लहानग्यांच्या भावविश्‍वातील 'खेळ' 

प्रदीपकुमार माने
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

खेळ नि खेळण्यांमुळे लहान मुलांचा शारीरिक विकास तर होतोच, पण त्यांचं कल्पनाविश्‍व समृद्ध होतं आणि भाषाही सुधारते, असं संशोधनातून समोर आलं आहे.

लहानग्यांचं विश्‍व खूप अद्‌भुत असतं. त्यांच्या विश्‍वात काय घडत असेल याची फक्‍त आपण कल्पनाच करू शकतो. म्हणून तर त्यांनी दिलेली उत्तरं ऐकून आपण चकित होतो आणि मग आपल्या लक्षात येतं, की ज्यांना आपण लहान समजत असतो, त्यांच्याकडं अद्‌भुत अशी कल्पनाशक्‍ती असते. लहानग्यांतील कल्पनाशक्‍तीच नव्हे, तर विचारक्षमता, त्यांची भाषाकौशल्यं याविषयी होणारं संशोधन तर इतकं चकित करणारं आहे, की आपला त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 

खेळ ही लहानग्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. इतकंच नव्हे तर ती गोष्ट इतका वेळ केली जाते की खेळणं आणि लहान मुलाचं जीवन समानार्थी समजलं जातं. लहान मुलं सतत कशाशी तरी खेळत असतात. या गोष्टीचं आपल्याला काही विशेष वाटत नाही, पण संशोधकांना असं नाही वाटतं. त्यांना वाटतं ज्या अर्थी ती खेळांमध्ये इतकी मग्न असतात, त्याअर्थी त्याची त्यांच्या विकासात निश्‍चितच भूमिका असणार. जॉर्डन बुर्गहार्ट हे संशोधक तर 27 वर्षे प्राण्यांच्या खेळांविषयी सखोल अभ्यास करताहेत. 'द जेनेसिस ऑफ ऍनिमल प्ले' हे या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असं पुस्तक आहे. खेळ ही प्रत्येक जिवाच्या अस्तित्वासाठी आवश्‍यक अशी गोष्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हा विचार सुरवातीला आपल्याला पटत नाही. कारण खेळ ही मानवप्राण्यासाठी मूलभूत गोष्ट नसून, फुरसतीची गोष्ट आहे, असं आपण समजतो. पण बुर्गहार्टना हे मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की खेळाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे.

खेळ इतर जिवांप्रमाणं मानवासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. कुत्री, मांजरासारखे प्राणी खेळ खेळतात, कारण या खेळातून त्यांना शिकार कशी करावी, एकमेकांशी कसं वागावं अशा गोष्टींची कौशल्यं प्राप्त होतात. खेळाद्वारे त्यांचा शारीरिक अन्‌ सामाजिक विकास होतो. मानवालाही हेच लागू होतं. पण खेळाद्वारे मानवाचा फक्‍त शारीरिक अन्‌ सामाजिकच नव्हे, तर मानसिक विकासही होत असतो. या वयात शरीरातील स्नायूंचा आणि मज्जातंतूचा विकास हा मेंदूच्या विकासाशी जोडला गेलेला असतो. नवीन शारीरिक हालचाली करण्यासाठी त्यासंबंधित शरीराच्या भागावर नियंत्रण ठेवावं लागतं अन्‌ असं करण्यासाठी मेंदूचा वापर करावा लागतो. त्यामुळं लहानगी खेळ खेळतात, तेव्हा साहजिकच त्यांच्या मेंदूचा विकास होत असतो. स्टुअर्ट ब्राऊन, जॉर्डन बुर्गहार्ट, मार्क बेकहॉप, सर्जिओ पेलिस, डेव्हिड एलकाईन्ड या संशोधकांचं संशोधन असं सांगतं, की खेळामुळे मुलांचा शारीरिक विकास होतो अन्‌ त्यांची मेंदूची लवचिकता वाढते, सर्जनशीलता आणि विचारक्षमतेतही सुधारणा होते. 

