नव्या संकल्पाची ती आठवण... (पहाटपावलं)

आसावरी काकडे 
सोमवार, 1 जानेवारी 2018

"नमस्कार.. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!' सकाळी फिरण्याच्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या मैत्रिणीनं हातात हात घेत दिलखुलास हसत म्हटलं. 

"नमस्कार.. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!' सकाळी फिरण्याच्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या मैत्रिणीनं हातात हात घेत दिलखुलास हसत म्हटलं. 

मीही नकळत तसाच उत्तेजित प्रतिसाद दिला. तिचा उत्साह माझ्यात संक्रमित झाला होता... पावलं अधिक जोमानं पडायला लागली. घरातून निघताना बरोबर आलेली मरगळ तिथंच गळून पडली. ती स्वतःशी बोलल्यासाखी म्हणाली, "नव्या वर्षासाठी 
मी एक नवा संकल्प केलाय. तू काय ठरवलंयस?...' ही तशी खूपच रूढ झालेली, जवळपास प्रत्येकाच्या अनुभवाला येणारी अगदी सामान्य घटना... पण दरवर्षी मला ती आठवते. एखाद्या स्वादिष्ट पदार्थाची चव जिभेवर रेंगाळावी तशी ही आठवण मी मनात रेंगाळत ठेवलीय... कारण मरगळ झटकून ऊर्जा संक्रमित करणारा "नवे वर्ष नवा संकल्प' हा मंत्र तिनं मला दिला होता... त्या दिवशी घरी परतताना मीही नव्या संकल्पाविषयी विचार करायला लागले होते... खरंच नवं काहीतरी घडतंय... घडायला हवं, असं मला वाटायला लागलं होतं. मी त्या दिशेनं चालायला लागले होते...! खरंतर नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री बारा वाजता वाजवल्या जाणाऱ्या फटाक्‍यांच्या आवाजानं झोपमोड होते. मग रस्त्यातून जल्लोष करत हिंडणाऱ्यांविषयी चीड निर्माण होते... आणि "दिवसेंदिवस हे वाढतच चाललंय..' हा तक्रारीचा सूर पार वरचा "सा' गाठतो... मग राहिलेल्या रात्रीच्या झोपेचं खोबरं होतं; आणि नव्या वर्षाचं स्वागत त्रासिक चेहऱ्यानं केलं जातं. मनात येत राहतं, कुठल्याही "काल'च्या दिवसानंतर उगवणाऱ्या "आज'सारखाच तर असतो एक जानेवारीचा दिवस. त्याचं काय एवढं स्तोम माजवायचं? पण नव्या संकल्पाची ती आठवण जवळ येते आणि कपाळावरच्या आठ्यांमधल्या या प्रश्नाला गप्प करते... तसं तर रोजचं जगणं हे स्तोम माजवणंच तर असतं. काय अर्थ असतो अब्जावधींच्या संख्येतली एक व्यक्ती म्हणून जगण्याला? पृथ्वीच्या गोलाचा नकाशा पाहायला लागले, की हे वैयर्थ गडद होतं आणि खगोलाचा पट डोळ्यांसमोर आणला तर त्या असीमातल्या ब्लॅकहोलमध्ये नाहीसेच होतो आपण... नगण्यतेला काही सीमाच उरत नाही... पण हे जाणवून देणारे अस्तित्वभान तर जागे असते... मग असीमाचे ओझे उतरवून साजरा करावा लागतो, आपल्या इटुकल्या अस्तित्वाचा उत्सव... संकल्पाचा मंत्र आठवावा लागतो पुन्हा पुन्हा... भोवतीच्या उन्मादांच्या तळाशी असलेलं बकाल वास्तवही झाकलेलं राहत नाही. कितीही आतषबाजी केली तरी... काही सेकंदांच्या झगमगाटानंतर खाली उरणाऱ्या राखेसारखं... हवेत मुरलेल्या दुर्गंधीसारखं ते जाणिवेला कुरतडत राहतं. अस्वस्थ करतं... "स्व'च्या मर्यादा आणि छोट्या छोट्या स्वार्थांचे चिवट मोहही असतातच संकल्पपूर्तीच्या वाटेवर पाय मागे ओढायला... धरलेली उमेद शीण व्हायला अशी कैक निमित्तं भेटत राहतात...
 
नव्या वर्षाचं निमित्त साधून, नवी ऊर्जा घेऊन येणारी नव्या संकल्पाची ती आठवण म्हणूनच मी जतन करून ठेवलीय...! 
 

Web Title: Marathi News Marathi Websites Editorial Article