सारांश : मराठी भाषा किमान 2200 वर्षे जुनी; हा घ्या पुरावा!

संजय सोनवणी 
गुरुवार, 30 मे 2019

माहाराष्ट्री प्राकृतातील "अंगविज्जा'सारखे अनेक ग्रंथ मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या दाव्याला पुष्टी देणारे आहेत; परंतु अशा ग्रंथांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. निदान आता तरी त्यांचा समग्र अभ्यास व्हायला हवा. 

आजच्या मराठीच्या उगम स्रोतांचा विचार करताना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. माहाराष्ट्री प्राकृतात गद्य ग्रंथ नाही असाच दावा केला जात होता; पण ते वास्तव नाही. आजच्या मराठीचे उगमस्थान असलेल्या, संस्कृतपेक्षाही प्राचीन भाषा असलेल्या माहाराष्ट्री प्राकृतातील "अंगविज्जा'सारखे अनेक ग्रंथ उपलब्ध होते; पण त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे प्राचीन मराठीचा सर्वांगीण अभ्यास झालेला नाही, हे स्पष्ट होते. मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळवण्यात ज्या अडचणी येताहेत, त्याला अशा अभ्यासाचा अभाव हेही कारण आहे. 

हालाची "गाथा सतसई' (सप्तशती) हा काव्यसंग्रह आणि गद्यात लिहिला गेलेला "अंगविज्जा' हा ग्रंथ सरासरी एकाच काळातील, म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील. यातील "गाथा सप्तशती' सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात तयार झाला, तर "अंगविज्जा' उत्तरेत कुशाण राजवटीत. संस्कृत जन्माला यायच्या आधी ग्रंथ व काव्य लेखनासाठी विद्वान माहाराष्ट्री प्राकृतालाच प्राधान्य देत. कारण माहाराष्ट्री प्राकृत सर्व प्राकृत भाषांत सर्वश्रेष्ठ मानली जात असे. 

"अंगविज्जा' (अंगविद्या) हा ग्रंथ साठ अध्यायांत असून या ग्रंथात कुशाणकालीन समाज-संस्कृती, नाणी, नावे आणि देवता, समाज व धर्मव्यवस्था, विविध व्यवसाय ते तत्कालीन युद्धशास्त्राबाबतची विस्तृत माहिती मिळते. भाषेच्या दृष्टीनेही या ग्रंथाला एक ऐतिहासिक स्थान आहे. या ग्रंथातील तत्कालीन अनेक शब्द आजही मराठीत थोडासा ध्वनीबदल होऊन आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) थाला, तट्टक (ताट), चम्मक्‍खील्ल (चामखीळ) इत्यादी आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच; पण "कारूकम्म'(कारुकर्म) हा तेव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही "कारू' जातसमूहासाठी वापरला जातो. आजच्या मराठीचा प्रवाह किमान 2200 वर्ष अव्याहतपणे वाहत राहिला असल्याची प्रचिती या ग्रंथामुळे येते. 

"अंगविज्जा'वरून प्रतीत होणारी महत्त्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातिव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. "अंगविज्जे'त "गृहपती' या संज्ञेने हिंदू धर्मातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. दीक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत, तर जैनांना तेव्हा समन (श्रमण) म्हणत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्‍य यांचा समावेश होता. चौथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. ग्रंथकाराने या म्लेंच्छात शूद्र, यवन, शक,
कुशाणांदि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्‍यात जे कोणी वैदिक अथवा श्रमण-मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही हीच मांडणी आहे. मनुस्मृतीही जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा म्लेंच्छांतर्गत समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शूद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा' देतो. 

त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा, वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादींची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. जैन तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्त्वाचे अंग दिसते. त्यांचा गिरिमह नामक सणही असे व त्यात सर्वच भाग घेत असत. काही लोक इंद्र, वरुण, यम यांचीही उपासना करीत. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. अनाहिता, ऐरादित्ती यांसारख्या पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरू झालेली दिसते. 

तत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतानाच शिवमह व रुद्रमह हे उत्सव स्वतंत्ररीत्या साजरे केले जात. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षिणी, नाग-नागीण, गिरिदेवता यांचीही पूजा होत असे.

धनिक व्यापाऱ्यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दीर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे, तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे; तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदी प्राचीन संस्कृतीचे पूजनाच्या रूपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. तत्कालीन वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्त्वाचे स्थान होते.

जैनांच्या देवता द्वीपकुमारी व दिशा कुमारी यांचे उत्सव होत तर जैन धर्मीय, वैदिक वगळता, अन्य धर्मीयांप्रमाणे नागपूजाही मणियार नागाच्या रुपाने करत असत. बहुतेक सर्वांच्याच घरात देवघराप्रमाणे नागघरही असे. बौद्ध स्तुपांचीही त्या काळात महत्ता होती हे सामाजिक वास्तव "अंगविज्जा'मधील स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. यज्ञघरे (यज्ञशाला) मात्र अपवादानेच असत. 

कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा' महत्त्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर ग्रीक ननादेवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. विविध वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची व वाहनांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. "अंगविज्जा' हा जैन धर्मीयाने लिहिलेला ग्रंथ असूनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे.

आरंभीच्या अध्यायात णमोकार मंत्रातून सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार केलेला नाही. त्यामुळे केवळ भाषिक दृष्टीनेच नाही तर इसवी सनाच्या पहिल्या शतकातील समाजव्यवस्थेवर स्वतंत्र व तटस्थ प्रकाश टाकणारा हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.आज मराठी भाषेला जर अभिजाततेचा दर्जा मिळू शकण्यासाठी "अंगविज्जा' हा ग्रंथही "गाथा सप्तशती'च्या तोलामोलाचा एक महत्त्वाचा आधार ठरेल. पण त्यासाठी या ग्रंथाकडे मराठीप्रेमींचे लक्ष तर गेले पाहिजे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Language is 2200 Years Old