ऍथनी पेलेग्रिनी या मिनिसोटा विद्यापीठातील शास्त्रज्ञांचं संशोधन तर याबाबतीत खूपच महत्त्वाचं आहे. पेलेग्रिनी यांचं म्हणणं आहे, की नियम नसणारे खेळ हे बालकांच्या विकासासाठी नियम असणाऱ्या खेळापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. आता हेच पाहा ना. कबड्डी, फूटबॉल, क्रिकेट या खेळांना स्वतःचे असे नियम असतात. हे खेळ खेळताना लहानग्यांना त्यांच्या नियमांनुसारच खेळावे लागतात, पण नियम नसणाऱ्या खेळात तसे होत नाही. या खेळात मुले स्वतःच नियम बनवितात. काही जण डॉक्‍टर बनून इतरांना तपासू लागतात, तर काहीजण परी बनून आकाशात उडू लागतात. यात लुटुपुटुच्या लढाईचाही समावेश होतो. या अशा खेळांमध्ये लहानग्यांना जास्त सर्जनशीलता वापरायची संधी मिळते. त्यांनी हे खेळ खेळताना काढलेल्या समस्यांवरील उत्तरेही चित्र-विचित्र असतात. यातून त्यांचं कल्पनाविश्‍व समृद्ध होतं, वैचारिक विकास होतो, इतकंच नव्हे, तर त्यांची भाषाही सुधारते. 2007मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी केलेला प्रयोग पाहा. त्यांनी दीड ते अडीच वर्षाच्या मुलांना ठोकळ्यांच्या साह्याने वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचे खेळणे दिले आणि त्यांच्या पालकांना सहा महिने त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. सहा महिन्यांनंतर त्यांनी सर्वांचे निरीक्षण केले. जी मुले नियमितपणे ठोकळ्यांचे खेळ खेळत, त्यांची शब्दांचा योग्य वापर करण्याची आणि शब्दसाठा मर्यादाक्षमता जास्त असल्याचं दिसून आलं. आपल्याला वाटतं की अशा ठोकळ्याच्या खेळाचा आणि भाषाकौशल्याचा काय संबंध? पण असं नाही. अशा खेळांमुळे मुलांतील पद्धतशीरपणा वाढतो,

विचारक्षमता वाढते आणि साहजिकच आहे त्याचा परिणाम त्यांच्या भाषेवरही होतो. 
शिकागो विद्यापीठातील इरिका कार्टमील यांनी याविषयी एक महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यांनी सिद्ध करून दाखवलं, की लहाग्यांशी शब्दाच्या साह्यानं संदेशवहन करणं गरजेचं असतं, तितकंच गरजेचं असतं त्यांच्याशी केलेला देहबोलीचा संवाद म्हणजेच वाचेतर संवाद. या वाचेतर संवादानेच तर संदेशवहनाचा दर्जा ठरतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. यासाठी त्यांनी 14 ते 18 महिन्यांच्या बालकांचे त्यांच्या आई-वडिलांबरोबरचे वेगवेगळे खेळ खेळतानाचे आणि पुस्तकं वाचून दाखवितानाचे 40 सेकंदांचे शेकडो व्हिडिओ बनविले. कार्टमील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे व्हिडिओ प्रयोगातील इतर सहभागींना दाखविले.

या लोकांना व्हिडिओवरून अंदाज करायचा होता की खेळताना किंवा पुस्तक वाचून दाखविताना पालक कुठली नावं उच्चारतायत. हा अंदाज किती योग्य ठरतोय यावरून त्यांनी पालकांची देहबोली म्हणजेच वाचेतर संवाद किती प्रभावी आहे ते ठरविले. जसं की वस्तूचं नाव उच्चारताना ती दाखवणं, त्या वेळी त्याच्याशी संबंधित हावभाव करणं इ. पालकांची वाचेतर संवादक्षमता तपासल्यानंतर त्यांनी त्याच्या नोंद ठेवल्या. तब्बल तीन वर्षांनंतर त्यांनी प्रयोगातल्या बालकांची निरीक्षणं नोंदविली. ज्या बालकांच्या पालकांनी शब्दांबरोबर हावभावसुद्धा व्यवस्थितपणे वापरले होते, त्या बालकांकडं शब्दसाठा जास्त दिसून आला असं त्यांच्या निदर्शनास आलं. याचा अर्थ असा झाला, की लहानग्यांशी नुसतं शब्दांनी संवाद साधून चालत नाही, तर हा संवाद योग्य पद्धतीचा होण्यासाठी वाचेतर संवादसुद्धा व्यवस्थितपणे करणं गरजेचं ठरतं. या सर्वांवरून लक्षात येतं की खेळणं आणि भाषा या दोन्ही बाबतींत त्यांची बालकाच्या विकासातील भूमिका आपण समजतो, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. बालकाच्या भावविश्‍वात गेल्याशिवाय ते कसं समजणार आपल्याला.

Web Title: marathi news marathi website Sports Pradeep Kumar Mane