मराठीस ज्ञानभाषा बनविणारे क्रियाशील पंडित

मराठी भाषा विकासार्थ स्वतंत्र मराठी भाषा संचालनालय (आजची मराठी राज्यभाषा संस्था), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोशनिर्मितीस मूर्तरूप देण्याचे आणि मराठी भाषेस ज्ञानभाषा बनविण्याचे कार्य समर्पित वृत्तीने करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची २७ जानेवारीस १२३ वी जयंती साजरी होत आहे.
marathi dyanbhasha laxmanshastri joshi 123th anniversary dhule
marathi dyanbhasha laxmanshastri joshi 123th anniversary dhule Sakal
Updated on

मराठी भाषा विकासार्थ स्वतंत्र मराठी भाषा संचालनालय (आजची मराठी राज्यभाषा संस्था), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोशनिर्मितीस मूर्तरूप देण्याचे आणि मराठी भाषेस ज्ञानभाषा बनविण्याचे कार्य समर्पित वृत्तीने करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची २७ जानेवारीस १२३ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त.

- डॉ. सुनीलकुमार लवटे

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे २७ जानेवारी १९०१ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म झाला. वाई (जि. सातारा) येथील प्राज्ञपाठशाळा या नारायणशास्त्री मराठे उपाख्य स्वामी केवलानंद सरस्वतींच्या संस्कृत पाठशाळेत शिकण्यासाठी आले.

अवघ्या चार वर्षांत वेद, न्याय, अलंकार, आदी प्राथमिक शिक्षण आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे अल्पावधीत पूर्ण केले. त्यानंतर काशी येथे शिक्षण घेऊन १९२३ ला कोलकत्याच्या शासकीय महाविद्यालयातून (आताचे संस्कृत विद्यापीठ) ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली आणि पुन्हा प्राज्ञपाठशाळेत येऊन संस्कृत अध्यापक म्हणून काम करू लागले.

धर्मसुधारणा करण्यात १९२३ पासून अग्रभागी असलेले तर्कतीर्थ यांनी विविध ब्राह्मण, ज्ञाती सभा, धर्म परिषदा, ब्राह्मण महासंमेलनांमधून हिंदू धर्म सुधारणांचा आग्रह धरत मानवकल्याणाची भूमिका मांडली. राष्ट्रहिताचे कार्य करण्याच्या हेतूने ते महात्मा गांधी, राष्ट्रीय काँग्रेसप्रणीत राष्ट्रीय आंदोलनात सामील झाले.

बागलाण सत्याग्रह, ज्यांचे वर्णन ब्रिटिश इंटिलिजन्स रिपोर्टमध्ये ‘मिनी बारडोली सत्याग्रह’ असे केले होत,. त्याचे संघटक व नेतृत्व तर्कतीर्थ यांचे होते. यात गोळीबार झाला होता. तर्कतीर्थ ब्रिटिश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले होते.

पुढे फितुरीने त्यांना अटक झाली व सहा महिने कैद झाली. ४१ रुपये दंडांची शिक्षा होऊन त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली होती. तुरुंगात त्यांची आणि विनोबांची भाषणे, प्रवचने होत. ही भाषणे, वेदांचा नवा अन्वय यामुळे प्रागतिक विचाराने प्रभावित येऊन तर्कतीर्थांच्या नव्या विचारसरणीची प्रशंसा यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या जमनालाल बजाज यांनी त्यांना महात्मा गांधींकडे नेले.

रॉयवादाचा प्रभाव

कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांच्या संपर्कात येऊन तर्कतीर्थ जोशी मार्क्सवादी विचारांशी जोडले गेले. रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘रॅडिकल डेमॉक्रेटिक पार्टी’चे महाराष्ट्र प्रांतिक चिटणीस बनले. १९४८ पर्यंत तर्कतीर्थ रॉयवादी होते.

