समाजाभिमुख वास्तुरचनाकार

डॉ. मंदार परांजपे 
सोमवार, 12 मार्च 2018

चंडीगडच्या नगररचनेला "युनेस्को'ने "जागतिक वारसा' म्हणून मान्यता दिली आहे. ही रचना साकारण्यात दोशींचा सिंहाचा वाटा होता. ला कार्बुजिये यांनी आपल्या प्रकल्पांद्वारे नवस्वतंत्र भारताच्या वास्तुरचनाशास्त्राला आधुनिकतेचा आयाम दिला.

ज्येष्ठ वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांना नुकतेच आर्किटेक्‍चरमधील "नोबेल' समजले जाणारे प्रिट्‌झकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दोशी यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या "नूमवि' प्रशालेत झाले. "नूमवि'च्या शेषशायी वसुंधरेच्या मानचिन्हाचा आणि पुण्याच्या फुले मंडईच्या आदर्श वास्तुरचनेचा आजही ते गौरवाने उल्लेख करतात. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्‍चरमधील शिक्षणानंतर पॅरिसमध्ये महान वास्तुविशारद ला कार्बुजिये यांच्यासह रचनाकार म्हणून काम करण्याचा कार्यानुभव दोशींना मिळाला. याच फ्रेंच तज्ज्ञाला पं. नेहरूंनी चंडीगडच्या नगरनियोजनासाठी सल्लागार म्हणून पाचारण केले. 

चंडीगडच्या नगररचनेला "युनेस्को'ने "जागतिक वारसा' म्हणून मान्यता दिली आहे. ही रचना साकारण्यात दोशींचा सिंहाचा वाटा होता. ला कार्बुजिये यांनी आपल्या प्रकल्पांद्वारे नवस्वतंत्र भारताच्या वास्तुरचनाशास्त्राला आधुनिकतेचा आयाम दिला. ला कार्बुजियेप्रणीत या नवयुगाची धुरा वाहणारी आणि भारतीय वास्तुविशारदांच्या पुढील पिढ्यांना प्रेरित करणारी त्रिमूर्ती म्हणजे अच्युत कानविंदे, चार्ल्स कोरिया आणि बाळकृष्ण दोशी! ला कार्बुजिये यांच्याप्रमाणेच लुई कान या जगप्रसिद्ध वास्तुरचनाकाराचाही प्रभाव दोशींवर पडला. 

दोशींनी स्थापन केलेले "वास्तुशिल्प प्रतिष्ठान' हे कमी खर्चाची घरबांधणी आणि नगरनियोजन यासाठीच्या भारतातील संशोधनाचे प्रवर्तक ठरले. पर्यावरणपूरकता, आधुनिकता आणि भारतीय संस्कृती यांचा मेळ दोशींनी आपल्या रचनांमध्ये नेहमीच साधला. इंदूरमधील "अरण्य' आणि जयपूरमधील "विद्याधननगर' यासारख्या निवासी वसाहती, आयआयएम (बंगळूर), एनआयएफटी (दिल्ली), सीईपीटी (अहमदाबाद) आणि आयसीआरआय (हैदराबाद) यासारखी नामवंत शिक्षण संकुले आणि पुण्यातील सवाई गंधर्व स्मारकासारखे कलेचे मंदिर अशी अनेक रचना-शिल्पे दोशींनी घडविली. 

दोशींनी नेहमीच व्यवसायाला व्यासंगाची आणि संरचनेला संशोधनाची जोड दिली. "मानवतावादी गृहनिर्माणाकडे', "कचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांची अपरिहार्यता', "घनकचऱ्याचा घरबांधणीत पुनर्वापर' हे त्यांचे काही यशस्वी संशोधन प्रकल्प. वास्तुरचनाशास्त्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी उद्‌बोधक प्रदर्शने दोशींनी जगभरातील संस्थांमध्ये भरवली. 1962 च्या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय रचनाशास्त्र पर्यावरण या शोधनिबंधापासून ते 2002 च्या स्वित्झर्लंडमधील वास्तुरचना मंचाच्या दशकपूर्ती व्याख्यानापर्यंत अनेक परिषदांवर दोशींनी आपल्या तेजस्वी ज्ञानमुद्रेचा ठसा उमटवला. 

अहमदाबादच्या "स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर'चे प्रथम संस्थापक- संचालक, दृश्‍यकला केंद्राचे संचालक आणि पर्यावरणीय नियोजन तंत्रज्ञान केंद्राच्या (सीईपीटी) शिक्षण विभागाचे मानद अधिष्ठाता ही पदे त्यांनी भूषविली. 1968 मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वास्तुरचना विद्यालयाच्या सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर अनेक नामवंत पाश्‍चात्त्य विद्यापीठांच्या अध्यासनांवर त्यांना मानाचे स्थान लाभले. वास्तुकला ही समाजाभिमुख आणि पर्यावरणस्नेही असावी, हा आपला आग्रह दोशींनी स्वतःच्या रचनांमध्ये प्रत्यक्षात उतरवला आहे. त्यांना प्रिट्‌झकर पारितोषिक मिळणे ही साऱ्या भारतीयांसाठी आनंदवार्ता आहे. 

 

Web Title: marathi news editorial pune page edition Nammudra Article of Dr Mandar Paranjape