एक मिटलेली कविता...

आसावरी काकडे
सोमवार, 5 मार्च 2018

समोरच्या स्क्रीनवर गाडी लेट होत असल्याचे आकडे बदलत राहिले. आमची अस्वस्थता वाढत होती. पण ती स्वस्थ बसून होती. जणू ती गाडीची वाट पाहतच नव्हती. मनावर दगड ठेवून कशाचा तरी शेवट करून आल्यासारखी नव्या अनोळखी प्रारंभाच्या प्रतीक्षेत बसून होती ती ! तिच्याशी काही बोलावं म्हणून मी परत तिच्याकडं बघितलं.

आम्ही नागपूरहून परतत होतो. रेल्वेच्या वेळेआधी अर्धा तास स्टेशनवर पोचलो. वेटिंगरूममध्ये सामान ठेवलं आणि थोडा वेळ इकडे तिकडे करून रिकामी सीट पाहून गाडीची वाट पाहत बसून राहिलो. जरा वेळ गप्पा झाल्या. मग घड्याळाकडं, समोरच्या टीव्ही-स्क्रीनकडं लक्ष जायला लागले. आमची गाडी राइट टाइम होती. पण प्लॅटफॉर्म नंबर दिसत नव्हता. गाडीची वेळ होत आली. सर्वांची चुळबुळ सुरू झाली. अंदाज घेण्यासाठी बाहेर फेऱ्या सुरू झाल्या. थोड्या प्रतीक्षेनंतर समजलं की गाडी अर्धा तास लेट आहे. वैतागाचा पहिला आवेग ओसरल्यावर सगळे स्थिरस्थावर झाले. चहा- कॉफीचे मग्ज आत यायला लागले. 

आजूबाजूच्या प्रवाशांशी बोलणं सुरू झालं. आम्ही वेटिंगरूममध्ये आल्यानंतर दहा- पंधरा मिनिटांनी एक बाई तिथं आली. तिचं बरंच सामान होतं. एक मुलगा पोचवायला आला होता. सामान ठेवून तो निघून गेला. ती खुर्चीवर न बसता बॅगांवर हात ठेवून खालीच बसली. आल्याबरोबर बॅगेतून एक मोठं इंग्रजी पुस्तक काढून ती ते वाचत होती. गाडी लेट आहे हे कळल्यावर तिच्याकडं माझं लक्ष गेलं. बांधाबांध केलेल्या सामानाच्या गराड्यात पाय जवळ घेऊन बसलेली ती एखाद्या बंद होल्डॉलसारखी दिसत होती. ती पुस्तक वाचतेय, पण केव्हापासून तिनं पान उलटलेलं दिसलं नव्हतं. तिचा चेहराही कोरा वाटत होता. जरा धीर करून सहज विचारलं, "कोणतं पुस्तक वाचताय?' तिनं पुस्तक मिटून कव्हर दाखवलं. "अबाउट भगवद्‌गीता..' असं काहीतरी नाव होतं. तिनं पुस्तक हातात दिलं. जरा चाळून मी ते परत केलं. पुस्तकापेक्षा तिच्याविषयीच जाणून घ्यायची उत्सुकता वाटत होती. पण तिनं परत पुस्तकात डोकं घातलं. "कुठे निघालायत?' दुसरा प्रश्न विचारला. तिनं नुसतं वर बघितलं. वाटलं, तिची व्याकुळ नजर भूतकाळाची पानं उलटत भिरभिरतेय भविष्यकाळाच्या पोकळीत. 

समोरच्या स्क्रीनवर गाडी लेट होत असल्याचे आकडे बदलत राहिले. आमची अस्वस्थता वाढत होती. पण ती स्वस्थ बसून होती. जणू ती गाडीची वाट पाहतच नव्हती. मनावर दगड ठेवून कशाचा तरी शेवट करून आल्यासारखी नव्या अनोळखी प्रारंभाच्या प्रतीक्षेत बसून होती ती ! तिच्याशी काही बोलावं म्हणून मी परत तिच्याकडं बघितलं. पुस्तकातून डोकं काढून तिनंही माझ्याकडं पाहिलं. तिला काय वाटलं कोण जाणे, बॅग उघडून तिनं एक बारकंसं पुस्तक काढलं. मला देत म्हणाली, "माझ्या कविता आहेत.' पाहातच राहिले.

काही बोलणार इतक्‍यात आमची गाडी येत असल्याचं समजलं. आम्ही सामान घेऊन घाईघाईनं बाहेर पडलो. पुन्हा पुन्हा मी मागं वळून पाहिलं. ती जराही हलली नव्हती. धाडधाड करत गाडी आली. लागली. सुटलीही. पण मन अजून तिच्यापाशीच रेंगाळत होतं. माझ्या हातात तिच्या कविता होत्या. पण एक मिटलेली कविता वेटिंगरूममध्येच राहिली होती. कोण जाणे कुठल्या रसिकाच्या प्रतीक्षेत! 
 

Web Title: Marathi News Editorial Pune Edition A Closed Poem written by Asavari Kakde