१९४४ ला या पक्षाच्या विसर्जनानंतर ते १९५० च्या दरम्यान स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले व यशवंतराव चव्हाण यांचे खंदे समर्थक बनले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आक्रमक वळण मिळाले. गोळीबारात १०५ जणांनी प्राणार्पण केले.

पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले तसे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीचे कर्णधार बनले. पुढे आयुष्यभर कोशसंपादन, ग्रंथनिर्मिती, प्रबोधन, इत्यादीद्वारे यांनी मराठी ज्ञानभाषा बनविण्यासाठी उर्वरित आयुष्य समर्पित केले.

१९२३ मध्ये ‘धर्मसंशोधनाची दिशा’ शीर्षकाचा लेख लिहून तर्कतीर्थ जोशी यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ केला. याच विषयावर संस्कृतमध्ये लिहिलेला ‘गु‌द्धिसर्वस्वम्’ प्रबंध बहुचर्चित झाला. त्यांच्या ‘आनंद‌मीमांसा’ (१९२८) आणि ‘जडवाद अर्थात् अनिश्वरवाद’ (१९४१) या नवविचार मांडणी करणाऱ्या विचारांचे,

प्रबंधांचे स्वागत होऊन ते मराठी समीक्षेत दाखल झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळेकर यांनी ते ‘केसरी’चे संपादक असताना ‘आनंदमीमांसा’ची समीक्षा करून त्यांना राज्यमान्यताच प्रदान केली. परिणामी त्यांना मुंबई उपनगर, गोमंतक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

पुढे १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या ३७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. ‘हिंदुधर्माची समीक्षा’ (१९४१) ग्रंथ मार्क्सवादी दृष्टीने केलेल्या लेखनामुळे बहुचर्चित झाला. १९५१ ला प्रसिद्ध झालेल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ ग्रंथास साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. तर्कतीर्थ ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेले पहिले मराठी साहित्यकार होत. वैचारिक, तात्त्विकलेखन ही कथा, कादंबरी, नाटक, ललित साहित्य कृती इतकेच श्रेष्ठ असते हे तर्कतीर्थांनी अधोरेखित केले.

मानवेंद्रनाथ रॉय त्यांना ‘मॅन ऑफ इंडियन रेनासान्स’ म्हणून गौरवत असत. तर महात्मा गांधींनी त्यांचा गौरव ‘मॅन ऑफ ग्रेट लर्निंग अँड स्पॉटलेस कॅरॅक्टर’ अशा शब्दांत केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींनी संस्कृत, मराठीत अनेक प्रबंध, चरित्रे, व्यक्तिलेख लिहिले.

त्यांचा ‘ज्योति-निबंध’ महात्मा फुले यांच्यावरील प्रारंभिक लेखनापैकी एक होय. त्यांनी लिहिलेले ‘ज्योतिचरित्र’ मराठीसह हिंदी, इंग्रजीत प्रसिद्ध झाल्याने महात्मा फुले यांचे जीवनकार्य विश्वपटलावर पोहोचले.

ते शतकभर मुलाखती, सर्वाद्वारे समकालाशी प्रतिक्रिया नि प्रतिसाद देत राहिले. महाराष्ट्राचा विसाव्या शतकाचा सांस्कृतिक इतिहासच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘मराठी विश्वकोश’ (२० खंड), मीमांसा कोश (सातवा खंड), धर्मकोश (२० खंड), पदनाम कोश-३०चे संपादन म्हणजे मराठी कोशनिर्मितीचे सुवर्णयुगच.

त्यांचे ऐतिहासिक साहित्यकार्य म्हणजे संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची (भाग १ व २) आणि भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या मंजूर प्रारूपाचं संस्कृत भाषांतर! शेकडो प्रस्तावना म्हणजे त्यांच्या लोकाश्रित सर्वमान्यतेची निजखूणच.तीच गोष्ट भाषांतर, समीक्षांची पण. या पंडितानी आपल्या वैदिक पांडित्याची पताका अमेरिका, श्रीलंका, ब्रह्मदेश, राहिया, फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांत, शोधनिबंध सादर करत फडकावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com