शोध अण्वस्त्रविरहित जगाचा 

प्रकाश बुरटे
बुधवार, 5 जुलै 2017

अण्वस्त्रप्रसारबंदीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न होत आहेत. यासंबंधीच्या करारासाठी चर्चेची दुसरी फेरी 15 जून रोजी चालू झाली असून, लवकरच कराराचा अंतिम मसुदा तयार होईल. त्यानिमित्त या महत्त्वाच्या प्रश्‍नाचा आढावा. 

पृथ्वीवरील मानवाचे वास्तव्य इनमिन अडीच-तीन लाख वर्षांचे. त्यापैकी गेल्या दोन-तीनशे वर्षांत तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड वेगाने, तर मानवी समजूतदारपणाची मात्र कासवगतीने झाली. परिणामी, जगभरच्या प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याने युद्ध, पश्‍चाताप, शांतता, पुन्हा 'आधुनिक शस्त्रास्त्रांनिशी' युद्ध... यांची आवर्तने चितारली आहेत. अशा पार्श्वभूमीवर मार्च 2017 मध्ये अण्वस्त्रबंदी कराराची पहिली फेरी झाली आणि दुसरी फेरी 15 जून रोजी चालू झाली. लवकरच कराराचा अंतिम मसुदा सह्यांसाठी तयार झाला की इच्छुक सभासद देश त्यावर सही करतील आणि त्याला रीतसर मान्यता देतील. त्यानंतर तो अंमलात येईल, तेव्हा त्याचे उल्लंघन हा गुन्हा ठरेल. युद्धे आणि शांतता- चळवळी यांचा विसाव्या शतकापासूनचा इतिहास थोडक्‍यात नजरेखालून घातला, तर मानवाच्या 'प्रगल्भते'ची ही प्रगती समजेल. 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन सर्वात भयानक जागतिक महायुद्धे झाली. पहिले युद्ध वसाहतींच्या साम्राज्यांसाठी, तर दुसरे युद्ध भांडवली-साम्राज्यशाही विचारधारेने हिटलरची फॅसिस्ट विचारधारा आणि छुपेपणाने सोव्हिएत रशियातील साम्यवादी विचारधारा यांच्याविरुद्ध पुकारले होते. चार वर्षे चाललेल्या पहिल्या जागतिक युद्धाने सुमारे एक कोटी सैनिक आणि त्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे 70लाख नागरिक मारले.

सहा वर्षे चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाने मात्र फक्त दीड-एक कोटी सैनिक, तर साडेचार ते पाच कोटी नि:शस्त्र नागरिक ठार केल्याचा अंदाज आहे. पहिल्या महायुद्धात मुख्यत: लढाया ट्रेंचेसमधून बंदुकींच्या मदतीने झाल्या. त्यांना रणगाडे, मशीनगन्स, विषारी वायू (रासायनिक अस्त्रे), आणि बाल्यावस्थेतील विमाने यांच्या छायेची साथ होती. आधुनिक विमाने, लष्करी पाणबुड्या यांच्या साथीने झालेल्या दुसऱ्या महायुद्धाने प्रगत रणगाडे, प्रगत रासायनिक बॉम्ब आणि मशीनगन्स यांच्या लढाया अनुभवल्या. काही ठिकाणी रोगराईचे (जैविक अस्त्रे) हल्ले घडविले. हिटलरच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांत संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्‍टोबर 1945 रोजी झाली. अमेरिकेने मात्र आयासेन होवर यांचा सल्ला न मानता ऑगस्ट 1946 मध्ये जपानमधील दोन शहरांवरील अमानुष आणि महाविध्वंसक अण्वस्त्रहल्यांनी महायुद्धाचा शेवट केला. 

दुसऱ्यानंतर तिसरे महायुद्ध काही अजून झाले नाही, परंतु अनेक लढाया झाल्या. अनेकदा रासायनिक आणि जैविक महाविध्वंसक अस्त्रांचा वापर झाला. उत्तरोत्तर सैनिकांच्या तुलनेत वाढत्या प्रमाणात नि:शस्त्र नागरिक ठार होत राहिले.

अण्वस्त्रवापराची दहशत तर कायमच होती. महाविध्वंसांची गंभीर दाखल घेत जगभरातील शांतता चळवळी जन्मल्या. 'बुलेटिन ऑफ ऍटोमिक सायंटिस्टस' या प्रकाशनाने राष्ट्रांतील तणाव, महाविध्वंसक अस्त्रांची निर्मिती, युद्धांच्या धमक्‍या, लढाया, युनोची स्थापना अशा घटनांची दखल घेऊन जगाच्या विनाशाची वेळ दाखविणारे प्रतीकात्मक घड्याळ रचले. जागतिक विनाशाला म्हणजे रात्रीचे बारा वाजण्यास 1947 या पहिल्या वर्षी फक्त सात मिनिटे कमी होती. 

सध्या हे घड्याळ जगाचे 'बारा वाजण्याला' केवळ अडीच मिनिटे कमी असल्याची वेळ दाखविते आहे. बर्ट्रांड रसेल यांनी लिहिलेला आणि स्वाक्षरी केलेला जाहीरनामा नऊ जुलै 1955 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासोबत आणखी नऊ नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञांची स्वाक्षरी आहे. 

