व्हेंटिलेटर नको, हवा मोकळा श्‍वास 

केशव साठये
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांची चलती असलेल्या सध्याच्या काळात मराठी चित्रपट चालण्यासाठी तिकिटाचे दर हा एकमेव महत्त्वाचा निकष नाही. मराठी चित्रपट उद्योगाला निरोगी आणि दीर्घायू करायचे असेल, तर तिकीट दरकपातीचा 'व्हेंटिलेटर' हा खरा उपाय नव्हे. 

एकेकाळी करमुक्त असलेला मराठी चित्रपट उद्योग हा वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटावर 18 टक्के, तर त्यावरील तिकिटावर लावल्या जाणाऱ्या 28 टक्के करामुळे जेरीस आला आहे. त्यात भर म्हणजे हिंदी आणि इतर चित्रपटांना पूर्वी असलेला 40 टक्के कर आता 28 टक्के झाल्यामुळे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत आहेत, अशी चर्चा सध्या मराठी चित्रपट उद्योगात सुरू आहे.

मराठी चित्रपट पाहणे हे आता तुलनेने महाग झाले आहे आणि त्याचा फटका या उद्योगाला बसणे स्वाभाविक आहे. यावर गांभीर्याने विचार होऊन कदाचित या जाचातून हा उद्योग सुटेलही. पण, असे झाल्यामुळे मराठी चित्रपट उद्योग भरभराटीस येईल आणि मराठी चित्रपट हा एक किफायतशीर व्यवसाय होईल, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. 

वर्षाला साधारण शंभर मराठी चित्रपट आपल्या राज्यात तयार होतात. दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक असलेला हा उद्योग. त्यातले दहा टक्के चित्रपट नफा मिळवतात, तर 20 ते 30 टक्के आपली गुंतवणूक कशीबशी वसूल करण्यात यशस्वी होतात आणि उरलेले तोट्यात जातात. राष्ट्रीय स्तरावरही थोड्याफार फरकाने चित्रपटांची हीच चित्तरकथा आहे. 

मुळात मराठी चित्रपट चालण्यासाठी तिकिटाचे दर हा एकमेव महत्त्वाचा निकष नाही. मराठी चित्रपटांसमोरची आव्हाने यापेक्षा मोठी आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांची नेमकी आवड ओळखणे. आजचा प्रेक्षक हा 'मॉल संस्कृती'ने वेढला गेलेला आहे. त्याचा आवडीचा कल सतत बदलत राहतो. त्यामुळे अमुक एक प्रकारचा चित्रपट त्याला आवडेलच याची खात्री देता येत नाही. गेल्या तीन- चार वर्षांचा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपटांचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते? 'सैराट'ने शंभर कोटींचा व्यवसाय केला, तर 'नटसम्राट', 'लय भारी', 'टाइमपास'  या चित्रपटांनी 40 कोटींची उलाढाल केली. 'कट्यार..', 'मुंबई- पुणे- मुंबई'ने 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यात चांगला धंदा केलेल्या आणखी 10- 12 चित्रपटांची भर पडू शकते आणि अर्थात, या सर्व चित्रपटांना भरपूर प्रसिद्धी, उत्कृष्ट मार्केटिंगचे जाळे याचाही मोठा हातभार लागला, हे नाकारता येणार नाही. पण, हा पॅटर्न डोळ्यांसमोर ठेवून कुणी चित्रपट काढू म्हटले, तर त्याला असाच प्रतिसाद मिळेल याची खात्री नाही. 

हे चाललेले सर्व चित्रपट उत्कृष्ट होते काय? उत्तम कथानक, नेटकी बांधणी, बंदिस्त पटकथा असे काही यात खरोखर होते काय, याचे होकारात्मक उत्तर देणे अवघड आहे. पण मग या पार्श्वभूमीवर 'ऑस्कर'ला पहिल्यांदा गेलेला मराठी चित्रपट 'श्वास', 'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी', 'विहीर', 'देऊळ', 'फॅन्ड्री', 'कोर्ट', 'किल्ला' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'कासव' यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळूनही, चित्रपट म्हणून तगड्या असलेल्या या कलाकृती व्यवसाय म्हणून मात्र दुबळ्या ठरल्या. (काही सन्माननीय अपवाद वगळून.) या विदारक वास्तवाचे काय करायचे? 

