
स्त्री -पुरुष नातेसंबंधांवरील अनेक नाट्य कलाकृतींनी मराठी रंगभूमीवर राज्य केले आहे. त्यावर चर्चा, वाद-विवाद झाले.
चौथी विंग : धक्कादायक ‘क्रॉस कनेक्शन’
पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करतानाच विवाहबाह्य संबंधाचे धक्कादायक क्रॉस कनेक्शन म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नवे नाटक. आशयसंपन्न कथासूत्राला समृद्ध अभिनयाची झालर, हे या कलाकृतीचे वैशिष्ट्य आहे.
स्त्री -पुरुष नातेसंबंधांवरील अनेक नाट्य कलाकृतींनी मराठी रंगभूमीवर राज्य केले आहे. त्यावर चर्चा, वाद-विवाद झाले. ते वास्तवाच्या जवळ जाणारे आणि त्या-त्या काळातील समाजजीवनाचे प्रतिबिंब ठरले. ते धक्कादायक वास्तव पचनी पडायला समाजमन तयार नसले तरी, त्या कलाकृतीतील वास्तव कालांतराने सिद्ध झाले आहे. प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी निर्मिलेले ‘छुपे रुस्तम’ हे नवे नाटकही आजच्या स्त्री-पुरुष संबंधावर भाष्य करणारे आहे. तेजस रानडे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ही चारपात्री गुंतागुंत नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजनेसह अभिनयाने समृद्ध झाली आहे.
पडदा उघडतो तेव्हा साहिल (हृषिकेश जोशी) त्याच्या घरात पार्टीची तयारी करण्यात व्यग्र आहे. या पार्टीला त्याचा जवळचा मित्र वरुण (प्रियदर्शन जाधव) त्याची पत्नी ऋजुता (कृष्णा राजशेखर)सह येणार असतो. साहिलची तयारी सुरू असतानाच त्याची पत्नी समीरा (मयुरा रानडे) ऑफिसमधून घरी येते. ती प्रचंड अस्वस्थ आहे. संतापलेली. त्याबद्दल साहिल विचारतो, तेव्हा ही पार्टी आपण रद्द करू या, असे समीरा सुचवते. ऐनवेळी तसे करणे साहिलला योग्य वाटत नाही. कोडं उलगडता-उलगडता समीरा पार्टी रद्द करण्याच्या आग्रहाचे खरे कारण सांगते. ज्याला आपण पार्टीसाठी बोलावले आहे, त्या वरुणला समीराने कॅबमध्ये एका परस्त्रीचे चुंबन घेताना पाहिलेले असते. याचा धक्का तिला बसलेला असतो. पार्टी रद्द करण्यावरून वाद-विवाद सुरू असतानाच वरुण आणि ऋजुता ठरलेल्या वेळेत साहिलच्या घरात दाखल होतात. या जवळच्या मित्रांची पार्टी कशी रंगते, वरुणचे परस्त्रीशी असलेल्या संबंधाचे काय होते, ऋजुता कशी रिॲक्ट होते आदी प्रश्नांची उत्तरे चकित करणारी आहेत.
स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयी समाजात एक पारंपरिक चौकट आहे. ती मोडली की त्यावर वाद-विवाद जन्माला येतात. विवाहबद्ध व्यक्तीचे इतर स्त्री-पुरुषांशी मैत्रीपूर्ण नाते असतात; पण त्यांचे प्रेमसंबंध नसावे, अशी ही एक चौकट आहे. मैत्रीपूर्ण संबंधावर कुणीही आक्षेप घेत नसतात. मात्र तीच मैत्री अफेअरमध्ये किंवा शारीरिक संबंधापर्यंत गेली तर त्याचे परिणाम विवाहसंबंधावर होत असतात. एकमेकांपासून काहीतरी दडवून ठेवण्याचा खटाटोप होत असतो. त्याच संबंधांची उकल करण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’द्वारे तेजस रानडे यांनी केला आहे.
विजय केंकरे यांनी मानवी भाव-स्वभावाला नाट्यकलाकृतीत गुंफताना उत्तम दिग्दर्शिय कौशल्याने समृद्ध केले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य देहबोलीतून, रंगमंचीय अवकाशातून कथासूत्राशी जोडले आहे. मानवी वृत्ती-प्रवृत्तीची नोंद घेतली आहे. त्यातूनच मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या रंगावृत्ती मंचित केल्या आहेत. ही गोष्ट रसिकांच्या मनात असलेल्या शक्यतांच्या जवळपास जाते आणि दुसऱ्याच क्षणाला वळण घेऊन धक्का देते. त्यामुळे ‘छुपे रुस्तम’चे दिग्दर्शकीय विणकाम वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.
हृषिकेश जोशी यांनी साहिलची भूमिका साकारताना अभिनय सामर्थ्य सिद्ध केले आहे. साहिल या व्यक्तिरेखेतील वैविध्य त्यांनी तेवढ्याच सहजतेने आविष्कृत केले. न थकता भडभड बोलणारा, अचानक गप्प होणारा, प्रश्नांत अडकलेला, चक्रव्यूहात सापडलेला, वेळ मारून नेणारा आणि अपराधाची सोडवणूक करणारा साहिल हृषिकेश यांनी अगदी सहज साकारला आहे. मयुरा रानडे यांनी समीराच्या भूमिकेतील वेगळेपण अधोरेखित केले आहे. भास-आभास, खरे-खोटे, मूर्त-अमूर्त, शक्यता-वास्तव असे हे संघर्ष नाट्य रंगवताना हृषिकेश आणि मयुरा या दोघांचीही जुगलबंदी रंगली आहे. गोष्ट सुरुवातीला वरुणभोवती आकार घेणारी वाटत असली तरी ती एका वळणावर साहिल आणि समीराभोवती फिरते. केंद्रस्थानी वाटणारा आणि मुळात वाङमयीन क्षेत्रात लेखक-प्रकाशकाचा उद्योग करणारा वरुण त्याच्या वाक्चातुर्याने प्रभावित करतो. ही भूमिका प्रियदर्शन जाधव यांनी तेवढीच प्रभावीपणे साकारली आहे. कृष्णा राजशेखर यांनी साकारलेली ऋजुताही अशीच सहजसुंदर अभिनयसौंदर्याचा साज ठरली आहे.
अभिनय-दिग्दर्शनासोबतच प्रकाशयोजना (शीतल तळपदे), संगीत (अजित परब) आणि मंगल केंकरे यांनी केलेल्या वेशभूषेने अपेक्षित उंची गाठली आहे. त्यातही संदेश बेंद्रे यांनी केलेली नेपथ्यरचना या नाटकाच्या सर्वांगसुंदर श्रीमंतीला वेगळी झालर चढवणारी आहे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीनुसार प्रत्येक घरात थोड्याअधिक प्रमाणात भांड्याला भांडं लागत असते. त्या भांडणाचा आवाज चार भिंतीच्या पलीकडे जाऊ नये, याची काळजीही घेतली जाते. पण विवाहबाह्य नातेसंबंधावरून होणाऱ्या दाम्पत्याच्या संघर्षात ‘छुपे रुस्तम’मध्ये लागलेले क्रॉस कनेक्शन समाजमनाला धक्का देणारे, चकित करणारे आहे.
mahendra.suke@esakal.com
Web Title: Mahendra Suke Writes Chhupe Rustam Drama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..