संस्कृतची तंत्रज्ञानाशी सांगड घालणारा संशोधक 

किशोर जामकर 
सोमवार, 18 डिसेंबर 2017

वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी न्यायशास्त्र, वेदांतशास्त्र व संस्कृतचे चिकित्सक अभ्यासक या नात्याने आपली वेगळी ओळख तयार करणारे डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती सुखावह आहे. त्यांच्या अभ्यासाची दिशा व संशोधनाची व्याप्ती ही नव्य न्यायशास्त्राची नवतंत्रज्ञानाशी सांगड घालणारी आहे. संस्कृतच्या अध्यापनासाठी आवश्‍यक असलेला मजकूर संगणक आणि वेबसाइटवर उपलब्ध करून देणे हाही त्यांच्या कामाचा एक पैलू आहे. त्यांच्या अभ्यासाचे विषय आणि कामाचा पट सारेच अचंबित करणारे आहे.

वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी न्यायशास्त्र, वेदांतशास्त्र व संस्कृतचे चिकित्सक अभ्यासक या नात्याने आपली वेगळी ओळख तयार करणारे डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती सुखावह आहे. त्यांच्या अभ्यासाची दिशा व संशोधनाची व्याप्ती ही नव्य न्यायशास्त्राची नवतंत्रज्ञानाशी सांगड घालणारी आहे. संस्कृतच्या अध्यापनासाठी आवश्‍यक असलेला मजकूर संगणक आणि वेबसाइटवर उपलब्ध करून देणे हाही त्यांच्या कामाचा एक पैलू आहे. त्यांच्या अभ्यासाचे विषय आणि कामाचा पट सारेच अचंबित करणारे आहे. संस्कृतच्या अध्यापनासह प्रशासकीय कामाचाही त्यांना अनुभव आहे.
 
जून 1997 मध्ये बंगळूरच्या पूर्ण प्रज्ञा विद्यापीठात संस्कृत साहित्य, व्याकरण, नवन्याय आणि वेदांत या विषयांच्या अध्यापनाला त्यांनी प्रारंभ केला. न्यायशास्त्राच्या मूलभूत आणि नव्य अशा दोन शाखा आहेत. वरखेडी हे त्यातील दुसऱ्या शाखेत पारंगत आहेत. यानंतर हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीच्या भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्रात संशोधन सहायक म्हणून त्यांनी काम केले. अध्यापन आणि प्रशासकीय कामातील आलेख चढत असताना फेब्रुवारी 2012 मध्ये ते कर्नाटक संस्कृत विद्यापीठात भाषा शाखेचे अधिष्ठाता झाले. मे 2014 पासून या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. 

संस्कृत अध्यापनाच्या निमित्ताने देशभर सभा, संमेलने, परिसंवादात सहभागी होणाऱ्या वरखेडी यांना आतापर्यंत सात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2007 मध्ये त्यांना महर्षी बादरायण व्यास सन्मानाने गौरविण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानात नव्य न्यायशास्त्रातील तांत्रिक भाषेचा वापर हा पीएच.डी.साठीचा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. यासोबतच विज्ञान शाखेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्दांचा कोश त्यांनी तयार केला आहे. 

संस्कृत अध्यापन, तसेच प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव त्यांना संस्कृत विद्यापीठात उपयुक्त ठरेल. केवळ संस्कृत अध्यापनात बंदिस्त असलेल्या विद्यापीठाच्या वाटचालीची दिशा त्यांच्या नियुक्तीनंतर बदलेल आणि ही वाटचाल बहुआयामी असेल, असा नवोन्मेष डॉ. वरखेडी यांच्या नियुक्तीने निश्‍चितच अंकुरित झाला आहे. 

 

Web Title: marathi article editorial pune culture technology dr. shriniwas varkhedi