दमन कराल तर मनं दुरावाल

दमन कराल तर मनं दुरावाल

आपण समृद्धी निर्माण करतो; पण फायदा इतरच घेतात, ही भावना वेगळे होण्याच्या मागणीतून जेव्हा प्रकट होते, तेव्हा धोरणकर्त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्‍यक असते. कॅटलानमधील आंदोलन हे त्याचेच उदाहरण. 

आशियाई व आफ्रिकी देशांपेक्षा पाश्‍चात्त्य देशांत जास्त एकजिनसीपणा आढळतो, याबद्दल वाढ असण्याचे कारण नाही. युरोपात खूप काळापासून एक संस्कृती, एक धर्म वावरत आहेत. तेथे बदलते ती भाषा. जर्मन, फ्रेंच, रशियन वगैरे अनेक भाषा युरोपात आढळतात. असा मोठ्या प्रमाणात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकोपा असूनही स्पेनचा एक महत्त्वाचा भाग कॅटलान जेव्हा देशातून फुटून निघण्याची मागणी करतो व त्यासाठी सार्वमत घेतो तेव्हा मात्र अशा घटनेची दखल घ्यावीच लागते. 

रविवारी एक ऑक्‍टोबर रोजी कॅटलान या स्पेनच्या एका भागात सार्वमत घेण्यात आले. यात मुद्दा होता स्पेनमध्ये राहायचे,की वेगळा देश स्थापन करायचा? असे सार्वमत घेऊ नये म्हणून स्पॅनिश सरकारने सर्व प्रकारे प्रयत्न केले. सरतेशेवटी सार्वमत होणारच आहे, हे जेव्हा स्पष्ट झाले, तेव्हा सरकारची दमनशक्ती वापरून सार्वमत घेता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रविवारी पोलिसांनी कॅटलानच्या लोकांवर हल्ला केला. ज्यात 800 लोक जखमी झाले. तरीही सार्वमत घेतले गेलेच व 'आम्हाला स्पेनमध्ये राहायचे नाही' या बाजूने निर्णय आला. 
स्पेनची एकूण लोकसंख्या सुमारे तीन कोटी. यातील कॅटलान या भागात सुमारे 75 लाख लोक राहतात. कॅटलानमध्ये एकूण स्पेनच्या वीस टक्के जमीन आहे. स्पेनच्या इतर भागांच्या तुलनेने कॅटलान हा भाग समृद्ध आहे. कॅटलानच्या मते त्यांच्या कष्टातून निर्माण झालेल्या संपत्तीवर स्पेनचा इतर भाग जगत असतो. यापेक्षा स्वतंत्र झालेले काय वाईट आहे? अशा मानसिकतेतून सार्वमत घेण्यात आले. 

कॅटलानच्या नेत्यांनी आता या बाबीत संयुक्त राष्ट्रसंघाने लक्ष घालावे अशी जाहीर विनंती केली असून, संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा रविवारी झालेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. 

या संदर्भात आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. युरोपातील लोकशाहीचा इतिहास बघितला तर इंग्लंड, फ्रान्स वगैरे काही मूठभर देश सोडले, तर इतर अनेक देशांत लोकशाही शासनव्यवस्था विसाव्या शतकात वेगवेगळ्या टप्प्यावर आलेली दिसते. असाच एक देश म्हणजे स्पेन. स्पेनमध्ये 1978 मध्ये लोकशाही राज्यघटना मान्य झाली आहे. घटनेनुसार देशातील कोणत्याही भागाला देशातून फुटून निघण्याचा हक्क नाही. 

