बदलांच्या 'आखाड्या'त

kusti
kusti

कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जातोय. पुराणकाळातही कुस्ती अर्थात मल्लयुद्ध खेळले जात असे. काळ बदलला तसे कुस्तीचे स्वरूपही बदलले. आता तर स्थिती अशी आहे, की जागतिक स्तरावर हा एक मान्यताप्राप्त असा स्पर्धात्मक व लोकप्रिय खेळ आहे. अनेक देश या खेळात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत असतात. आपल्या देशाला तर कुस्तीचा सोनेरी इतिहास आहे. तो लक्षात घेता कुस्तीतील आजच्या नव्या पिढीकडून अपेक्षा आहेत. देदीप्यमान परंपरेमुळे आपल्याला जी अनुकूलता लाभलेली आहे, ती लक्षात घेता या अपेक्षा आणखी वाढतात. त्या प्रमाणात अपेक्षित यश मिळते आहे, असे म्हणता येणार नाही. खरे म्हणजे यावर सखोल विचार केला पाहिजे. 

काळाबरोबर बदलण्याचा वेग आपल्याकडे कमी दिसतो. काही कालबाह्य गोष्टी तशाच चालू आहेत. जुन्या व्यायाम पद्धती, खेळातले जुने डाव यातून बाहेर पडायला हवे. या खेळातही नवनवे संशोधन झाले पाहिजे आणि त्याचा अंगीकार केला पाहिजे. लहान वयातच खेळाडूंची गुणवत्ता शोधून त्याच्यातील कलेला आकार देण्यासाठी व्यापक आणि समग्र प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याकडे गुणवत्तेची कमतरता नाही. ग्रामीण भागातही ही गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला पैलू पाडण्याचे काम आणखी नेमकेपणे व्हायला हवे. खरे तर शालेय स्तरापासूनच खेळाडू हेरले पाहिजेत. शाळा आणि खेळ दोन्हींतही मेळ साधण्याचे काम तसे अवघड असते; पण खेळाडूंना या दोन्ही आघाड्यांवर जास्तीत जास्त सुविधा देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. योग्य वेळी संधी उपलब्ध करून देणे हा भागही महत्त्वाचा. परदेशात मल्लांना शाश्‍वत भविष्यकाळासाठी आधार दिला जातो. त्या प्रकारची व्यवस्था आपल्याकडेही हवी. 

खेळाडूंना सर्व प्रकारचे पाठबळ मिळाले, तर त्यांना खेळावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. आपल्याकडे चित्र वेगळे आहे. काही वेळा व्यायामासाठी पळायला जाताना बूटही नाहीत, अशी स्थिती काहींच्या बाबतीत दिसते. मॅटची उपलब्धता हाही एक प्रश्‍न आहे. पुरेशा संख्येने तज्ज्ञ आणि त्यांचे मार्गदर्शन या तर मूलभूत बाबी आहेत. पण त्यातही कमतरता जाणवते. बऱ्याचदा खेळाडूंची शक्ती अन्य समस्यांना तोंड देण्यातच खर्च होते. त्यात तो खचतो. मग तुम्ही ज्या मोठ्या अपेक्षा बाळगता, त्या पूर्ण होत नाहीत. सरकारच्या स्तरावर योजना जरूर आखल्या जातात; तथापि, त्याच्या अंमलबजावणीच्या पातळीवर स्थिती निराशाजनक आहे. अन्य खेळांना मोठमोठे प्रायोजक असतात. कुस्तीलाही ते मिळायला हवेत. मल्लांना हेरून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होण्याची भारतीय मल्लांकडे क्षमता आहे. वेळेवर संधी मिळणे महत्त्वाचे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. खेळाडूचे खच्चीकरण होता कामा नये. कुस्तीच्या बाबतीत एकाग्रता हा सर्वांत महत्त्वाचा गुण. ती वाढवण्यासाठी खेळाडूला सर्वच आघाड्यांवर पाठबळ देण्याची गरज आहे. खेळाडूचा खुराक, मसाज, त्याची विश्रांती, तसेच कुस्तीतील नवे डाव यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. 

पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी या कलेला प्रोत्साहन दिले, मदत केली. तालमींचे आखाडे सुरू केले. रोममधील कुस्तीचे मैदान पाहून आल्यानंतर शाहू महाराजांना वाटले, की या प्रकाराची मैदाने आपल्या कोल्हापूर संस्थानमध्येही असली पाहिजेत. त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात साकारलीही. कोल्हापूरच्या खासबागेत असलेले मैदान आजही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते. या प्रकारचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कुस्ती कला वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी तिला पूर्वी राजाश्रय होता, तसा आता सरकारचा आश्रय हवा आहे. आज जागतिक पातळीवर कुस्तीतील स्पर्धा व आव्हाने मोठी आहेत. ऑलिंपिक, राष्ट्रकुल, वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा स्पर्धांवर लक्ष केंद्रित करून आपणही मोठे ध्येय ठेवले पाहिजे. 

वास्तविक महाराष्ट्र ही मल्लांची खाण आहे. महाराष्ट्र केसरीपदाची स्पर्धा ही राज्यात मानाची मानली जाते. ही स्पर्धा तर महत्त्वाची आहेच; पण त्याबरोबरीने आपल्या पैलवानांनी जागतिक स्तरावरच्या स्पर्धांची तयारी केली पाहिजे. अत्याधुनिक तंत्र अवगत करणे, कुस्तीतील नवनवीन डावांची निर्मिती करून स्पीड, स्टॅमिना व कौशल्य यांची वाढ होण्यासाठीचे काम झाले पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com