पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र व्हावा "ब्रॅंड'

जयकुमार रावल
शनिवार, 17 जून 2017

पर्यटन हा जगातील लोकप्रिय आणि सर्वस्पर्शी व्यवसाय. जगभरातील 80 टक्के देशांची भिस्त पर्यटनावर आहे. त्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही पर्यटन उद्योगच देतो. अतुलनीय वारसा लाभलेल्या भारतात पर्यटनाला मोठा वाव आहे. समृद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक इथं येतात आणि हरखून जातात. आपल्या दृष्टीनं यातली महत्त्वाची गोष्ट ही, की या क्षेत्रात वाढीची मोठी संधी आहे आणि अर्थातच रोजगारनिर्मितीचीही! जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राला महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक पर्यटकाला आवडेल असं काही ना काही महाराष्ट्रात आहेच.

पर्यटन हा जगातील लोकप्रिय आणि सर्वस्पर्शी व्यवसाय. जगभरातील 80 टक्के देशांची भिस्त पर्यटनावर आहे. त्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही पर्यटन उद्योगच देतो. अतुलनीय वारसा लाभलेल्या भारतात पर्यटनाला मोठा वाव आहे. समृद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक इथं येतात आणि हरखून जातात. आपल्या दृष्टीनं यातली महत्त्वाची गोष्ट ही, की या क्षेत्रात वाढीची मोठी संधी आहे आणि अर्थातच रोजगारनिर्मितीचीही! जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्राला महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक पर्यटकाला आवडेल असं काही ना काही महाराष्ट्रात आहेच. डोंगररांगा, धबधबे, जंगल, समुद्रकिनारे आणि तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारे गडकोट... सारं काही इथं आहे. राज्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. निसर्गाच्या या सुंदर देणगीचा स्वीकार करण्यासाठी सिंधुदुर्गामधील किनारपट्ट्यांचा "कोस्टल सर्किट' म्हणून प्रसार करण्यात येतोय. पर्यटकांना आवडेल असं "सी वर्ल्ड' उभारण्याचाही प्रस्ताव आहे. नवनव्या सुविधांमुळं इथले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजतील आणि स्थानिक नागरिकांनाही अनेक संधी उपलब्ध होतील; पण त्यासाठी गरज आहे ती पर्यटन व्यवसायाची संस्कृती निर्माण करण्याची. यासाठी सरकार प्रयत्न करेलच; पण लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा ठरेल.

ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनेक वास्तूंमुळे राज्यात "हेरिटेज टुरिझम'लाही मोठा वाव आहे. अजिंठा-वेरूळ, घारापुरी, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कास पठार आणि पश्‍चिम घाट या "युनेस्को'प्रमाणित पाच जागतिक वारसा ठिकाणी पर्यटकांचा निरंतर ओघ सुरू असतो. त्यांना असेच आणखी पर्याय उपलब्ध होतील. महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा आणखी विकास होत आहे. जेणेकरून भाविकांबरोबर निसर्गप्रेमींनाही तिथं अविस्मरणीय अनुभव मिळेल.
बॉलिवूड, म्हणजे मुंबईच्या चित्रपट उद्योगाचं आकर्षण सर्वव्यापी असल्याने "बॉलिवूड पर्यटना'ची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा (एमटीडीसी)ची योजना आहे. या माध्यमातून पर्यटकांना चित्रीकरण आणि अभिनेत्यांना पाहण्याची संधी मिळेल. पडद्यावरची स्वप्ननगरी प्रत्यक्षात साकारते तरी कशी हे पाहण्याचा हा अनुभव अनेकांसाठी रोमांचक असेल; पण खऱ्या अर्थानं थरार अनुभवायची संधी मिळू शकते ती नागपूरजवळील कोळशाच्या खाणीत. पर्यटकांना या ठिकाणी जमिनीखाली 500 मीटर खोल उतरता येईल. त्यातून खाणकामगारांच्या कष्टांची जाणीव त्यांना होऊ शकेल.

शहरी नागरिकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची इच्छा असते. त्यासाठी कृषी पर्यटन हे पर्यटन विभागानं उचललेलं महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे शहरी धावपळीपासून दूर निवांत वातावरणात ग्रामीण जीवनशैलीची ओळख होते, स्थानिकांशी संवाद साधता येतो. तसाच वेगळा अनुभव मिळतो तो वाईनरीमध्ये फिरताना. नाशिकमध्ये तयार होणारी वाईन जागतिक दर्जाची असल्यानं तिथले वाईनयार्ड देशी, परदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करताहेत.

महाराष्ट्रातील अभयारण्यांमधील वैविध्यपूर्ण वृक्षसंपदा आणि प्राणिसंपदेमुळं अभ्यासक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नागझिरा अभयारण्य आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवनाची रेलचेल आहे. भंडारदऱ्याचा "काजवा महोत्सव' ही तर पर्यटकांसाठी अनोखी संधी असते.
पर्यटनाच्या दृष्टीनं समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात पर्यटनासाठी अशा अनेकानेक संधी असल्या, तरी त्या साधण्यासाठी सगळ्यांचेच योगदान हवे. पर्यटनासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा केवळ आपल्यासाठीच आहेत, असे समजून त्या आपल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांकरिता वापरायोग्य न ठेवणारे;तसेच नवख्या पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणारे वाहनचालक-हॉटेलमालक यामुळं आपला परिसर, राज्य, देशाला कमीपणा येतो, हे लक्षात ठेवायला हवं. सरकारी पातळीवरून पर्यटनासाठी आवश्‍यक ते सारे केलं जाईलच. "एमटीडीसी'तर्फे अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पर्यटनस्थळांचे मार्केटिंग आणि प्रसाराची काटेकोर योजना आखण्यात आली आहे. अर्थात पर्यटनाच्या आघाडीवर करण्यासारखं खूप काही आहे, त्यासाठी वेगानं प्रयत्न सुरूही आहेत; मात्र या संकल्पना, उत्पादनं, योजना प्रत्यक्षात तेव्हाच येतील, जेव्हा साऱ्यांचा हातभार त्यासाठी लागेल... तसे झाले तर महाराष्ट्र हा "ब्रॅंड' पर्यटन क्षितिजावर तेजानं तळपेल यात शंका नाही.

■ जयकुमार रावल
(पर्यटनमंत्री, महाराष्ट्र राज्य)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jaykumar rawal tourism maharashtra news