हिणकस गोष्टीच... 

sunshine
sunshine

या असीम विश्व-पसाऱ्यात आपल्या नगण्यतेला काही सीमाच नाही, ही जाणीव सतत क्षीण होत जाऊन "मी म्हणजेच सगळं काही' हे वाटणं इतकं ताजं, इतकं खरं होऊन आपल्याला लपेटून बसतं की बस्स..! पण हे किती बरं आहे ना? मी आहे. मी कोणीतरी विशिष्ट व्यक्ती आहे. भोवतीचं हे सगळं जग माझ्यासाठी आहे, असा अहंकार माणसाला आहे. त्यातूनच तर न मागता वाट्याला आलेलं हे बरं- वाईट आयुष्य उमेदीनं जगण्याचं बळ त्याला मिळतं! या अहंकारामुळेच तत्त्वज्ञानाच्या नजरेतून मिथ्या असलेल्या गोष्टी त्याला महत्त्वाच्या वाटतात. त्यासाठी तो आयुष्य पणाला लावतो... इथल्या साऱ्या निरर्थकाला तरतम भावानं श्रेष्ठ-कनिष्ठतेचे निकष लावत राहतो. प्रत्येकाचे छोटे छोटे अहं एकमेकांना छेद देत राहतात. 

आपल्यापैकी कुणीच याला अपवाद नाही... नुकताच एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. घरचं कार्य असल्यासारखा. अध्यक्ष, उद्‌घाटक, प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती... अशा स्थानांसाठी नामवंत लोक बोलावलेले. ते येईपर्यंत चहा- नाश्‍ता- गप्पा... ती मंडळी आल्यावर कार्यक्रमपत्रिकेनुसार सत्कार, भाषणं इत्यादी सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला. एकूण कार्यक्रम तसा छानच झाला; पण त्याचं औपचारिक कौतुक करताना मनात काही सलत राहिलं. वाटलं अशा उत्सवांमुळे कमअस्सल साहित्य लोकांसमोर येतं. त्याचाच गवगवा होतो. मग तेच चांगलं असा समज होऊ शकतो. खरं चांगलं साहित्य अंधारातच राहातं... 

पण लगेच असंही वाटलं, की आजूबाजूच्या अशा सगळ्या उत्सवांमधल्या मनाला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी निर्ममपणानं नाकारायच्या ठरवल्या, तर सगळ्यांतून निवृत्तच व्हावं लागेल. जगण्यासाठी उमेद बाळगायची तर काही कमअस्सल गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नाकारण्यात वाइटाबरोबर चांगलंही नाकारलं जातं. आज आहे त्याहून अधिक चांगलं होण्याची शक्‍यताही नाकारली जाते... आणि एकदम कुठेतरी वाचलेली "मिथुन' कल्पना आठवली. हे दृश्‍य विश्व म्हणजे शुद्ध आणि हिणकस यांचं जणू एक मिथुन आहे ! शुद्ध गोष्ट ही शुद्ध स्वरूपात "आकार' घेऊच शकत नाही. कल्पनेतून ती आकारात "उतरते' तेव्हा हिणकस गोष्टीच तो आकार पेलत असतात. जसं दागिना घडवताना शुद्ध सोन्यात इतर धातू मिसळावे लागतात... शुद्ध आत्मतत्त्वाला व्यक्त होताना मृण्मय देह धारण करावा लागतो..! 

आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे पाहताना हे भान असेल तर हिणकस गोष्टींना हिणवण्याऐवजी त्यांचं या एकूण असण्यातलं स्थान समजून घेता येईल. जगण्याच्या असंख्य पातळ्या असतात आणि त्या त्या पातळीवर तिथल्या जगण्याची शैली समर्थनीय असू शकते. म्हटलं तर सगळं सार्थ... म्हटलं तर सगळंच निरर्थ! संत तुकारामांनी एका अभंगात म्हटलंय- नटनाट्य तुम्ही केले याच साटी । कवतुके दृष्टी निववावी नाही तरी काय कळलेचि आहे वाघ आणि गाय लाकडाची..! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com