चला, चला जाऊ सिनेमाला..!

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून बेधडकपणे आत येत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन? उधोजीसाहेब : (उश्या व्यवस्थित रचून ठेवत) नोप! मी कामात आहे…!
चला, चला जाऊ सिनेमाला..!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.

वेळ : गुडनाइट!

………..

चि. विक्रमादित्य : (दार ढकलून बेधडकपणे आत येत) हाय देअर बॅब्स…मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (उश्या व्यवस्थित रचून ठेवत) नोप! मी कामात आहे…!

विक्रमादित्य : (कुतूहलाने) काय करताय?

उधोजीसाहेब : (हातातील टॉर्चची उघडझाप करत) काही नाही! उद्या दिल्लीला जायचंय! लौकर झोपायला हवं!

विक्रमादित्य : (आत येत) हार्टिएस्ट काँग्रेच्युलेशन्स!

उधोजीसाहेब : (डोळ्यात टॉर्चचा उजेड पाडत ) कशासाठी?

विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) ओळखा तुम्हीच!

उधोजीसाहेब : (कर्तव्यकठोरपणाने) हे पहा, मला मोटाभाईंनी नक्षलवादावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला बोलावलंय, आणि याच्यात अभिनंदन करण्यासारखं काहीही नाही! तिथे मी बंद दाराआड चर्चा करणार नाही!

विक्रमादित्य : (हस्तांदोलनासाठी हात पुढे करत) तुस्सी ग्रेट हो, बॅब्स! आपण मुक्त झालो!

उधोजीसाहेब : (हादरुन) आता काय झालं आपल्या आघाडीला?

विक्रमादित्य : (दिलासा देत) आघाडी बर्करार आहे! डोण्ट वरी! महाराष्ट्र खऱ्या अर्थानं अनलॉक होऊ लागला, म्हणून म्हटलं मी-मुक्त झालो!!

उधोजीसाहेब : (सावधपणाने इशारा देत) जास्त आगाऊपणा केला, तर सगळं पुन्हा बंद करुन टाकीन मी! कोरोनाचे सगळे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत!

विक्रमादित्य : येस बॉस! पण खरंच तुम्ही पुन्हा सिनेमाची थिएटरं उघडणार ना?...विश्वासच बसत नाही!

उधोजीसाहेब : सिनेमा बघताना एक आड एक खुर्ची सोडून बसायचं हां! थिएटरात शिरताना झुंबड करायची नाही! वडे, समोसे घेताना गर्दी करायची नाही! वारंवार हात धुवायचे, सॅनिटायझरचा वापर करायचा, आणि हो, मास्क लावणं बंधनकारक राहील! निर्मात्यांना आणि सिनेमागृहाच्या चालकांना मी सक्त सूचना करणार आहे!..

विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) कसली?

उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) पुढली दोन वर्षं कोणीही हॉरर सिनेमे काढायचे नाहीत!

विक्रमादित्य : (अट मान्य करत) सिनेमावाले तुमचे कृतज्ञ होते, आहेत आणि राहतील!!

उधोजीसाहेब : (प्रयत्नपूर्वक संताप गिळत) …मी तिथे अंधारात खुर्च्या दाखवायला टॉर्च घेऊन उभा राहणार आहे, असं वाटतंय का तुम्हा लोकांना?

विक्रमादित्य : (स्वप्नाळू नजरेने) गेली दोनेक वर्ष पॉपकॉर्न खाल्ले नाहीत की इंटर्वलमधला समोसा चावला नाही! आयम फीलिंग एक्सायटेड!!

उधोजीसाहेब : शाळा-कॉलेजंसुद्धा उघडणार आहे !

विक्रमादित्य : शाळाकॉलेजांचं येवढं काही नाही!

उधोजीसाहेब : देवळंसुद्धा उघडणार आहे!

विक्रमादित्य : त्याचंही येवढं काही नाही!

उधोजीसाहेब : म्हंजे तुम्हाला इंटरेस्ट फक्त सिनेमातच आहे! महाराष्ट्रासमोर कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत! गेली दोनेक वर्ष मीसुद्धा एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही, हे कोणाच्या लक्षात आलंय का?

विक्रमादित्य : (कबुली देत) नाही आलं खरं!

उधोजीसाहेब : माझा महाराष्ट्र सांभाळताना क्षणभराची उसंत घेता येत नाही! इथे धावलं की तिथं उसवतं! तिथं उसवलं की इथे फाटतं!...कठीण आहे! विश्रांती नाही की विरंगुळा नाही! कुठे फिरायला गेलो नाही की छंद जोपासले नाहीत! गेल्या दोन वर्षात कॅमेरा हातातसुद्धा नाही घेतला!

विक्रमादित्य : आय कॅन अंडरस्टॅण्ड, बॅब्स! यू नीड विरंगुळा! चला, येता का सिनेमाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com