'रसेल-आईनस्टाईन' यांच्या नावानेच प्रसिद्धी पावलेला हा जाहीरनामा मानवी अस्तित्वच धोक्‍यात घालू शकणाऱ्या अण्वस्त्रांचा त्याग करून युद्धांऐवजी चर्चांनी प्रश्न सोडविण्याचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह सर्व देशांना मानव वंशाचे सभासद या नात्याने करतो. तो आग्रहपूर्ण सल्ला न जुमानता अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रांस, ब्रिटन, चीन यांनी भरपूर अण्वस्त्र चाचण्या केल्या. उदाहरणार्थ, अमेरिकेने 1946 ते 1958 दरम्यान रिपब्लिक ऑफ मार्शेल आयलंड्‌स या देशाच्या बिकिनी आणि एनेवेटक या दोन बेटांवर 66 अण्वस्त्रचाचण्या केल्या. त्यातील किमान 20 चाचण्यांच्या किरणोत्साराचे गंभीर अनुवांशिक परिणाम शेजारील 
बेटांवरील जनता आजदेखील भोगते आहे. 

आण्विक, रासायनिक व जैविक अस्त्रांचे माणसांवर होणारे त्वरित आणि दूरगामी परिणाम जागतिक स्तरावरील जनतेच्या लक्षात आले. सैनिकांनी सैनिकांशी लढण्याची ही शस्त्रे नाहीत; ती आहेत नि:शस्त्र नागरिकांसोबत अनेक सजीवांचा नाश करणारी आणि मालमत्ता वापरण्यास धोकादायक करणारी अथवा तिचा नायनाट करणारी महाविध्वंसक अस्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्‍शन). हे समजलेल्या युरोप,अमेरिकेतील जनतेने लाखोंच्या संख्येने अण्वस्त्रबंदीसाठी निषेधमोर्चे काढले.

शांतताचळवळींचा देशांच्या सरकारांवर दबाव वाढला. त्यामुळे मर्यादित अण्वस्त्रप्रसारबंदी, अण्वस्त्रनिर्मितीबंदी, मर्यादित जागी अण्वस्त्रसाठेबंदी आणि जोडीला रासायनिक व जैवशास्त्रीय महाविध्वंसक अस्त्रवापरावर बंदी घालणारे अनेक करार साकारले. या प्रयत्नांतील 1968चा अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) हा सर्वात महत्त्वाचा करार आहे. तो अण्वस्त्रधारी पाच राष्ट्रांच्या विकसनशील अण्वस्त्र कार्यक्रमावर बंधने घालत नाही; फक्त त्यांच्या इतर देशातील प्रसाराला साहाय्य करण्यावर बंधने घालतो. याउलट, इतर राष्ट्रांवर अण्वस्त्रे न बनविण्याची बंधने घालतो. या कराराचे सभासदत्व रद्द करून उत्तर कोरियाने आणि सभासद नसणाऱ्या भारत व पाकिस्तानने अण्वस्त्रे बनविली आहेत. इस्राईलने चाचण्या न घेता गुप्तपणे अण्वस्त्रे बनविली. थोडक्‍यात, 'एनपीटी' अण्वस्त्रप्रसारबंदी करू न शकल्याने त्याचे भवितव्य अनिश्‍चित आहे. 

दुसऱ्या महायुद्धानंतर कायम सर्वंकष अण्वस्त्रबंदीच्या मागण्या होत होत्या. नॉर्वे, मेक्‍सिको आणि ऑस्ट्रिया येथे 2013-14 या दोन वर्षांत फक्त अण्वस्त्रांचा मानवावरील परिणाम केंद्रस्थानी ठेवणाऱ्या तीन महत्त्वाच्या परिषदा झाल्या. या परिषदांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व युद्ध धोरणे यांतील अण्वस्त्रांचे महत्त्व असे घिसेपिटे विषयच नव्हते. परिणामी 2015 या वर्षी राष्ट्रसंघाच्या आमसभेत जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या दिशेने ठोस उपाययोजना, कायदेशीर तरतुदी, दंडक तयार करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय गटाची स्थापना झाली. गटाच्या अहवालातील महत्त्वाच्या सूचनेप्रमाणे मे 2016 मध्ये अशा कराराचा अंतिम मसुदा 2017 या वर्षात तयार करण्याचा ठराव राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडला. त्याला राष्ट्रसंघाच्या 195 सभासद देशांपैकी 138 बिगर-अण्वस्त्रधारी सभासद देशांनी मान्यता दिली. त्यानुसार मार्च आणि जून-जुलै महिन्यांतील वाटाघाटींच्या दोन प्रदीर्घ फेऱ्यानंतर या कराराचा अंतिम मसुदा सात जुलैला जाहीर होइल. त्याची आतुरतेने वाट पाहतील आपल्यासह जगभरचे शांतताप्रेमी! 

(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nuclear Power NPT