स्वानुभवांच्या सच्चेपणालाच मोल

ममता बोल्ली
शनिवार, 30 मार्च 2019

सांस्कृतिक क्षेत्राला नवी पालवी फुटल्याचं आल्हाददायक चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे. मोठ्या शहरांतच आढळणाऱ्या नृत्य-नाट्य, संगीतासारख्या कलांची पाळंमुळं छोट्या गावांतही विस्तारत आहेत. तरुण-तरुणींच्या प्रयोगशील धडपडीमुळे कलाक्षेत्र ऊर्जावान झालं आहे. मुंबईसारख्या महानगरापासून नगर, साताऱ्याकडच्या गावांपर्यत कल्पकता, सर्जनशीलता आणि प्रतिभेचे वरदान लाभलेल्या तरुणांच्या कलेला भरभरून दाद मिळतेय. नाटक, संगीत, साहित्य, नृत्य अशा कलाविश्‍वात नवनवे सौंदर्यवान प्रयोग होत आहेत.

सांस्कृतिक क्षेत्राला नवी पालवी फुटल्याचं आल्हाददायक चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे. मोठ्या शहरांतच आढळणाऱ्या नृत्य-नाट्य, संगीतासारख्या कलांची पाळंमुळं छोट्या गावांतही विस्तारत आहेत. तरुण-तरुणींच्या प्रयोगशील धडपडीमुळे कलाक्षेत्र ऊर्जावान झालं आहे. मुंबईसारख्या महानगरापासून नगर, साताऱ्याकडच्या गावांपर्यत कल्पकता, सर्जनशीलता आणि प्रतिभेचे वरदान लाभलेल्या तरुणांच्या कलेला भरभरून दाद मिळतेय. नाटक, संगीत, साहित्य, नृत्य अशा कलाविश्‍वात नवनवे सौंदर्यवान प्रयोग होत आहेत. ‘संगीत देवबाभळी’सारखं दोन अंकी नाटक असो, वा ‘लाली’सारखी एकांकिका; तरल अभिनयाने आणि काळजाला हात घालणाऱ्या लेखनाने त्या प्रभावी वठतात. विशेष म्हणजे, नाटक-एकांकिकांमध्ये प्रमाण भाषेची लोकप्रियता असलेला एक काळ होता. होता असंच म्हणावं लागेल, कारण अलीकडे विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागातील बोलीभाषा आपला वेगळा गोडवा कलेतून दाखवत आहेत. हे अस्सल मातीतील लेखन रसिकांना अधिक भिडतं आहे. गंमत म्हणजे, अशा प्रायोगिक एकांकिकांचा जीव छोटाच असतो; पण लेखक-दिग्दर्शक आपल्या प्रतिभेनं त्याचं सादरीकरण करतात, तेव्हा तो अफलातून नयनरम्य प्रयोग होतो. राज्यभरातील एकांकिका स्पर्धांत गाजणाऱ्या ‘मॅट्रिक’, ‘पॉज’, ‘एकादशावतार’ या एकांकिका याची उदाहरणं आहेत. बऱ्याचदा तांत्रिकदृष्ट्या सशक्त संस्था नाट्यप्रयोगात नेपथ्य, प्रकाशयोजनेचा खूप वापर करतात. मग वाटतं, यामुळं नाटकाची उंची वाढते असं वाटत असेल, तर ‘सजेस्टिव्ह’ नेपथ्य, कोणत्याही ‘गिमिक्‍स’शिवाय केलेलं सादरीकरण अधिक वरचढ नाही काय? बदलत्या काळानुसार या सगळ्यांचा समावेश सादरीकरणात होणारच. पण नाटकाचा गाभा असलेले लेखन आणि अभिनयाला दुय्यम स्थान असू नये.

