसला येथे असलेल्या लोकपाठिंब्यामुळे. हा पाठिंबा संपला तेव्हा भाजप सत्तेत आली.

युतीची १९९५ मध्ये सत्तेवर आली त्यावेळी पवारांच्या नेतृत्वातले काँग्रेसजन उमेदवारी न मिळाल्याने बंड करून उभे राहिले अन जिंकले. ते सरकार काँग्रेसच्या पाठिंब्याचे होते. भाजपत १९९९ ते २०१४ या काळात बदल झाले.

भाजप २०१४ मध्ये मुख्य पक्ष झाला तो मोदींच्या लाटेमुळे. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला पर्याय म्हणून जनतेने भाजपला स्वीकारले होते. त्यात आता बदल झाला आहे. त्यामुळे उबाठाशि, शरद पवारांच्या राष्ट्रवादी व काँग्रेसशी लढावे लागणार आहे. राज्याच्या राजकारणातला सजग समाज मराठा आरक्षण देऊनही दुरावला आहे.

पुन्हा ओबीसींकडे जाणे गरजेचे झाले आहे. फडणवीस या समाजाला आपले वाटले तर प्रश्न सोपा होईल. त्यांना महाराष्ट्रात पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडे ओबीसी नेतृत्व आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी शपथविधीनंतर प्राधान्याने महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे. सध्या अपयशी ठरलेल्या फडणवीस यांची क्षमता खूप आहे.

ते ओबीसी राजकारणापासून मराठा राजकारणाकडे वळले होते असे वाटते. केंद्राचे तसे धोरण असल्यास राज्यात विनोद तावडे लक्ष देतील. अन्यथा ओबीसींचे सामूहिक नेतृत्व पंकजा मुंडे, गिरीश महाजन अशा स्वरूपात पुढे आणले जाईल.

काँग्रेस अल्पसंख्यांकांची मतपेढी उबाठाकडे सोपवेल का? विधानसभेत जास्त जागा न मागता समजूतदारपणे वागेल का? यावर बरेच काही अवलंबून असेल. शरद पवार नवी समीकरणे रचताना काँग्रेसला मध्यवर्ती मानतील की लोकसभा निवडणुकीप्रमाणे उद्धवना? महाराष्ट्र सहानुभूती पोटीच मतदान करत असेल तर विधानसभेत भाजपच्या फडणवीसांच्या वाट्याला येईल काय? या प्रश्नांची आगामी काळात उत्तरे मिळतीलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com