भाष्य : ‘कोल्हापूर-सांगली’ दूर नाही! 

महेंद्र सुके
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबई परिसरात मोठमोठे प्रकल्प येत आहेत. खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहे. ‘महामुंबई’च्या नावाने वसाहती वाढताहेत.  डोंगर पोखरले जात आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून निसर्गाला ओरबाडून खाण्याचीच वृत्ती सगळीकडे फोफावत चालली आहे.

मुंबई परिसरात मोठमोठे प्रकल्प येत आहेत. खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहे. ‘महामुंबई’च्या नावाने वसाहती वाढताहेत.  डोंगर पोखरले जात आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून निसर्गाला ओरबाडून खाण्याचीच वृत्ती सगळीकडे फोफावत चालली आहे. त्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृतीमुळे निसर्ग आपल्याला भानावर यायला सांगतो आहे. त्याचा इशारा अद्यापही आपल्याला कळतच नसेल, तर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासारखी परिस्थिती सगळीकडे यायला वेळ लागणार नाही...

एकमेकांना ज्या गोष्टी पूरक असतात, त्यात दगाफटका करून चालत नाही. मग ते नाते कुठलेही असो. अलीकडच्या काळात माणूस स्व-अर्थी होऊन स्वत:च्या भलेपणातच सर्वस्व मानतो. त्यामुळेच नाती तुटतात. मग ती नाती कुठलीही असोत. त्याची आकडेवारी कुटुंब न्यायालयात दाखल होणाऱ्या पती-पत्नीच्या खटल्यांमधूनही दिसतच असते. भावा-भावाचे भांडण असते वडिलोपार्जित संपत्तीसाठी. एकाच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भांडणे असतात पदोन्नतीसाठी. प्रतिष्ठेसाठी. विस्कटलेल्या मानवी नातेसंबंधाचे परिणाम व्यक्तिगत पातळीवर जसे होतात, तसे ते समाजजीवनावरही होत असतात. त्याचा परिणाम त्या कुटुंबाच्या विकासावर, कर्मचाऱ्यांची भांडणे असतील तर संस्थेच्या प्रगतीला बाधा आणतात. कुटुंब, समाज आणि संस्थांची हानीही मानवी जीवनाला परवडणारी नसते, हे वेळोवेळी सिद्ध होत असते. अशा माणसा-माणसांतल्या भांडणातच आपण निसर्गाशी भांडायला लागलो आहोत. निसर्ग आणि मानवी जीवनाचे एकमेकांशी जवळचे नाते आहे; पण ते अलीकडच्या काळात विस्कटलेले दिसते. विकासाच्या नावावर माणूस निसर्गावर हल्ला करायला लागला. त्याचे परिणाम काय असतात, हे वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या महापुराने आणि दुष्काळाने आपल्याला सांगून टाकले आहे, तरीही आपण बेसावधच आहोत. 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत आलेल्या महापुरासाठी सरासरीपेक्षा जास्त आलेल्या पावसाला आपण आरोपीच्या कठड्यात उभे केले आहे. आपण म्हणू तसाच पाऊस पडला पाहिजे, हे काही आपण सांगू शकत नाही. शेती पिकत नाही. पिकले तर ते परवडणाऱ्या भावात ते पीक विकले जात नाही. त्यामुळे गावाकडच्या आजच्या पिढीला शेती करावीशी वाटत नाही. कामधंद्याच्या शोधात माणसे शहराकडे धावायला लागली. शहरे फुगू लागलीत. शहराचा विस्तार वाढला आणि तो जल, जंगल आणि जमिनीवर अतिक्रमण करू लागला. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह विकासाच्या नावावर बदलायला निघाला. नदी, नाल्याच्या काठावर शहर वसू लागले. जंगल तोडल्याने पर्यावरणावर परिणाम झाला. ऋतुचक्र बदलायला लागले. अवकाळी पाऊस पडायला लागला. कुठे अतिवृष्टी; तर काही भागात पावसाने अक्षरश: दगा दिला. हे सारे माणसाने निसर्गावर आघात केल्याचे परिणाम आहेत, त्याचे दुष्टचक्र हळूहळू माणसावरच उलटायला लागले आहे. यात दोषी सारेच नाहीत; चुका करणारे सुपात आणि निर्दोष जात्यात भरडले गेले आहेत. 

