पाकिस्तानच्या राजकारणातील तरुण तुर्क

महेंद्र वेद
शनिवार, 28 एप्रिल 2018

वाढता तरुण मतदारवर्ग, काही तरुणांनी राजकारणाच्या क्षेत्राबाबत दाखविलेले स्वारस्य यामुळे पाकिस्तानच्या पुढच्या दहा वर्षांतील राजकारणाविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ही तरुण नेतेमंडळी पाकिस्तानी राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याइतके प्रभावी होतील का, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित आहे.

वाढता तरुण मतदारवर्ग, काही तरुणांनी राजकारणाच्या क्षेत्राबाबत दाखविलेले स्वारस्य यामुळे पाकिस्तानच्या पुढच्या दहा वर्षांतील राजकारणाविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ही तरुण नेतेमंडळी पाकिस्तानी राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याइतके प्रभावी होतील का, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरित आहे.

पा किस्तानचे भविष्यातील राजकारण कसा आकार घेईल, हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. अनेक कारणांनी भारताला त्याविषयी कुतूहल असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच या संदर्भात तेथील परिस्थितीचे चित्र मांडणे अनाठायी होणार नाही. त्या देशातील मतदार याद्यांचे नुकतेच नूतनीकरण झाले. त्यावरून असे दिसते, की एकूण मतदारांपैकी पन्नास टक्के मतदार हे १८ ते ३५ वयोगटातील आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक ही तरुणांनी लढलेली निवडणूक असेल. झिया ऊल हक यांच्या काळात ज्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आणि परवेझ मुशर्रफ यांच्या कारकिर्दीतही जे टिकून राहिले, ते आता साठीच्या घरात आहेत. पाकिस्तानातील राजकारणात त्यांनी आता नव्या पिढीला प्रोत्साहन द्यायला हवे.

दोन प्रमुख घराण्यांचे वारसदार म्हणजे बिलावल भुट्टो झरदारी आणि मरियम नवाझ शरीफ. हे दोघेही प्रथमच राजकीय संघर्षात उतरत आहेत. पाकिस्तानातील तरुण राजकारण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते देखणे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे आहेत. तेथील राजकारणाचे संकेत त्यांना चांगले अवगत आहेत. १९७२मध्ये सिमला कराराच्या वेळी झुल्फीकार अली भुट्टो यांच्यासमवेत त्यांची कन्या बेनझीर भारतात आली होती, तेव्हा केवळ सतरा वर्षांची होती. तिला भारतात राजदूत नेले जाणार, अशा प्रकारच्या बातम्या त्या वेळच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढे त्यांचा राजकीय प्रवास पंतप्रधानपदापर्यंत झाला. अकरा वर्षांपूर्वी त्यांची हत्या झाली. आता त्यांचा मुलगा बिलावल राजकारणात येण्याची धडपड करतो आहे. आपल्या आक्रमक वक्तृत्वाच्या जोरावर तो लक्ष वेधून घेतो आणि मध्येच राजकीय रंगमंचावरून गायबही होतो. त्याला सामना करावा लागणार आहे, तो मरियम नवाझ शरीफ यांच्याशी. ४४ वर्षीय मरियमदेखील जाहीर भाषणांमध्ये आपल्या बोचऱ्या शैलीने छाप पाडते. विशेषतः आपल्या वडिलांवर होत असलेल्या आरोपांचा प्रतिवाद करताना तिच्या भाषणातील आवेश अधिक जाणवतो. नवाझ शरीफ व त्यांचे कुटुंबीय यांच्यावरील आरोप आणि न्यायालयात गेलेली प्रकरणे यामुळे ते अडचणीत आले असले, तरी मरियम ही नवाझ शरीफ यांचा राजकीय वारसा सांभाळणार, याविषयी कोणालाच शंका नाही. तिला दोन भाऊ असले तरी त्यांना उद्योगधंद्यांत स्वारस्य असल्याने ते राजकारणापासून दूर आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद गमावावे लागल्यानंतर नवाझ शरीफ यांचे भाऊ आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज हे पंतप्रधान होणार, अशी जोरदार चर्चा होती. परंतु तसे झाले असते तर त्यांचा मुलगा हमजा याच्याकडे वारसा गेला असता. दोन चुलत भावंडांमध्ये राजकीय रस्सीखेच झाली असती. नवाझ यांना ही पुढची शक्‍यता लक्षात आल्याने त्यांनी शहाबाज यांना संधी नाकारली असावी. अर्थात शरीफ कुटुंबीयांमध्ये दरी पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले असले तरी ते सलोख्याने राहात आहेत. नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर मरियम हिने पोटनिवडणुकीत आपल्या आजारी आईसाठी जोरदार प्रचार केला होता. मरियम उच्चशिक्षित आहे. ‘नाइन इलेव्हन’नंतर पाकिस्तानात वाढलेला मूलतत्त्ववाद हा तिच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय. ओसामा बिन लादेन खरेच मेला आहे का, असा प्रश्‍नही तिने त्यात उपस्थित केला आहे; अर्थात उपरोधिकपणे.

