शिशिरात बरसले वसंताचे सूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purnahuti Sangeet Mahotsav

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीत २४ व २५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सव पार पडला. अतिशय रंगलेल्या या संगीत कार्यक्रमातून मनावर उमटलेले भावतरंग.

शिशिरात बरसले वसंताचे सूर

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीत २४ व २५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय संगीत महोत्सव पार पडला. अतिशय रंगलेल्या या संगीत कार्यक्रमातून मनावर उमटलेले भावतरंग.

पं. उल्हास कशाळकर, पं. राकेश चौरसिया, आरती अंकलीकर, संजीव अभ्यंकर, मंजुषा पाटील यांसारख्या मान्यवर कलाकारांच्या अभिजात गायनाने दिल्लीकरांनी डिसेंबरातील हाडे गोठवणाऱ्या थंडीत अभिजात स्वरांची ‘उब’ अनुभवली. पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय व पुण्यातील ‘संगीताचार्य पं. डी व्ही काणेबुवा प्रतिष्ठान’ यांच्या वतीने नवीन महाराष्ट्र सदनात ‘पूर्णाहुती’ हा दोन दिवसीय संगीत महोत्सव पार पडला. या विनामूल्य संगीतोत्सवाला निखळ संगीतानुभूतीचा आस्वाद घेण्यास आतुरलेल्या ‘दर्दी’ दिल्लीकर रसिकांनी आवर्जून हजेरी लावली!

नवीन महाराष्ट्र सदनाच्या हंड्या- झुंबरांनी लखलखणाऱ्या सभागृहात गेल्या विशुद्ध शास्त्रीय संगीताचे सूर गुंजण्याचा हा पहिलाच प्रसंग. प्रस्थापितांबरोबरच नवोदित कलाकारांचे गायन-वादन हेही या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य. पं. विजय घाटे, पं. योगेश समसी यांच्यासह प्रशांत पांडव व विनोद लेले यांची तबलासाथ व विनय मिश्रा आणि अभिषेक शिनकर या तरुण कलावंताचे हार्मोनियम वादन पूरक ठरले. मात्र प्रत्येकी जेमतेम एकेक तास मिळाल्याने श्रोत्यांची आवडत्या कलाकारांना पुरेसे ‘ऐकण्याची‘ इच्छा काहीशी अपूर्ण राहिली.

कृष्णा मुदखेडकर या तरुण कलाकाराच्या गायनाने महोत्सवाला सुरवात झाली. काणेबुवा गुरूकुलातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देणारे मुखेडकर यांनी ‘पूरीया धनाश्री’ गायला. त्यांची स्वर लावण्याची व रागविस्ताराची पद्धती आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे दर्शन यामुळे मुखेडकर यांचे गायन आश्वासक वाटते. त्यांनी विलंबित तिलवाडा तालात ‘अदारंग नित’ हा ख्याल, मध्य त्रितालात ‘आनावे मिल जानावे’ व द्रुत त्रितालात ‘पायलिया झनकार’ ही प्रसिद्ध बंदीश सादर केली.

उस्ताद अली अकबर खॉं यांची संगीत परंपरा पुढे नेणारे तेजेंद्र नारायण मुजूमदार यांचे सरोद वादन रंगतदार ठरले. त्यांनी ‘हिंडोल हेम’ हा अप्रचलित राग मांडला. हिंडोल व मारूबिहाग यांचे मिश्रण असलेला हा राग त्यांनी सुरेलपणे वाजविला. साथसंगत करताना पाळायचे भान नेमके पाळणारे पं. घाटे यांच्या पूरक अशा तबला वादनालाही दाद मिळाली.

आरती अंकलीकर यांनी पहिल्या दिवसातील अखेरचे गायन सादर केले. जयपूर घराण्याच्या अंगाने मांडणी करताना अंकलीकर यांनी केदार रागात ‘पायो पायो‘ ही विलंबित व आपले गुरू दिनकर कैंकिणी यांची ‘रामनाम भजले’ ही द्रुत बंदीश सादर केली. ‘बसंत बहार’ रागातील स्वरचित तराणा गाऊन सांगता करणाऱ्या अंकलीकर यांचे गायन स्वाभाविकपणे रंगले. गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी व त्यामागचा विचार पोहोचविण्याचे कौशल्य ही अंकलीकर यांच्या गायनाची वैशिष्ट्ये अनुभवता आली.

दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सुरवात निशाद व नौशाद हरलापूरबंधूंच्या गायनाने झाली. पं. वेंकटेशकुमार यांच्या गायकीचा वारसा पुढे नेणाऱया हरलापूर बंधूंनी ललत राग सादर केला. त्यांचे गायन आश्वासक वाटले. ललत हा प्रातःकालीन राग. मात्र दिल्लीत त्यांनी सादर केलेला ललत अपेक्षेइतक्या ‘गतीने‘ पुढे गेला नाही. विशेषतः ललत रागात धैवत व निषाद या स्वरांचा जो समतोल साधला जाणे अपेक्षित असते, तेवढा तो वाटला नाही. पं. राकेश चौरासिया यांचे बासरीवादन ‘प्रासादिक’ होते. त्यांनी ‘बसंत मुखारी’ हा राग सादर केला. त्यांचा आलाप- जोड- झाला या तिन्ही टप्प्यातील बासरीवादनात एका प्रकारची आध्यात्मिक अनुभूती व शांतपणाचा अनुभव श्रोत्यांनी घेतला. थंडगार शिशिरातही वसंताचे सूर उल्हसित कसे करतात याचे दर्शन त्यांच्या वादनातून रसिकांना घडले.

विदुषी मंजुषा पाटील यांनी राग वृंदावनी सारंग व राम रतन धन पायो हे भजन सुरेखरीत्या सादर केले. वृंदावनी सारंग मध्ये ‘पिया लागी‘हा विलंबित ख्याल व ‘आली वांकी अखिया’ ही द्रुत बंदीश त्यांनी मांडली. काळजाला भिडणारा स्वर, दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत या वैशिष्ट्यांनी युक्त असलेले पाटील यांचे गायन स्वाभाविकपणे दाद घेऊन गेले. मात्र काहीतरी ऐकायचे राहून गेल्याची भावना मनात आली. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदराव बेडेकर यांच्यासह स्वतः मंजुषा पाटील संयोजकांच्याही भूमिकेत असल्याने ते अव्यक्त दडपण त्यांच्या मनावर असू शकते.

रविवारी दुसऱ्या सत्रात संजीव अभ्यंकर यांनी ‘मारवा’ हा सायंकालीन राग सादर केला. दिल्लीतील वातावरण ‘मारवा‘ रागासाठी अतिशय पूरक ठरले. त्यांनी ‘पिया मोरे’ हा विलंबित ख्याल आणि ‘उनबिन सुनो लागत मेरो धाम’ ही द्रुत त्रितालातील बंदीश सादर केली. अचल मानला जाणारा ‘पंचम’ स्वर वर्जित असणाऱ्या मारवा रागात एका प्रकारचे ‘वातावरण निर्मिती’चे सामर्थ्य असते. संजीव अभ्यंकर यांच्यासारखे कलाकार या रागातील मुळातील सौंदर्य अधिक खुलवतात. पं. जयराज यांच्या प्रासादिक गायनाचा वारसा पुढे नेणाऱ्या संजीव अभ्यंकर यांच्या गायनात त्यांचा स्वतःचाही ‘विचार’ ठळकपणे डोकावत असल्याची सुखद अनुभूती मिळाली. आग्रा घराण्याच्या भारती प्रताप यांनी झिंझोटी राग सादर केला.

पं. कशाळकर यांच्या तपस्वी सुरांनी या महोत्सवाची पूर्णाहुती झाली. त्यांनी ‘काफी कानडा’ हा फारसा न गायला जाणारा राग व नंतर भैरवी सादर केली. या अनवट रागातील सौंदर्य कशाळकरांनी उलगडून दाखवले. ‘काफी कानडा’मध्ये काही विशिष्ट स्वरसमूह असे आहेत, की त्यांना रसिकांची हमखास दाद मिळते. पण केवळ तेवढेच सादर करण्यापेक्षा या रागातील सौंदर्यस्थळे दाखवत त्यांनी मनाचा ठाव घेतला. राहूल सोलापूरकर यांनी निवेदनाची जबाबदारी नेमकेपणे सांभाळली.

टॅग्स :Editorial Articlemusic