वसंतराव नावाचं सुरेल घराणं...

ज्येष्ठ शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट आजपासून (ता. १) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Rahul Deshpande
Rahul DeshpandeSakal
Updated on
Summary

ज्येष्ठ शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट आजपासून (ता. १) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- महिमा ठोंबरे

ज्येष्ठ शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट आजपासून (ता. १) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्त वसंतरावांचे नातू आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्याचा गोषवारा.

गप्पांमधून सुचली चित्रपटाची संकल्पना

संगीत नाटकात काम करताना निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, प्रियांका बर्वे या तरुण कलाकारांशी गप्पा मारताना मी त्यांना आजोबांचे म्हणजेच वसंतराव देशपांडे यांचे किस्से सांगत असे. त्यावेळी एका दौऱ्यात मी निपुणला आजोबांवर चित्रपट करुया का, अशी विचारणा केली. उत्तम गोष्ट तयार होत असेल, तर नक्की करुया, असे म्हणत त्यानेही होकार दिला. निपुणने माझ्याशी, माझ्या बाबांशी बरीच चर्चा केली, सखोल अभ्यास केला आणि तीन महिन्यांनंतर पटकथा तयार करुन मला ऐकवली. ती ऐकताक्षणी मी भारावून गेलो आणि मग चित्रपट करायचे नक्की झाले.

चित्रपटाचा प्रवास

चित्रपट करायचे ठरल्यावर खरे तर मी आणि निपुण, हे दोघेच प्रारंभी चित्रपटाचा भाग होतो. त्यावेळी चित्रपट माध्यमात आम्ही दोघेही तुलनेने नवखे असल्याने चार वर्षे आम्हाला निर्माते मिळत नव्हते. त्यानंतर शेखर गोखले भेटले आणि त्यांनी निर्मितीसाठी होकार दिला. पुढे अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ या आणि इतर कलाकारांची भूमिकांसाठी निवड झाली. संगीत दिग्दर्शनाचा प्रश्न आल्यावर वसंतरांवाचं गाणं कळणारी व्यक्ती त्यासाठी हवी होती. त्या व्यक्तीने या सगळ्या अभ्यासासाठी वेळ देणं गरजेचं होतं. मात्र एवढा वेळ द्यायला कोणी तयार नव्हतं. मग मी दोन गाण्यांना चाली देऊन पाहिल्या, निपुणला आणि निर्मात्यांना त्या आवडल्या आणि मीच संगीत देईन, असं ठरलं. चित्रीकरण ६२ दिवस सुरू होते. वसंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे २०२०मध्ये खरंतर चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनामुळे तो लांबणीवर पडले आणि तो आता प्रदर्शित होत आहे.

‘माझं घराणं माझ्यापासूनच...’

वसंतराव देशपांडे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. हे नाटक त्यांच्या ४७ व्या वर्षी आलं आणि ६०व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यामुळे या तेरा वर्षांतीलच वसंतरावच लोकांना परिचित आहेत. त्यापूर्वीचे वसंतराव लोकांना फारसे माहिती नाहीत. शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, अभंग, गझल, ठुमरी, लावणी असे सगळे संगीतप्रकार ते लीलया गात. त्यांना उर्दू लिहिता, वाचता येत असे. उर्दू साहित्याबद्दल ते चर्चा करत. त्यांना कथक उत्तम येत असे. हे पैलू लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं’, असं वाक्य चित्रपटात त्यांच्या तोंडी आहे. हा त्यांचा केवळ अभिमान नव्हता, तर तसा दुर्दम्य आत्मविश्वास होता.

‘वसंतराव’ साकारताना...

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने ज्यावेळी मला ‘वसंतरावां’च्या भूमिकेसाठी विचारले, त्यावेळी मीही साशंक होतो. अन्य अभिनेत्याला विचारुया, असेही सुचवले. मात्र, निपुणने तूच या भूमिकेसाठी योग्य आहेस, असे सांगितल्यावर मी तयारी सुरू केली. मात्र चित्रीकरणाला सुरूवात झाल्यावर मी वसंतरावांच्या व्यक्तिरेखेकडे आजोबा म्हणून न पाहता स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून पाहिले. संहितेत, पटकथेत, संवादात ज्या पद्धतीने भूमिका रेखाटली आहे, त्याच पद्धतीने ती साकारायचा मी प्रयत्न केला. अगदी ठरवून वसंतरावांचा आवाज काढण्याचा प्रयत्नही मी केला नाही. एकदा भूमिकेचा सूर सापडल्यानंतर त्यात समरस होऊन काम करू शकलो.

चरित्रपट अन् वादांचे समीकरण

यापूर्वी कलाकारांच्या आयुष्यावरील चरित्रपटांवरून वाद झाले आहेत, हे खरे आहे. मात्र यास अपुरे संदर्भ हे कारण आहे. या चित्रपटांमध्ये प्रमुख व्यक्तिरेखेसह त्याच्याशी निगडीत इतर कलाकारांचे संदर्भ येतात. परंतु, चित्रपटाच्या मर्यादेत या इतर व्यक्तिरेखांना पुरेसा न्याय देता येत नाही. परिणामी, त्या एक-दोन प्रसंगातून त्यांच्याविषयीचे ग्रह तयार होतात आणि वादाला आमंत्रण मिळते. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या बाबतीत आम्ही हे टाळायचा प्रयत्न केला. वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याशी अनेक दिग्गज कलाकार निगडित होते. परंतु, त्यातील निवडक व्यक्तिरेखांना आम्ही चित्रपटात स्थान दिले आहे.

आयुष्याचा समतोल

कलाकाराच्या जीवनावरील चित्रपट काढताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याला महत्त्व द्यायचे की कलात्मक जडणघडणीला, असा प्रश्न असतो. आम्ही या चित्रपटात दोहोंत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. याचे कारण वसंतराव हे कलाकार म्हणून महान होते. त्यामुळे ते कंगोरेही उलगडले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष केला. त्यांच्यातील कलाकाराला मान्यता मिळेपर्यंत त्यांची होणारी घालमेल वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम करत असे. ते त्यांच्या मुलांना ‘वडापाव विका, पण गवई होऊ नका’, असा सल्ला देत असत. हेही प्रेक्षकांसमोर येणे महत्त्वाचे वाटल्याने वैयक्तिक आयुष्यालाही यात समान स्थान दिले आहे.

पु. ल. आणि वसंतरावांचे ऋणानुबंध

पु. ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे हे जिवलग मित्र. होते. वसंतरावांनी इतर सर्व व्यवहार सोडून पूर्ण वेळ गाण्याकडे वळावे, असा पु. लं.चा आग्रह होता. त्यांना वसंतरावांच्या गाण्याबद्दल आस्था होती. पु. ल. म्हणायचे की, ‘‘पिकासोला जसा ‘मी काढतो तीच चित्रकला’, असा आत्मविश्वास होता, तसाच मी गातो ते गाणे, असा वसंताचा (वसंतरावांचा) आत्मविश्वास आहे. त्यामुळे पु. ल. आणि वसंतराव यांचं नातं अगदी निखळ होतं. हेच नातं चित्रपटातून पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com