प्रभुभक्‍ती 

प्रभुभक्‍ती 

प्रभू येशू ख्रिस्तांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतात की, एकदा एका स्त्रीला व्यभिचाराच्या आरोपाखाली दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा झाली. करुणामूर्ती येशू त्या ठिकाणी पोचले; तेव्हा ती स्त्री खाली मान घालून उभी होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आपली बाजू घेईल; असा कुणी भद्र पुरुष तिच्या नजरेस येत नव्हता. तिला मारण्यासाठी उद्युक्‍त झालेले लोक तावातावाने बोलत होते. दुसऱ्याला दोष देताना मनुष्याला आतून आनंद होत असतो. आपण निर्दोष असल्याचा भास दुसऱ्याला दोष देताना होतो. 

प्रभू येशूंनी उपस्थित सर्वांना आवाहन केले की ती स्त्री दोषी आहे, हे एकवेळ मान्य करूनही तिला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला पोचतो, तो अधिकार फक्‍त अशाच व्यक्‍तीला आहे, ज्याने आयुष्यात कधीच व्यभिचार केला नसेल... मनात आणि कल्पनेतसुद्धा परस्त्रीला भोगाच्या नजरेने पाहिले नसेल, त्याने पहिला दगड मारावा... असे सांगताच हळूहळू सर्वांचे हात खाली आले. आपण आरशात पाहात नाही तोवर आपल्याच तोंडावर पडलेला डाग आपल्याला कळत नाही. आरसा दाखविणे हे संतांचे काम असते. येशू ख्रिस्तांबद्दल आणखी एक कथा मी ऐकली... ते ईश्‍वर भक्‍तीकडे लोकांना वळवीत... त्यांना सन्मार्गावर प्रेरित करीत... मनुष्यामध्ये ज्याप्रमाणे चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा वाईट प्रवृत्तीसुद्धा असतात. देव हे सत्प्रवृत्तीचे प्रगटीकरण असेल, तर दानव सैतान हे दुष्ट प्रवृत्तीचे प्रगटीकरण असते. 

येशू ख्रिस्तांना सैतान भेटला. तो त्यांना पहाडावर घेऊन गेला. तेथून त्याने विचारले, ""देवावर विश्‍वास आहे ना? तो तुला वाचवेल ना? मग पहाडावरून उडी मार बघू... देव असेल तर वाचवेल. तुझी श्रद्धा आहे ना... की देव आहे... तो रक्षण करेल... मग मार उडी...!'' 
यावर येशू ख्रिस्तांनी जे उत्तर दिले ते अंतर्मूख करणारे आहे. येशू म्हणाले, ""मी पडलो, तर देव वाचवेल. मी उडी मारली, तर वाचवणार नाही'' 
श्रद्धेची एक सुंदर संकल्पना यात आहे. चुकून चूक झाली, तर देव आहे. जाणूनबुजून गुन्हा केला; तर देव वाचवायला येणार नाही. ज्यांच्या नशिबात खोट आहे, त्यांचे नशीब देव सुधारेल. पण ज्यांच्या वृत्तीमध्ये खोट आहे, त्यांना त्याची किंमत चुकवावीच लागेल. 

संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे की, देव गुराख्यासारख्या हातात दंड घेऊन तुमचे रक्षण करीत नाही; तर ज्यांचे रक्षण तो करू इच्छितो; त्यांना सद्‌बुद्धी देतो वाईट कामे करणाऱ्या मनुष्यालासुद्धा स्वत:च्या अंतरात्म्याचा आवाज थांबवित असतो... त्याला दडपून तो कुकर्म करीत असतो. कुकर्माची भरपाई म्हणून थोडा दानधर्मसुद्धा करीत असतो. त्यातून मग कुकर्माच्या शिक्षेतून मुक्‍तीची आशासुद्धा ठेवतो... 
प्रभूंनी नि:संदिग्धपणे सांगितले चुकून पडलो तर देव वाचवेल. जाणूनबुजून उडी मारली तर नाही... कदापि नाही! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com