एकूणच, हे सर्व उदयोन्मुख तरुण नेते राजकीय क्षेत्रात काम करण्यास सक्षम आणि उत्सुकही आहेत. परंतु त्यांचा आणि इतर स्तरांतील तरुणांचाही प्रवास इतका सरळपणे होऊ शकत नाही. याचे कारण पाकिस्तानच्या राजकीय आणि सामाजिक रचनेत सापडते. बहुतेक आशियाई देशांप्रमाणे पाकिस्तानातदेखील तरुणांना चटकन मान्यता देण्याची वृत्ती नाही. तिथे बुजुर्गांनाच स्वीकारले जाते. शिवाय हा अत्यंत सरंजामी असा समाज आहे. जमिनीवरील मालकी आणि त्यानुसार पदांची उतरंड तिथे आजही प्रभावी आहे. भुट्टो, तारीन, शरीफ, चौधरी, समुरू, लेघारी, तालपूर, खुशरो, झरदारी अशी काही मोजकी राजकीय घराणी प्रस्थापित आहेत. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात जमिनी आहेत. अशी घरंदाज मंडळी, लष्करातील तालेवार व्यक्ती किंवा मुल्ला-मौलवी यांचीच राजकारणात चबढब चालते. सामाजिक बाबतीत सरंजामशाहीचा आणि राजकीय बाबतीत लष्करशाहीचा पगडा असल्याने ज्येष्ठतेला अवाजवी महत्त्व दिले जाते. त्यामुळे तरुणांना राजकारणात येण्यापासून परावृत्त केले जाते. कर्तृत्ववान असाल तर उद्योगात गुंतवून घ्या किंवा लष्करात जा, असे सांगितले जाते; पण राजकारण हा तुमचा प्रांत नाही, असा सगळा रोख असतो. राजकारणात दमदार प्रवेश करण्यासाठी ज्या पूर्वपायऱ्या असतात, त्यांचा पाकिस्तानात अभाव आहे. विद्यापीठ विद्यार्थी निवडणुकांतून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वाला पुढे येण्याची संधी असते. पण या निवडणुकांना तेथे परवानगी नाही. सर्वाधिक दुर्दैवाची बाब म्हणजे देशातून डाव्या आणि उदारमतवादी राजकारणाची मोठी पीछेहाट झाली आहे; परिणामतः चटकन जिथे तरुणांचा वावर वाढू शकतो, असे एक दारच बंद झाले आहे. पाकिस्तानने एकेकाळी तारिक अली यांच्या रूपाने जागतिक युवक चळवळीला नेतृत्व पुरविले; पण त्यानंतर कोणताही युवक नेता पुढे येऊ शकलेला नाही. लष्कराची मर्जी संपादन करू शकणाऱ्यांचा फक्त अपवाद. आयूबखानांच्या मर्जीमुळे झुल्फीकार भुट्टो यांना, तर झिया ऊल हक यांच्यामुळे नवाझ शरीफ यांचा मार्ग सुकर झाला होता. लष्कर हा तेथील सत्तेकडे जाण्याचा मुख्य आधार. इम्रानखान यालाही राजकारणात गंभीरपणे घेतले जाऊ लागले ते लष्कराने त्याची दखल घेतल्यानंतरच. पण हे घडले ते त्याने पन्नाशीत पदार्पण केल्यानंतर!
भारताच्या दौऱ्यावर आलेल्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांचा पोशाख, दागिने आणि त्यांचे दिसणे यांचीच येथील प्रसारमाध्यमांनी जास्त चर्चा केली. आपल्या मुत्सद्देगिरीपेक्षा याच गोष्टींना महत्त्व दिला जावे, या गोष्टीचे त्यांना वैषम्य वाटले होते. तरुण नेत्यांना पाकिस्तानातही फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. अर्थात खार यादेखील राजकीय घराण्याचा वारसा असल्यानेच राजकारणात आल्या आणि ‘सुरक्षित’ मतदारसंघ लाभल्याने वारंवार निवडून येतात. अन्य काही तरुण नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान सैद युसूफ रझा गिलानी यांची मुलगी सईद फिझा बतूल गिलानी रझा गिलानी, खैबर पख्तुनवा प्रांतातील ‘इन्साफ स्टुडंट्‌स फेडरेशन’चा अध्यक्ष मुराद सईद, ‘पाकिस्तान तेहेरिक ए इन्सान’च्या आयेशा वझीर, याच पक्षाच्या नाझ बलूच, सिंध प्रांतातील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तरुण नेत्या कृष्णा कुमारी कोहली आदी काही नावांचा उल्लेख करता येईल. बिलावल, मरियम तसेच इम्रानखानमुळे पुढे आलेली काही तरुण नेतेमंडळी पाकिस्तानी राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याइतके प्रभावी होतील का, हा खरा प्रश्‍न आहे. कारण यातील बहुतांश अभिजन वर्गातील आहेत. त्यांना घराणे आणि संपत्तीचा वारसा आहे. ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’मुळे कोट्यधीश घराणी पुढच्या दहा वर्षांत आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याने तरुण नेत्यांचे हे वर्तुळ विस्तारेल; पण त्या देशात परिवर्तनाची पहाट आणण्यासाठी ते कारणीभूत ठरेल काय, हे आत्ता सांगता येत नाही, याचे कारण त्यासाठी रचनात्मक बदलांचीच गरज आहे. तूर्त दिसताहेत ते आशेचे काही किरण.

Web Title: mahendra ved wirte pakistan politics article in editorial