यातील अनेकांना चित्रपटगृह मिळाले नाही, प्रदर्शनाला मोक्‍याच्या वेळाही उपलब्ध झाल्या नाहीत. या मंडळींनी खरे म्हणजे मल्टिप्लेक्‍सच्या आकर्षणापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवायला हवे. आपला चित्रपट 'मासेस'साठी नाही, या अभिजनवादाचा सार्थ अभिमान बाळगताना, 'चित्रपटाला गर्दी होत नाही, प्रतिसाद कमी आहे' असे म्हणत उसासे टाकणे, हा विरोधाभास आहे. 

छोट्या गटासाठी चित्रपटाचे सादरीकरण कसे करता येईल? सिनेमा क्‍लबच्या माध्यमातून तो अपेक्षित प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याच्या नव्या कल्पना, उपक्रम हाती घेऊन निखळ कलात्मक आनंदाचे आदान-प्रदान करणे हाच त्यावरचा उपाय वाटतो. मराठी चित्रपटांसमोरचा दुसरा आव्हानात्मक मुद्दा म्हणजे मराठी प्रेक्षकाला मराठीबरोबर किंबहुना त्यापेक्षा जास्त हिंदी भाषा अधिक जवळची वाटते. टीव्हीच्या वाढत्या प्रसारामुळे आणि एकूणच हिंदी चित्रपटांच्या गेल्या अनेक दशकांतील गारुडामुळे हिंदी चित्रपट हा मराठी माणसाला अजिबात परका वाटत नाही. हिंदी चित्रपट निर्मितीतली सफाई, भारतभर आणि आता परदेशांतूनही चांगली मागणी असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी केला जाणारा अफाट खर्च यामुळे घटकाभर मस्त करमणूक होणार याची खात्री हिंदीबाबत त्याला जास्त वाटते आणि आपसूकच तो हिंदीकडे ओढला जातो.

आजकाल चित्रपटाच्या निर्मिती खर्चाएवढाच खर्च त्याच्या जाहिरातीवर करावा लागतो. विविध वाहिन्यांवरून तारे- तारकांच्या मुलाखती, 'रिऍलिटी शो'मध्ये सहभाग, 'एफएम' वाहिन्यांवरून जाहिरातींचा सतत मारा, असा एकूण त्याचा बाज असतो. मग त्या कार्यक्रमाचे स्वरूपही अतिशयोक्तीने नटलेले असते. 'हा असा चित्रपट गेल्या शंभर वर्षांत झाला नाही,' असा एकूण नूर सर्वच चित्रपटांच्या जाहिरातींचा असल्यामुळे सर्वसाधारण प्रेक्षक त्यातून गोंधळून जातो आणि त्यामुळे नेमका चांगला चित्रपट पाहायला आपण जात आहोत काय, याचा त्याला भरवसा नसतो. या जाहिराती करण्याच्या पद्धतीत आता गुणात्मक बदल होणे गरजेचे आहे. त्या अधिक वास्तवदर्शी व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. 

चित्रपट उद्योगात भुरट्या निर्मात्यांचा झालेला प्रवेश, हेही चित्रपट उद्योगाच्या ऱ्हासाचे महत्त्वाचे कारण आहे. चित्रपट माध्यम माहीत नसलेले, केवळ पैसा आहे आणि ग्लॅमर आहे म्हणून यात उतरलेल्या मंडळींनी या कलात्मक क्षेत्राची रया घालवून टाकली आहे. अशा बहुसंख्य चित्रपटांमुळे मराठी प्रेक्षक धास्तावला असेल तर त्यात नवल नाही. चित्रपट उद्योगाला निरोगी आणि दीर्घायू करायचे असेल तर तिकीट दरकपातीचा 'व्हेंटिलेटर' हा यावरचा खरा उपाय नव्हे. मराठी चित्रपटाला मोकळा श्‍वास घेता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे, हेच यावरचे खरे उत्तर आहे.

Web Title: marathi news marathi websites TV Media Marathi Movies Bollywood Keshav Sathye