यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक कृष्णा सोबती आणि अमृता प्रीतम या दोघी समकालीन. सोबती या वास्तवाचे परखड दर्शन घडविणाऱ्या स्त्रीवादी, तर प्रीतम या गूढरंजनात्मक "रोमॅंटिक'. त्यामुळे फाळणीचे चटके सोसून भारतात आलेल्या सोबती यांनी त्या इतिहासाचे भेदक दर्शन घडविणारी "जिंदगीनामा' ही कादंबरी लिहिली आणि त्याच वेळी अमृता प्रीतम यांची "हरदत्त का जिंदगीनामा' ही कादंबरी बाहेर आल्यावर आपले "शीर्षक' चोरले म्हणून प्रीतम यांच्यावर त्यांनी खटलाही गुदरला. सव्वीस वर्षांच्या कोर्टबाजीनंतर त्या खटला हरल्या; पण त्यामुळेच लेखकाने बौद्धिक संपदा हक्कांबाबत कसे जागृत असायला हवे, याचे दर्शनही जगाला घडले.
कृष्णा सोबती आज 92 वर्षांच्या आहेत आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला बराच उशीरही झाला आहे. पण त्यामुळे त्यांच्या साहित्याचे मोल जराही कमी होत नाही. आपण लेखकच होऊ शकतो, याची जाणीव त्यांना सहावीत असतानाच झाली होती. तेव्हा सिमला येथे एका काव्यस्पर्धेला त्यांची आई त्यांना घेऊन गेली होती आणि तिथे बसल्याबसल्याच त्यांनी चार काव्यपंक्ती लिहिल्या. अंगभूत लेखनकौशल्याची जाणीव त्यांना तेव्हा पहिल्यांदा झाली आणि पुढे त्या लिहीतच राहिल्या. गतवर्षीच एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी हे सारे नमूद केले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरात जिल्ह्यात 1925 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि पुढे लाहोरमध्ये उच्च शिक्षण घेत असतानाच, झालेल्या फाळणीनंतर त्या भारतात पसरल्या. मात्र फाळणीने त्यांच्या मनावर केलेली जखम त्या कधीच विसरू शकल्या नाहीत. त्यातूनच त्यांचे "जिंदगीनामा', "डर से बिछडी', "सूरजमुखी अंधेरे के', "दिलो दानिश' अशा त्यांच्या कथा-कादंबऱ्या उभ्या राहिल्या. त्यांची भाषा थेट आणि शैली ओघवती होती आणि 1960च्या त्या दशकांत स्त्रियांच्या प्रश्नांना थेट हात घालून, त्यांनी हिंदी साहित्यात एक नवाच प्रवाह प्रस्थापित केला.
सोबती यांना वास्तवाचे भान होते आणि गेल्या तीन-चार वर्षांत देशात उभे राहिलेले असहिष्णुतेचे वातावरण बघून, त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार, तसेच पाठ्यवृत्ती परतही केली होती. "आज देशात जे काही सुरू आहे, ते फाळणीपेक्षाही भयंकर आहे आणि आपले स्वप्न व आपला देश यांची राखरांगोळी करणारे आहे,' हे त्यांचे तेव्हाचे उद्गार आजच्या वास्तवाचे भेदक दर्शन घडविणारे आहेत. खऱ्या अर्थाने त्या देशाच्या सात दशकांच्या इतिहासाच्या साक्षीदारच आहेत!
|