विंगेतून : हौशी नाट्य स्पर्धेचे नवे धुमारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sau Drama
विंगेतून : हौशी नाट्य स्पर्धेचे नवे धुमारे

विंगेतून : हौशी नाट्य स्पर्धेचे नवे धुमारे

नाट्यक्षेत्रातील ताज्या घटना, घडामोडींचा मागोवा घेणारे, नव्या नाटकांचे रसग्रहण करणारे नवे साप्ताहिक सदर.

गेल्या वर्षी कोरोनामुळे खंडित झालेली हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी १ जानेवारीपासून सुरू होणार होती, मात्र प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याने स्पर्धेची तारीखही पुढे गेली. आता या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील १९ केंद्रांवर १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यभरात शेकडो संस्थांतील हजारो हौशी कलावंतांनी या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने प्रवेशअर्ज सादर केले. एक वर्षाच्या ब्रेकनंतर तालीमही जोरात सुरू आहेत. मात्र या स्पर्धेला आता ओमिक्रॉनची नजर लागू नये, अशी प्रार्थना रंगकर्मी करत आहेत.

महाराष्ट्रातला माणूस नाटकप्रेमी असण्याची अनेक कारणे असली तरी, ते वाढण्यात राज्य नाट्य स्पर्धेचे योगदान मोठे आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. नवोदित कलावंतांना रंगभूमीवर आपले नाट्यगुण सिद्ध करून दाखवण्याची संधी देणारी महत्त्वाची स्पर्धा म्हणजे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा. शासन तब्बल ६० वर्षांपासून सलगपणे ही स्पर्धा आयोजित करत आहे. त्यातून नवे नाट्यलेखक, दिग्दर्शक, नाट्यकलावंत, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि पार्श्वसंगीतकारांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात येते. अर्थात, उद्याच्या रंगभूमीवरील कलावंतांची शोधमोहीम घेणारी ही चळवळ आहे. ५०-६० वर्षांच्या कालखंडात जे कलावंत मराठी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले, त्यापैकी बहुतांश रंगकर्मी या स्पर्धेचा उंबरठा ओलांडूनच आले आहेत. अनेकांना तर सुरुवातीला याच स्पर्धेत गौरवले, मोठे केले आणि त्यानंतर ते व्यावसायिक रंगभूमीवर प्रतिष्ठित झाले.

कुठलाही कलावंत रातोरात मोठा होत नसतो, त्यासाठी त्याला रियाज करावा लागतो. त्या तालमीनंतर त्याच्यातील कलागुण दाखवायला रंगमंच लागत असतो. तो हक्काचा रंगमंच राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने नवोदित कलावंतांना महाराष्ट्र शासन दरवर्षी देते. त्यातूनच नवोदित कलावंतांचे प्रयोगशील नाटक जगले आहे. कलावंतांना प्लॅटफॉर्म मिळाल्यानेच नाट्यवेड्यांसह नाट्यप्रेमीही वाढले आहेत. अशी गौरवशाली परंपरा असलेली ही स्पर्धा सरकारी पातळीवर ६० वर्षे जगवणे, त्यात सातत्य राखणे हे काम साधे आणि सोपे नक्कीच नाही. अनेकानेक अडचणींशी झगडत, वेळोवेळी बदलत, नवे नियम स्वीकारून ही स्पर्धा जगवण्यात महाराष्ट्रातल्या गावोगावच्या रंगकर्मींचाही मोठा वाटा आहे. या वर्षीही या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत १९ केंद्रांवर ३५४ नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर, साहित्य संघाचे नाट्यगृह आणि घाटकोपर अशा तीन केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. तर राज्यभरातल्या ठाणे, कल्याण, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, नगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर शहरांत स्पर्धा होणार आहे. नगर केंद्र वगळता बहुतांश केंद्रांवर १८ ते २० नाट्यसंघांनी प्रवेश घेतला आहे. नियमानुसार ज्या केंद्रावर पंधरापेक्षा अधिक नाटकं सादर होतात, त्यातील दोन नाटकं अंतिम फेरीसाठी निवडली जातात. प्रवेश अर्जानुसार प्रत्येक केंद्रांवर नाटकांचे सादरीकरण झाल्यास राज्यभरातून अंतिम फेरीत ३७ नाटकं निवडली जातील.

राज्यात होणारी प्राथमिक फेरी आटोपल्यानंतर एक मार्चपासून साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. एका दिवशी दोन नाट्यप्रयोग आयोजित करून साधारण १८-२० दिवसांत राज्यभरातील केंद्रांतून सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले गेलेली सुमारे ३६ ते ३८ नाटकं रसिकांना बघायला मिळतील. अंतिम फेरीचे ठिकाण अद्याप निश्चित नसल्याने ती संधी कोणत्या गावातील नाट्यप्रेमींना मिळते, ते काही दिवसानंतर कळेलच. अंतिम फेरी सर्वांना बघायला मिळणार नसली तरी, किमान या स्पर्धेच्या अंतिम फेरीतून जी सर्वोत्कृष्ट पाच नाटकं निवडली जातील, त्यांचा महोत्सव राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी व्हावा, अशी नाट्याभ्यासकांची अपेक्षा आहे. परंपरेनुसार दरवर्षी सर्वोकृष्ट नाटकं निवडली जातात. त्यांना पुरस्कार देऊन गौरवले जाते, पण त्या नाटकांचे आयुष्य चार ते पाच प्रयोगांतच संपते. ते अल्पायुषी जगणे साठाव्या राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांच्या वाट्याला येऊ नये, ही हौशी रंगकर्मींचीही सदिच्छा आहे.

गोव्यातल्या ‘सौ.’ने गाठली अंतिम फेरी

महाराष्ट्रातील १९ केंद्रांसह गोव्यात होणाऱ्या नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटक या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडले जाते. गोव्यातील स्पर्धा संपली असून, त्यात आठ नाटकांचे सादरीकरण झाले. त्यात माई सावरकर अर्थात सौ. यमुनाबाई विनायकराव सावरकरांच्या मनाची व्यथा मांडणारे ‘सौ.’ हे नाटक फोंडाच्या अथश्री संस्थेने सादर केले. ते पहिले आले आणि साठाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले. ‘सौ.’ हे डॉ. स्मिता जांभळे-आदित्य जांभळे लिखित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित नाटक आहे.

mahendra.suke@esakal.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top