
सडेतोड : राहुल गडपाले
आता लोकशाहीच्या मंदिरात होणाऱ्या लोचट लांडग्यांच्या मुष्टियुद्धात महाराष्ट्रीय माणसाने आल्हाद मानावा. तीन आठवड्यांच्या माकडचेष्टांनी आपले मन तृप्तीने आकंठ भरून घ्यावे. सत्ता आणि त्यासोबत येणाऱ्या सुखोपभोगाच्या सुरेल कहाण्या ऐकण्यात आपले मन रमवावे. उगाच आत्मप्रकटीकरणाच्या नादाला लागून पुरोगामी, लोकशाही, पुढारलेले राज्य असल्या वल्गना करू नयेत. आता आपणही बिहार आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर विकासाचे पायदान पादाक्रांत करत गुंडांच्या साथीने ठोकशाहीचा पाया भक्कम करत आहोत, याचा जाहीर जल्लोष साजरा करायला हवा.