तंत्रज्ञानाच्या मायाजालात गुप्तहेर

भक्ती परब
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना नुकतीच ठाणे पोलिसांनी अटक केली. मोबाईल कॉल तपशिलाच्या नोंदी (सीडीआर) विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कधी काळी रजनी पंडित यांना "लेडी शेरलॉक होम्स' म्हटले जात असे. शेरलॉकप्रमाणेच जेम्स बॉंड, व्योमकेश बक्षी आदींचे आपल्या मनावर गारुड आहे. प्रत्यक्षात या गुप्तहेरांसारखे त्यांचे आयुष्यही आश्‍चर्यचकित करणारे असल्याचे यानिमित्ताने पुढे आले. रजनी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी डिटेक्‍टिव्ह एजन्सीची सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी 75 हजारांवर प्रकरणांचा तपास केला आहे.

भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना नुकतीच ठाणे पोलिसांनी अटक केली. मोबाईल कॉल तपशिलाच्या नोंदी (सीडीआर) विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कधी काळी रजनी पंडित यांना "लेडी शेरलॉक होम्स' म्हटले जात असे. शेरलॉकप्रमाणेच जेम्स बॉंड, व्योमकेश बक्षी आदींचे आपल्या मनावर गारुड आहे. प्रत्यक्षात या गुप्तहेरांसारखे त्यांचे आयुष्यही आश्‍चर्यचकित करणारे असल्याचे यानिमित्ताने पुढे आले. रजनी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी डिटेक्‍टिव्ह एजन्सीची सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी 75 हजारांवर प्रकरणांचा तपास केला आहे. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मध्यमवर्गीय कुटुंबातील रजनी यांच्यात हेरगिरीची बीजे रुजली. याला कारण त्यांची एक मैत्रीण. तिच्या बदलत्या स्वभावाचा वेध घेताना ती चुकीच्या संगतीला बळी पडल्याचे त्यांनी शोधून काढले. 

तेव्हापासून त्यांची या विषयातील रुची वाढत गेली; मात्र पोलिस खात्यातील त्यांच्या वडिलांना हे पसंत नव्हते; पण आईने पाठिंबा दिला. वडिलांना भीती होती की हा व्यवसाय महिलांसाठी योग्य नाही; पण त्याच व्यवसायात त्यांनी अमाप प्रसिद्धी मिळविली. स्वतःच्या अनुभवावर त्यांनी "फेस बिहाइंड फेसेस' आणि "मायाजाल' ही पुस्तके लिहिली. दक्षिणेत त्यांच्यावर चित्रपटही निघाला. याशिवाय अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले. पंचवीस वर्षांपूर्वी पूर्णवेळ गुप्तहेर म्हणून काम करणे सोपे नव्हते. त्यांना अतिशय कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. "रजनी पंडित डिटेक्‍टिव्ह सव्हिर्सेस' या आपल्या कंपनीमार्फत कौटुंबिक अत्याचार, हरवलेल्या माणसांचा शोध, खून यासारख्या अनेक प्रकरणांचा उलगडा त्यांनी केला. या कामामुळे त्यांचे नाव भारताबाहेरही पोचले. 

काळानुसार आता गुप्तहेर व्यवसाय खूप बदलला आहे. रेकॉर्डिंग मशिन, बग्ज, स्पाय कॅमेरा अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे हेरगिरी करणे सोपे झाले आहे. यातले पहिले महत्त्वाचे तंत्रज्ञान होते मोबाईल. त्यामुळे अनेक गोष्टी सहज झाल्या; पण याच मोबाईलच्या कॉल डिटेल्सची मदत त्यांनी घेतली आणि तेच त्यांना भोवल्याचे दिसते. ज्या रजनी पंडित यांचे नाव "पहिली महिला गुप्तहेर' असे आदराने घेतले जायचे, तेथे आता त्यांच्या अटकेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस याचा योग्य तपास करतीलच; मात्र सध्या त्या स्वतःच तंत्रज्ञानाच्या मायाजालात अडकल्या आहेत. 

Web Title: Marathi news Edition Pune editorial Technical