पूरग्रस्त जिल्ह्यातील आजची स्थिती भयावह आहे. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना त्यांचे संसार नव्याने उभे करण्यासाठी सारीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांपासून तर सरकारी यंत्रणेची मदत मिळेलही; पण जे वाहून गेले; ते परत मिळणार नाही, याची वेदना आयुष्यभर बोचत राहणार आहे. त्यातही पूरग्रस्त भागात अनेक संकटे उभी राहिली आहेत. साथीचे आजार डोके वर काढताहेत. काल निसर्गसंपन्न असलेल्या गावात आज दुर्गंधीने जाणे मुश्‍कील झाले आहे. हिरव्यागार शेतीतून रातोरात पिके वाहून गेली आहेत. त्या पिकांऐवजी नदीपात्रातला कचरा, गाळ, चिखल दिसू लागला आहे. हे सारे शेतकऱ्यांना हवालदिल करणारे आहे. अस्वस्थ करणारे आहे. शहरातील घरात पाणी गेले. सारी स्वप्नं पुरात वाहून गेली आहेत. नदीकाठावर का बांधली घरं, असा थेट प्रश्‍न विचारून आता उपयोग नाही. कारण नदीची पूररेषा आपण आपल्या सोईने ठरवून टाकली आहे. आधी वाहत्या नदीला कुठलेही अडथळे येत नव्हते. ती तिच्या सरळ स्वभावाप्रमाणे वाहत होती. तिच्या परिसरात ती मुक्तपणाने श्‍वास घेत होती. तिला श्‍वास घ्यायला जागाच उरली नाही आणि ती जिथून जागा मिळेल, तिथून सुसाट पळायला लागली. यात तिचा दोष नाही. तिच्या वहिवाटीवर आपल्या सोईसाठी माणसाने अतिक्रमण करायचे आणि अतिवृष्टीने तिने तिचीच जागा परत मागितली, तरी दोषीही नदीलाच ठरवायचे, यालाच निसर्गनियम म्हणण्याची वेळ आता माणसांवर आली आहे. 

पूरग्रस्त भागात आलेला हा पहिलाच महापूर नाही. २००५मध्येही अशाच स्वरूपाची परिस्थिती उद्‌भवली होती. त्यावेळेस काय घडले, याचीही मांडणी वेगवेगळ्या प्रकारे होतच आहे. एक ठेच लागल्यानंतर त्याच रस्त्यावरून जायचे आपण टाळतो आणि माणूस शहाणा होतो. ही सुभाषितंही आपण पुस्तकात बंद करून ठेवली आहेत. लहान-मोठी संकटं आल्यावर सरकारी यंत्रणाही शहाणी होत नाही. त्या यंत्रणेला जागृत ठेवण्याची ताकद राज्यकर्त्यांतही उरली नाही. एकमेकांच्या हातात हात घालून निसर्गाला ओरबाडून खाण्याचीच वृत्ती सगळीकडे फोफावत चालली आहे. त्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृतीमुळे निसर्ग आपल्याला भानावर यायला सांगतो आहे. त्याचा इशारा अद्यापही आपल्याला कळतच नसेल, तर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासारखी परिस्थिती सगळीकडे यायला वेळ लागणार नाही. मुंबई शहरातही समुद्रकिनारे, खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. आता जागाच उरली नाही. त्यामुळे मुंबईचा विस्तार आता जवळपासच्या जिल्ह्यांतील गावांना कवेत घेऊन ‘महामुंबई’ म्हणून उदयाला येऊ लागली आहे. त्याचाच दुष्परिणाम मुंबईतून कोल्हापूरला जाणारी ‘महालक्ष्मी’ पुरात अडकण्यात झाला आहे. मुंबईचा असा विस्तार मानवी जीवनावर आघात करणारा ठरू शकतो, याचा तो ट्रेलर होता, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. 

मुंबई शहरात जरा जोराचा पाऊस आला, तरी रस्ते, वस्त्यांत पाणी साचते. त्याचे ‘लाईव्ह’ दृश्‍य क्षणात पसरते. तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील नदीकिनाऱ्यांवरही आता पाहायला मिळते आहे. नवी मुंबईत डोंगर पोखरून, खाडी बुजवून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासाच्या नावावर मोठमोठे प्रकल्प आकाराला येत आहेत. त्या प्रकल्पांसाठी माणसे येतील. नोकऱ्या करतील. वस्त्यांचा आकार वाढत जाईल. माणसे वाढतील आणि खाडीकिनारे इतिहासजमा होतील. मुंबई परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर पडणारा पावसाचा जोर वाढला आणि त्याच वेळी भरतीही असली तर काय होऊ शकते, हे २६ जुलै२००५च्या मुंबई बुडवणाऱ्या पावसाने दाखवून दिले आहे. या घटनेचे साक्षीदार असणाऱ्यांच्या अंगावर आजही त्या रात्रीची आठवण अंगावर काटा आणते. आता तर अवतीभवती असणाऱ्या खाडीकिनाऱ्यांचा जीव घेऊन विकास-प्रकल्प उभे केले जात आहेत. माणसाला निसर्गाशी असणारे नातेसंबंध तोडण्यात धन्यता वाटते, तो कोपला तर त्याच्याच नावाने पुन्हा बोटं मोडायची, ही आपली संस्कृती झाली आहे. पर्यावरण सुदृढ ठेवण्यास आपले मागासलेपण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

mahendra.suke@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra suke article