एकटे नसतोच कधी आपण..! 

Pune Edition Editorial
Pune Edition Editorial

सकाळचे सहा वाजून गेलेत. घड्याळानुसार रात्र केव्हाच संपलीय. म्हणजे खरंतर उजाडायला हवं. पण उजाडलंयसं वाटत नाहीये. उजेड नाहीये पुरेसा. अंधारलेलंच वाटतंय 
अजून. शंका येऊन दुसरं घड्याळ बघितलं. त्यातही सहा वाजून गेलेत. म्हणजे उजाडायलाच हवं... आता घरात थांबून चालणार नाही. बाहेर पडलंच पाहिजे. चहा घेतला. आवरलं. बूट 
घातले आणि बाहेर पडले. उजेड गेला तरी कुठे ते पाहावं म्हणून वर बघितलं सहज. आकाशात ढग दिसत नव्हते. अख्खं आकाशच एक मोठ्ठा ढग झालेलं वाटत होतं. पण ते ओथंबलेलं नव्हतं दिसत. नुसतीच एक अगम्य घुसमट ठासून भरलेली होती आत बहुधा. नजरेत मावू शकेल तेवढा आकाशाचा पूर्ण विस्तार त्याच एका अवस्थेनं व्यापलेला वाटत होता. कायम वास्तव्याला आल्यासारखी मख्ख मरगळ भूत-भविष्य गिळून सलग वर्तमान झाली होती.... 

खुद्द आकाशच आपला उजेड हरवून बसलेलं... पण याची खंत करायला उसंत नसलेल्या पेपरवाल्यानं घराघरांत पेपर टाकायला सुरवात केली... मनात आलं, आता उजाडल्याची बातमी मिळताच सगळ्यांना जाग येईल. सारी यंत्रं घरघरायला लागतील. घड्याळाचे काटे सरकत राहतील. त्यानुसार गाड्या धावू लागतील. लोक चढतील... उतरतील... ऑफिसात पोचतील... आपापल्या कामाला लागतील सारी. ठरल्यानुसार कॅलेंडरमधला आजचा दिवस सरकत राहील पुढे... आणि ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी घडत राहतील... मीही ठरलेल्या हद्दीपर्यंत जाऊन भोज्याला शिवून परतले. आकाशाच्या मरगळीची दखलही न घेता सगळं मागील पानावरून पुढे चालू होतं... सगळ्यांना आपापली वेळ गाठायची होती. मुक्कामी पोचायचं होतं. पार्श्वभूमीवर काहीही असो. एका स्वयंभू गतीत "शो मस्ट गो ऑन' हे समजत असल्यासाखी सगळी पात्रं तिच्यापुढून सरकत राहतात...! 

रहदारीच्या कडेकडेनं चालताना असं काहीबाही मनात येत होतं. आकाशाची मरगळ वातावरणात झिरपत होती. घरी आल्यावर पेपर उघडला... पहिल्याच पानावर दूर कुठेतरी समुद्रावर वादळ झाल्याची बातमी होती. कुठे कुठे पावसाची शक्‍यता वर्तवली होती. म्हणजे सर्वव्यापी आकाशानं प्राशून घेतलं होतं तर ते दूरचं वादळ आणि आपलं रूप बदलून त्याची वार्ता पोचवली होती आपल्यापर्यंत... सकाळपासूनच्या त्याच्या "मरगळी'चा हा संदर्भ लक्षात आल्यावर जाणवलं, किती शर्थीनं रोखलाय त्यानं अवकाळी पाऊस आपल्या आत..! 

सकाळपासूनच्या मरगळीच्या विचारातून बाहेर पडले. कामाला लागले. आपल्या अवतीभवती कित्येकदा उसनं आवसान आणून वावरणारी माणसं दिसतात. ती निभावत असतात वाट्याला आलेली आपली कामं. हसून साजरं करत राहतात सगळं, तरी कुठल्या ना कुठल्या फटीतून त्यांच्या आतली घुसमट बाहेर पडतेच. डोकावत राहाते त्यांच्या वागण्या-बोलण्यातून. तीही शर्थीनं रोखत असतील असाच अवकाळी पाऊस आतल्या आत... आपल्यातलं आकाशतत्त्व असंही आपल्या कामी येतं म्हणायचं..! किती अतूटपणे जोडलेले असतो आपण यच्चयावत असण्याशी.. जे जे "आहे' त्या साऱ्याशी! एकटे नसतोच कधी आपण!  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com