राज आणि नीती : एका देशाच्या जन्मकळा!

पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाइट राबवण्याआधीची घटना! पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीसाठी सदस्य निवडण्याकरता ७ डिसेंबर १९७० रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली.
Jagjitsinh Arora and Amir Abdul Khan
Jagjitsinh Arora and Amir Abdul Khansakal

बांगलादेशाच्या स्वातंत्र्याकरिता अत्यंत योजनाबद्ध रीतीने यंत्रणा राबवली गेली. भारतीय लष्कराने स्थलांतरितांच्या मदतीने प्रभावी व्यूहरचना करून चपळाईने हालचाली केल्या आणि त्यातून नव्या देशाचा जन्म झाला. पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण.

भारतीय उपखंडाच्या इतिहासात १९७१ हे वर्ष अत्यंत परिणामकारक असेच म्हणावे लागेल. पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने २५ मार्च १९७१ रोजी ‘ऑपरेशन सर्चलाईट’ आरंभले आणि रात्रभरात सात हजारांवर बंगाली बुद्धिवादी आणि लोकमताचे निर्माते यांचे एकट्या ढाका शहरात शिरकाण केले. मृत्युंजय देवरत यांचा अत्यंत वेदनादायक आणि वास्तवदर्शी असा ‘द बास्टर्ड चाइल्ड’ (२०१४) हा युद्धाचे परिणाम भोगणाऱ्या मुलांबाबतचा चित्रपट आहे. त्या वेळी पाकिस्तानी लष्कराने केलेले अनन्वित अत्याचार आणि बलात्कार व त्याद्वारे पूर्व पाकिस्तानात वांशिक संहाराचा केलेला अश्लाघ्य प्रयत्न हृदय हेलावून टाकतो. या काळरात्रीनंतर नऊ महिन्यांनी पूर्व पाकिस्तानातील नागरिकांच्या यातना संपल्या. पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली. जनरल अमीर अब्दुल खान नियाझी यांच्या नेतृत्वाखालील ९३ हजार पाकिस्तानी सैन्याला युद्धकैदी केले गेले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये दक्षिण आशियात एक नवा नकाशा साकारला आणि जनरल (नंतर फिल्ड मार्शल) सॅम माणेकशा सदासर्वकाळाचे हिरोच बनले.

पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाइट राबवण्याआधीची घटना! पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीसाठी सदस्य निवडण्याकरता ७ डिसेंबर १९७० रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरची ही तशी पहिलीच आणि बांगलादेशाच्या स्वातंत्र्याआधीची शेवटचीच निवडणूक म्हणावी लागेल. सर्व तीनशे मतदारसंघांसाठी मतदान झाले. यातील १६२ जागा या पूर्व पाकिस्तानातील, तर उर्वरित १३८ जागा पश्चिम पाकिस्तानातील होत्या. पूर्व पाकिस्तानातील १६२ पैकी १६० जागा पटकावण्यात शेख मुजबूर रेहमान यांच्या अवामी लीग पक्षाला यश मिळाले. पाकिस्तान पीपल्स पक्षाने केवळ ८१ जागाच जिंकल्या, त्यादेखील पश्चिम पाकिस्तानातील.

पाकिस्तानचे लष्करशहा जनरल याह्याखान यांनी मतदारांच्या कौलाला स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांनी समारंभपूर्वक नवीन नॅशनल असेंब्ली स्थापन केली. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे झुल्फिकार अली भुट्टो आणि याह्याखान या दोघांनाही शेख मुजबूर रेहमान यांच्या अवामी लिगची राजवट येणे नको होते. जनरल याह्याखाननी फितूर झालेले पूर्व पाकिस्तानातील नुरूल अमीन यांना पंतप्रधानपदी बसवले. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि अवामी लीग यांच्यातील वादातील निकाल लागेपर्यंतची व्यवस्था म्हणून पदावर राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

शिरकाणाची योजना

सुगीच्या कापणीची वेळ आली आणि नेमके त्याचवेळी, पश्चिम पाकिस्तानातील लष्करी जनरलांची बैठक झाली. त्यांच्यात एकमताने अवामी लीग आणि त्याच्या समर्थकांच्या निर्दालनावर शिक्कामोर्तब केले गेले. तो दिवस होता २२ फेब्रुवारी १९७१. बंगाली विरोधाची धार बोथट करण्यासाठी व्यापक शिरकाण हेच उत्तर या जनरलना सापडले होते. फेब्रुवारीच्या त्या बैठकीत ‘तीस लाख बंगालींचे शिरकाण करा,’ असे याह्याखान यांनी सुनावले, त्याच दमात त्यांनी, ‘उरलेले आपोआप आपण बोलू तसे वागतील,’ असे विधान केले होते.

