उत्तम विद्यार्थी घडविणारी ‘मएसो’

प्रकाश जावडेकर
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९ तारखेला शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षात (१६०) पदार्पण केले. हे औचित्य साधून येत्या शनिवारी माजी विद्यार्थी, हितचिंतकांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कार्याविषयी...

पुणे या भारताच्या सांस्कृतिक राजधानीत शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमातून या देशाची एकात्मता अखंड राखणाऱ्या व विकास करणाऱ्या शतायुषी, वर्धिष्णू असणाऱ्या ज्या मोजक्‍या संस्था आहेत, त्यापैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था. राष्ट्रीय विचारांच्या शिक्षणाद्वारे चारित्र्यसंपन्न विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविण्याचे पवित्र कार्य ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ १८६० पासून करीत आहे. आठ जिल्हे आणि ७५ शाखांच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या ‘मएसो’च्या ज्ञानवृक्षाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी १६०व्या वर्षात पदार्पण केले आहे.

संस्थेच्या यशावर असंख्यांच्या नावाची मोहोर उमटलेली आहे. संस्थेच्या पायाभरणीत मौलिक वाटा असणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके. त्यांच्या स्मृतीचा गंध आजही मनात दरवळतोय. माणसाच्या आयुष्याची शंभर वर्षांची परंपरा आपण मानतो. साठाव्या वर्षानंतर माणसाच्या क्षमता उताराला लागतात. पण, संस्थेच्या संदर्भात निराळा विचार करावा लागतो. संस्थेच्या इतिहासात १६० वर्षांचा टप्पा महत्त्वाचा असून, भविष्यात देदीप्यमान यशोशिखर गाठण्याची जिद्द मनात ठेवून संस्थेचा आराखडा तयार केला जातो आहे. याच संस्थेच्या ‘गरवारे वाणिज्य महाविद्यालया’चा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.१९६७ते १९७१ या कालखंडात वाणिज्य शाखेचा अभ्यास करत असताना कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली. साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त असणारे प्राचार्य शरच्चंद्र चिरमुले, प्राध्यापक द. मा. मिरासदार यांचा विनोद आणि तत्त्वबोध असणारा तास अनुभवण्यास मिळणे, हे आठवणीत राहणारे ठरले. ‘साहित्यचर्चा मंडळा’ची सुरुवात झाली, त्या प्रसंगी अनंत काणेकर, व्यंकटेश माडगूळकरांसोबतच अनेक लेखकांची उपस्थिती होती.

कालानुरूप शिक्षण
आम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘निनाद’ नावाचे भित्तिपत्रक सुरू केले, पुढे त्याला पाक्षिकाचे स्वरूप मिळाले. महाविद्यालयांमध्ये खेळ, वाद-विवाद, याबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारी आम्ही सर्व मुले एकत्रित येऊन समाजोपयोगी काम करीत असू. त्यातूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू झाले. कॉमर्स कॉलेज असूनदेखील साहित्यसंपन्न असणारी लायब्ररी सुरू झाली. विविध गुणांना संधी देणाऱ्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला आनंद होतो आहे. आज विद्यार्थ्यांना प्रासंगिक, कालानुरूप शिक्षण देणे, ही गरज आहे. एकविसाव्या शतकातील संधी आणि आव्हाने आपल्यासमोर आहेत. या सगळ्यांमध्ये विद्यार्थी हा एक माणूस म्हणून स्वतः आधुनिक विचार करणारा असायला हवा. फक्त परीक्षार्थी नव्हे, तर चांगला माणूस घडणे हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे.नव्या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक चांगल्या घटकांचा समावेश आहे. ज्यामध्ये, मुलांना स्वतंत्रपणे विचार करू देण्याचे, कृती करू देण्याचे स्वातंत्र्य देणे आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. जागृतपणे विखुरलेल्या, भोवताली जे घडते ते चांगले नाही, याची योग्य जाण असलेल्या युवाशक्तीला संघटित करून त्यांचे विचार जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची नितांत गरज आहे. त्यांच्यातला आत्मविश्वास, शक्ती जागवून त्यांना योग्य ध्येयाची ओळख करून द्यायला हवी आहे. आजच्या गतिमानतेच्या गदारोळात स्पर्धा, पैसा, भोगवाद त्यांना खुणावतोय. अपयश, भीती, निराशा या भोवऱ्यात युवक अडकलाय. त्यातून बाहेर पडणारे शिक्षण त्यांना मिळायला हवे. पौर्वात्य संस्कृतीचा परिचय करून द्यायला हवा आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून पौर्वात्य संस्कृतीत विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्वागत करायला हवे आहे. ‘मएसो’मधून आठ ते दहा पिढ्या शिकून बाहेर पडल्या, अनेकांनी नवे विक्रम केले, उच्च पदावर पोहोचले, सर्व क्षेत्रांमध्ये पराक्रम घडवला. या संस्थेने उत्तमोत्तम विद्यार्थी राष्ट्राला दिले, विविध क्षेत्रांत या विद्यार्थ्यांनी यशाची गुढी उभारली आहे, शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुढील काळात अधिक रसरशीतपणे, तन्मयतेने, सार्थकतेने पुढील शैक्षणिक वाटचाल करेल. राष्ट्रीय विचार असणाऱ्या संस्थेची स्थापना करणाऱ्यांचे स्मरण करीत या संस्थेला मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. 
(लेखक केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Education Society