स्पेनमध्ये अनेक वर्षे जनरल फ्रान्सिस्को फ्रॅंको या लष्करशहाची सत्ता होती. फ्रॅंको यांचा नोव्हेंबर 1975 मध्ये मृत्यू झाल्यानंतर स्पेनमध्ये लोकशाही शासनव्यवस्था लागू झाली. विसाव्या शतकाच्या सुरवातीला जेव्हा जर्मनीत नाझींचा उदय होत होता, त्याच काळात स्पेनमध्ये लोकशाहीवादी विरुद्ध लष्करशाही यांच्या 1936 ते 1939 दरम्यान यादवी युद्ध सुरू होते. यात अनेक नामवंत लेखक, कवी व चित्रकार लोकशाहीवाद्यांच्या बाजूने रणांगणात बंदुका घेऊन लढले होते. या संदर्भात चटकन आठवणारे नाव म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे व त्याची 'फॉर हूम द बेल टोल्स' ही कादंबरी. या यादवी युद्धात जनरल फ्रॅंकोचा विजय झाला व तेव्हापासून नोव्हेंबर 1975 पर्यंत स्पेनमध्ये लष्करशाही होती. 
एका बाजूने असेही दाखवता येते, की आज दिसणारा स्पेन तसा इतिहासात नव्हता. हा एक विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत निर्माण केलेला देश आहे. याचाच अर्थ असा की आज व्यक्त होत असलेल्या अलगतेच्या भावनेला इतिहासात आधार सापडतो. स्पेनच्या कास्टील या प्रांताची राणी इसाबेला व आज कॅटलान ज्याचा घटक आहे, तो अरागॉन प्रांताचा राजपुत्र फर्डिनंड यांचा राजकीय कारणांसाठी इ.स. 1469 मध्ये विवाह झाला होता. तेव्हा स्पेनचे एकीकरण झाले. 

असे असले तरी कॅटलान भागात राहणाऱ्यांची भाषा वेगळी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथील जनतेची अशी भावना आहे, की त्यांना स्पॅनिश भाषिक व राज्यकर्ते दुय्यम दर्जाची वागणूक देतात. परिणामी, त्यांच्यामनात अलगतेची भावना होती. जी आता सार्वमताद्वारे व्यक्त झालेली आहे. याचा अर्थ कॅटलानमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची ही भावना आहे असे नाही. सार्वमतादरम्यान झालेल्या मतदानाचा बारकाईने अभ्यास केला तर दिसून येईल, की कॅटलान भागातील एकूण 53 लाख मतदारांपैकी फक्त 22.6 लाख मतदारांनीच सार्वमतात भाग घेतला होता. म्हणजे एकूण मतदारांपैकी फक्त 42.5 टक्के. यातील 22.6 लाख मतदारांपैकी 20 लाख मतदारांनी वेगळे होण्याच्या बाजूने कौल दिला आहे. म्हणजे झालेल्या मतदानापैकी 90 टक्के मतदार वेगळा देश मागत आहेत. मग रविवारी झालेले सार्वमत कितपत प्रातिनिधिक समजावे? 

एकविसाव्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था, त्यातही युरोपची अर्थव्यवस्था इतकी गुंतागुंतीची झालेली आहे, की एका देशातील घटनांचा परिणाम लगेच इतरत्र जाणवतो. स्पेन 'युरोपियन युनियन'चा सभासद आहे. स्पेनपासून कॅटलान जर वेगळा निघाला तर याचे परिणाम युरोपियन युनियनवर होतीलच. स्पेनमधल्या सार्वमतावर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी बुधवारी मतप्रदर्शन केले व स्पेनच्या सरकारने कॅटलानची समस्या सामंजस्याने सोडवावी, असे आवाहन केले आहे. कॅटलानचे नेते मात्र आता कोणत्याही समझोत्याला राजी नाहीत. त्यांना 'स्वतंत्र कॅटलान' हवा आहे. 

समाजधुरिणांना एकेकाळी असे वाटत होते, की आधुनिक शिक्षण दिले तर 'भाषा' व 'धर्म' यांसारख्या भावनांतील नकारात्मक बाजूंवर मात करता येईल. आज मात्र असे ठामपणे म्हणवत नाही. जसे अलगतावादी वातावरण स्पेनमध्ये आहे. तसेच कॅनडामध्येही आहे. तेथेसुद्धा फ्रेंच भाषिक क्‍युबेक प्रांत कॅनडातून फुटून निघण्याबद्दल सार्वमत घेत असतो. 1971 मध्ये पाकिस्तानातून फुटून निघालेल्या बांगलादेश निर्मितीमागे अनेक कारणे असतील; पण त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे उर्दू भाषिकांकडून बंगाली भाषेची होत असलेली गळेचेपी. हे होतेच. आज आपल्यातून बाहेर पडायला आतूर असलेल्या कॅटलानच्या संदर्भात आपले काय चुकले याबद्दल स्पॅनिश नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. 

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com