पायऱ्यांवरील घस‘रण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 राडा

पायऱ्यांवरील घस‘रण’

विविध संसदीय आयुधे आणि आपली ओघवती उपरोधिक शैली यांच्या जोरावर अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा ज्या दिवशी शताब्दीनिमित्त विधिमंडळात सत्कार झाला, त्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर लोकप्रतिनिधींमध्ये शारीरिक धुमश्चक्री सुरू होती. एकीकडे विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बुजूर्ग नेत्याचा सत्कार आणि दुसरीकडे जे संकेत, जी मूल्ये टिकवून धरण्यात केशवरावांसारख्या लोकप्रतिनिधींनी महत्त्वाचा वाटा उचलला, त्या मूल्यांना धक्का, असे परस्परविरोधी चित्र बुधवारी पाहायला मिळाले.

शिवसेनेत मोठी फूट पाडून झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या या अधिवेशनात ‘शंभर खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांचे स्वागत केले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या काही आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्याच शैलीत विरोधकांना कोंडीत पकडण्याचे सत्र गेले दोन दिवस सुरू केले होते. या आंदोलकांनी आपली ‘पायरी’ सोडली आणि त्याचे पर्यवसान विधानभवनाच्या पायऱ्यांवरच हाणामारीत झाले. शिवसेनेची संस्कृती ही रस्त्यावर ‘राडा’ करणारी संस्कृती आहे, असे एकेकाळी शिवसैनिकच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही अभिमानाने सांगत असत.

तरीही थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवरच असा भलामोठा राडा यापूर्वी कधी झाला नव्हता. दोन दशकांपूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असताना विरोधकांना विधानभवनाच्या आवारात ‘ठिय्या आंदोलन’ करून, सत्ताधाऱ्यांचा प्रवेश रोखून धरला होता. तेव्हा शिवसेनेतील आपल्या जुन्या आठवणी जागवत, हे आंदोलन मोडून काढत छगन भुजबळ यांनी आपल्या सहकारी आमदारांसह विधानभवनात प्रवेश करण्यात यश मिळवले होते. मात्र, तेव्हाही हाणामारी वा ठोसेबाजी झाली नव्हती. त्यामुळेच बुधवारी या पायऱ्यांवर जे काही घडले, त्यास आक्रित तर म्हणावे लागेलच; शिवाय त्यामुळेच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या थराला जाऊन पोचली आहे, त्याचेही लाजिरवाणे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या या विधानभवनात गेल्या चार दशकांत संसदीय लढाया अनेक झाल्या आणि सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यातील लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, औचित्याचे मुद्दे, शून्य प्रहर म्हणजेच ‘झीरो आवर’ आदी विविध संसदीय आयुधे वापरून झडलेल्या चकमकी या आजही अनेकांच्या स्मरणात असतील. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ याच उक्तीचे प्रत्यंतर त्यातून येत असे आणि जनहिताचे अनेक विषयही त्या ‘शाब्दिक युद्धा’तून मार्गी लागत असत.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळानंतर तापलेल्या वातावरणात माथी भडकलेले आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचीही काही उदाहरणे आहेत. मात्र, एकमेकांच्या अंगावर हात टाकण्याचा जो काही प्रकार बुधवारी बघावयास मिळाला, तो संसदीय राजकारणाच्या इतिहासात या पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्याची मान खाली घालायला लावणाराच होता, यात शंका नाही.

विधानभवनाच्या पायऱ्यांवरील या हाणामारीत प्रामुख्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही आमदार सामील झाल्याचे बघावयास मिळाले. मात्र, त्याचवेळी संसद तसेच विधिमंडळ येथील वर्तनाबाबतची एक आचारसंहिता तयार करणाऱ्या भाजपचे काही आमदारही तेथे जातीने हजर होते. एवढेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हे रणकंदन बघण्यास तेथे काही काळ उपस्थित होते! विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांना तेथून काढता पाय घेण्यास सांगितले; मात्र मुख्यमंत्र्यांच्या तेथील उपस्थितीमुळे त्यांच्या गटातील आमदारांना अधिकच चेव आल्याचे दिसले. फोडाफोडी आणि राडेबाजी हेच त्यामुळे आमदारांच्या ‘प्रमोशन’चे एक गुणवत्ता प्रमाणपत्र तर ठरू पाहत नाही ना, असाच प्रश्न त्यामुळे कोणालाही पडावा.

एवढेच नव्हे तर झाल्या प्रकाराबद्दल कोणालाही ‘ना खंत, ना खेद’ अशीच अवस्था असल्याचे दिसून आले ते शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आणि कोणी अंगावर आले तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ,’ असे गोगावले म्हणाले. महेश शिंदे यांनी तर ‘आमच्या अंगालाही कोणी हात लावला नसून, आम्हीच त्यांना चोपून काढले!’ असा जाहीर ‘खुलासा’ केला. कोणे एके काळी महाराष्ट्राच्या विधिमंडळात एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, बी. डी. किल्लेदार, कृष्णराव धुळप, उद्धवराव पाटील, त्र्यं. सी. कारखानीस, मृणाल गोरे, प्रा. राम कापसे, राम नाईक आणि केशवराव धोंडगे यांच्यासारखे संसदीय आयुधांचा अचूक वापर करत सरकारला पेचात पकडणारे अनेक ज्येष्ठ नेते असत. तेव्हा ‘खोके’ नसत आणि सारे काही ‘ओक्के’ही नव्हते. तरीही या नेत्यांनी आपली पातळी कधीच सोडली नव्हती. आता हा सारा इतिहास झाला आहे, यावरच बुधवारी जे काही घडले त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

पायऱ्यांवरील या रणकंदनामुळे ‘महाराष्ट्राचा बिहार झाला आहे काय?’ अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बिहारच काय उत्तर प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांच्या विधिमंडळात यापेक्षाही आक्षेपार्ह असे अनेक प्रकार घडले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत मायावती यांच्यावर समाजवादी पार्टीच्या आमदारांनी हल्ला केला होता तर तामिळनाडू विधानसभेत जयललिता यांच्या साडीला हात घालण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती.

तरीही प्रगत म्हणविणाऱ्या महाराष्ट्रानेही आपली अशी घसरण कशासाठी करून घ्यावी? हिंदुत्वाचे गोडवे गाणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची महती सांगणाऱ्या आमदारांच्या या रणधुमाळीत महात्मा गांधी तसेच शाहू-फुले-आंबेडकर अशी जपमाळ ओढणारे आमदारही सामील झाले असतील, तर या सर्वांनी मिळून सुसंस्कृतपणा आणि लोकशाहीचे रीती-रिवाज वेशीवरच टांगले, असेच म्हणावे लागते. हेच करायचे असेल तर चर्चेसाठी सभागृहाची गरज काय? शक्तिप्रदर्शनाचा एखादा आखाडा पुरे.

सद्हेतू आणि बुद्धी यांच्या आधाराने मतभेदांतून मार्ग काढायला हवा; हाती शस्त्र घेऊन नव्हे.

- ड्वाईट आयेसनहॉवर

Web Title: Maharashtra Legislative Assembly Congress And Ncp Govt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..