सांस्कृतिक क्षेत्रात कायम टिकून राहायचं असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही. यामध्ये ‘गुगल गुरू’ मोठी मदत करतो. आत्ताचे जवळजवळ सर्वच तरुण कवी ‘ब्लॉग’ लिहितात, कविता ‘फेसबुक’वर पोस्ट करतात. यातूनही अनेकांना प्रेरणा मिळत असते; अनेक हात लिहिते होत आहेत. यातील काही थोडे तरुण वगळले तर बहुतेकांचं लेखन हे त्यांचं स्वतःचं अनुभवविश्‍व मांडणारं आहे. त्याची ताजी भाषा आजची आहे. त्याचं लेखन फार आलंकारिक नसून, रोजच्या जगण्यातील संदर्भानं समृद्ध झालेलं आहे. त्यामुळे ते साधं-सोपं, ‘दिल को छू लेनेवालं’ असंच असतं. आणखी एक विशेष बाब म्हणजे आजचा तरुण विविध भाषांमधलं साहित्य वाचतो. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी; तसंच स्पॅनिश, जर्मन भाषेतून झालेले अनुवादही त्याच्या वाचनात येतात. अशा वाचनानं वैचारिक बैठक पक्की होते. साहजिकच त्याचं लेखनही मौलिकता प्रदान करणारं ठरतं.

नृत्य आणि संगीत क्षेत्रामधला तरुण ‘घराण्यां’मध्ये अडकून न पडता उत्तमतेचा ध्यास घेतलेला, चौकटीबाहेरचं शोधणारा कलासक्त आहे. एकाच गुरुकडून ज्ञान घ्यावं ही ‘कन्सेप्ट’च आता मागे पडलीये. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते ग्रहण करण्याच्या विचाराला प्राधान्य दिलं जात आहे. पारंपरिक रचना आणि पाश्‍चात्त्य शैलीचा प्रभाव यांचा सुरेख मिलाफ त्यामुळे यात दिसून येतो. सुंदर शब्दकळा असणारा ‘रॅप’ही लोकप्रियतेचं वादळ उठवतो.

असे हे सगळे नवे प्रयोग करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास आहे. तो द्विगुणित होतो तो रसिकांच्या प्रतिसादातून. आज जशी अभिव्यक्तीची माध्यमं बदलत आहेत, तशीच प्रतिसादाचीही बदलत आहेत. ‘लाइक्‍स’, ‘कमेंट्‌स’, ‘यू-ट्यूब सबस्क्रिप्शन’, ‘इन्स्टाचे फॉलोअर्स’ या साऱ्या गोष्टी त्याला घरबसल्या ‘स्टार’ बनवतात. यामधूनच ‘भाडिपा’सारखा ‘स्टॅंडअप कॉमेडी’चा कार्यक्रम ‘फुल हिट’ झाला आहे. त्यातील कलाकार रोजच्या जीवनातले किस्से रंगवून सांगत असतो. त्याला प्रेक्षकांचा ‘फीडबॅक’ मोठा मिळतो. नाटकाकडून ‘टीव्ही सीरियल’, चित्रपटाकडे वळताना तरुणांना त्यामधलं एक सुंदर स्टेशन गवसलंय आणि ते म्हणजे शॉर्टफिल्म आणि वेबसीरिजचं. सहज उपलब्ध होणारा कॅमेरा (बहुतेक वेळा मोबाईलचाही); एडिटिंगचे सॉफ्टवेअर यामुळे एक नवी जादू हाती गवसलीय, असं म्हणायला हरकत नाही.

असं सगळं खूप ‘पॉझिटिव्ह’, ‘इनोव्हेटिव्ह’ दिसत आहे. पण कलाजगतात वावरताना प्रसिद्धी मिळवणं, रातोरात स्टार होण्याची इच्छा या कामाच्या मुळाशी आहे. अशानं कामातली ‘प्युरिटी’ कमी होते. ज्यातून भरपूर प्रसिद्धी मिळते, तेच करण्याकडं कल वाढतो. मग आपल्याला नेमकं काय मांडायचंय तेच वाहून जातं. स्वतःला अशा वाहून जाण्यापासून रोखणं आणि आतल्या मूळच्या झऱ्याला प्रवाहित ठेवणं हे आजच्या पिढीसमोरचं आव्हान आहे. स्वतःचे अनुभव कलाकृतीतून मांडले की तिची सच्चाई रसिकांना भिडतेच. आपण मग कायमचे ‘स्टार’ असतो आपल्यासाठीही आणि खऱ्या रसिकांसाठीही!
(लेखिका सोलापूर येथील नाट्य कलावंत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamta bolli write youthtalk article in editorial