वाढायचं राहूनच गेलं... 

sunshine
sunshine

छोट्या-मोठ्या कोणत्याही प्रवासात आपण दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करणं किंवा आपल्याला कुणी ओव्हरटेक करणं ही अगदी नेहमी अनुभवाला येणारी सामान्य गोष्ट...असंच एकदा गावाला जात असताना आमच्या एसटी बसनं एका ट्रकला ओव्हरटेक केलं. मी बाहेरचं धावतं दृश्‍य पाहण्यात रमले होते. सहजच त्या ट्रककडे लक्ष गेलं.

एक तरुण मुलगेलासा ड्रायव्हर ट्रक चालवत होता. त्याच्याकडे बघून असं जाणवलं की त्यानं स्टिअरिंगवर बोटानं ताल धरलाय आणि अंगाची मजेदार हालचाल करत त्या तालावर तो गाणं म्हणतोय..!

ड्रायव्हिंग एन्जॉय करतोय... ओव्हरटेक करणाऱ्या आमच्या एसटीकडं इतक्‍या मजेत पाहात त्यानं "जाओ जाओ' असं म्हटलं, की वाटलं आमचं ओव्हरटेक करणंही तो एन्जॉय करतोय..! काही क्षणांचं ते दृश्‍य त्या मुलाच्या मस्त हावभावांसह स्मरणात राहिलं ! सतत सगळ्याला कंटाळलेली, त्रासलेली, एवढ्या-तेवढ्या गोष्टीवरून हमरीतुमरीवर येणारी बरीच माणसं असतात. पण काही माणसं असं सगळं एन्जॉय करणारीही असतात. 

स्वतः आनंद मिळवणं आणि आपल्या सहज कृतीतून तो दुसऱ्यांना देणं यासाठी लागणारी जिंदादिल ऊर्जा कुठून येत असेल अशा माणसांमध्ये? असं वागणं ठरवून आत्मसात करता येईल काय? निसर्गात आपण पाहतो की फांदीवर पान, फळ, फूल उगवण्याची जागा किंवा बिंदू ठरलेला असतो. फांदीच्या प्रत्येक बिंदूतून पान उगवत नाही. जिथून उगवतं त्या बिंदूला 
उचकटून निघावं लागतं फांदीतून. वाट करून द्यावी लागते पाना-फुला-फळाला. कोणता असतो हा नव्यानं उगवण्याचा नेमका बिंदू? सलगपणात व्यत्यय आणणारी खूण दिसते ना फांदीवर, तिथेच उभा असतो तो मुळांपासून सुरू झालेल्या आंतरिक संघर्षाच्या टोकाशी..! 

आपल्यावर अचानक आलेलं संकट, वाट्याला आलेलं दुःख किंवा केली गेलेली टीका म्हणजे असे बिंदू असतात. आपल्या स्थिर आयुष्यात ते व्यत्यय आणतात. आपल्याला अगतिक करतात. बिथरवतात. थांबवतात. पण हाच क्षण असतो सावध होण्याचा. 
पाना-फुलांसारखं नेमकं तिथूनच फुटून बाहेर पडायचा...वाढायचा...बहरायचा...मनाला फांदीसारख्या मर्यादा नसतात. त्याला मिळेल त्या फटीतून बाहेर पडता येतं.

वाढता येतं... म्हणता येतं की वाढायला नवी दिशा मिळाली, किंवा असंही, की अरेच्चा, इथून वाढायचं राहूनच गेलं होतं ! 
पण हे बोलण्याइतकं सोपं नाही. अर्थात संकटांवर स्वार होणं, दुःख पचवणं किंवा टीकेचा वाढीसाठी सकारात्मक उपयोग करून घेणं कठीण तर आहेच, पण मुळात तशी इच्छा असावी लागते. ती असेल उत्कटपणानं आत रुजलेली, तर 
बदलाची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

हे सगळं साध्य करून संतपदाला पोचलेल्या 
तुकाराम महाराजांचं उदाहरण फार अप्राप्य वाटू शकेल. पण आपल्या कृतीतून सहज आनंद देणाऱ्या काही क्षणांच्या "त्या' दृश्‍यातल्या ड्रायव्हरची वृत्ती अंगिकारणं अशक्‍य नाही ! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com