पश्चिम पाकिस्तानातील जनरलनी आपल्या सैन्याला अत्यंत दुराग्रही, कठोर शब्दांत आपल्याच देशबांधव आणि मुस्लिमांवर अत्याचार कसे गरजेचे आहेत, हे युक्तिवादाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पायदळातील सैन्यावर, ‘ही शुद्धता आणि अशुद्धता यांच्यातील लढाई आहे... तेथील लोकांना मुस्लिम नावे आहेत, ते स्वतःला मुस्लिम समजतातही... पण हृदयाने ते हिंदूच आहेत. त्यांची आता आपण वर्गवारी करत आहोत... जे कोणी राहतील ते खरोखरच मुस्लिम असतील, आपण त्यांना उर्दूही शिकवू,’ अशी भूमिका बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. लूट, बलात्कार, शिरकाण आणि हिंसाचारातून अराजक निर्माण करण्यासाठी मुस्लिमांनाच हिंदू लेबल चिकटवले गेले. जनरल याह्याखानच्या आदेशानुसार अत्यंत निर्घृणपणे तीस लाख लोकांचे २५ मे १९७१ पर्यंत शिरकाण केले गेले, सुमारे एक कोटी लोकांनी भारतात आश्रय घेऊन आपला जीव वाचवला. म्हणूनच, २५ मे १९७१ रोजी ऑपरेशन सर्चलाइट राबवले गेल्याने, स्थलांतरिताबाबत तयार केलेल्या आसाम करारात ही तारीख परिच्छेद ५.८ मध्ये नमूद आहे. निरपराध, असहाय आपल्या बांधवांवर होणारे अत्याचार पाहणे सहन न झाल्याने ईस्ट पाकिस्तान रायफल्स आणि पूर्व पाकिस्तान पोलिस दलातील सैन्याने त्वरेने अत्याचाराविरोधात बंडाचे निशाण फडकावले. त्यांनी आपापल्या बटालियन्स आणि रेजिमेंटला रामराम ठोकून विरोधी चळवळ आरंभली.

अशा परिस्थितीत तातडीने मदतीची यंत्रणा सक्रिय करण्यासाठी कमांड हेडक्वार्टरच्या हालचाली गतिमान करायची गरज होती. त्यासाठी ते कोलकत्यात सुरू केले आणि त्याचा समन्वय परकी भूमीवरील पूर्व पाकिस्तान सरकारशी ठेवला गेला. लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख जनरल जगजितसिंग अरोरा यांना त्यासाठी भारतीय ताफ्याचे सुप्रीम कमांडर केले, त्यांच्या नियंत्रणाखालीच मुक्तिवाहिनी, प्रतिकारी फौजही कार्यरत होती. पूर्व भारतावर पावसाळ्याचे ढग जमू लागल्यावर पूर्व पाकिस्तानच्या मुक्ततेसाठी अत्यंत कमी वेळात प्रभावी, तंतोतंत अमलात आणता येईल, अशी योजना आखली गेली. त्याकरता पूर्व पाकिस्तान अकरा सेक्टरमध्ये विभागला, त्याचे पुन्हा उपसेक्टर केले, जेणेकरून कोणत्याही कार्यवाहीत कमतरता राहणार नाही.

पूर्व पाकिस्तानातून प्रशिक्षित आणि बिगर प्रशिक्षित विरोधक लढवय्या स्थलांतरितांचे जथेच्या जथे येत होते. त्यांना तीन ब्रिगेडमध्ये संघटित केले, गनिमी काव्याने लढणाऱ्यांनाही एकत्र केले. पूर्व पाकिस्तानच्या एकदम टोकाच्या ईशान्य सीमेवर ‘झेड फोर्स’ ठेवली, तिचे लक्ष्य सिल्हेट होते. तर ‘एस फोर्स’ला पूर्व पाकिस्तानच्या पूर्व सीमेवर ठेवले. त्यांचे लक्ष्य अखुरातील अडथळे दूर करून आशूगंज स्वतंत्र करणे होते. अगरताळ्याच्या दक्षिणेलाही एक तुकडी तैनात केली गेली. त्यांचे उद्दिष्ट क्युमिला आणि छोटूग्राम जिंकणे होते.

नेमके हल्ले

भारतीय लष्कर जेव्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होईल तेव्हा पूर्व पाकिस्तानातील स्वातंत्र्य सैनिकांनाही पारंपरिक लष्करी कारवाईचा अनुभव मिळेल, यासाठी कमी कालावधीत ही योजना तयार केली. मुक्तिवाहिनीतील ही सगळी मंडळी त्या भागाची चांगली माहिती असलेली, तेथील भूगोल जाणणारी होती. त्यामुळे त्यांच्या मदतीने रझाकारांच्या विरोधाची धार कमी करणे, जेणेकरून भारतीय लष्कर अत्यंत वेगाने थेट ढाक्यापर्यंत धडक मारू शकेल, अशी ही योजना होती. पश्चिम पाकिस्तानच्या लष्करात घबराट निर्माण करण्याकरता २१ नोव्हेंबर १९७१ रोजी मुक्तिवाहिनीच्या लोकांनी आपली मोहीम सुरू केली, त्यासाठी अत्यंत सावधपणे आणि बिनचूक ठरतील, असे हल्ले केले, त्यालाच आजच्या भाषेत ‘सर्जिकल स्ट्राइक’ही म्हणता येईल. ३० नोव्हेंबरच्या आसपास पश्चिम पाकिस्तानच्या लष्करालाही भारतीय सैन्याच्या हल्ल्याची आणि त्यांच्या माऱ्याची बऱ्यापैकी कल्पना आली होती. ३० नोव्हेंबरच्या रात्री आणि १ डिसेंबर १९७१ रोजी हल्ल्यांना प्रारंभ केला गेला, १६ डिसेंबर रोजी ढाका भारतीयांच्या ताब्यात आले. अशा प्रकारे बांगलादेशचा जन्म झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com