दिवसाची सुरवात होताना... 

आसावरी काकडे
सोमवार, 19 मार्च 2018

बाल्कनीत बसून चहा पीत होते. अजून पेपर कसा आला नाही, असं मनात येतंय तोपर्यंत पेपर समोर येऊन पडला. उठून खाली पाहिलं. पेपर वर टाकून वर्तमानपत्रांचे गठ्ठे सायकलीला लावून चाललेली एक-दोन मुलं दिसली. काही मुलं दुधाच्या पिशव्या घेऊन येत-जात होती. काही गाडी पुसत होती. पेपर यायला जरासा उशीर झाला, तर लगेच तो न आल्याची जाणीव झाली. एरव्ही आपण उठायच्या आधी बाल्कनीतून उडी मारून पेपर आत आलेला असतो.

बाल्कनीत बसून चहा पीत होते. अजून पेपर कसा आला नाही, असं मनात येतंय तोपर्यंत पेपर समोर येऊन पडला. उठून खाली पाहिलं. पेपर वर टाकून वर्तमानपत्रांचे गठ्ठे सायकलीला लावून चाललेली एक-दोन मुलं दिसली. काही मुलं दुधाच्या पिशव्या घेऊन येत-जात होती. काही गाडी पुसत होती. पेपर यायला जरासा उशीर झाला, तर लगेच तो न आल्याची जाणीव झाली. एरव्ही आपण उठायच्या आधी बाल्कनीतून उडी मारून पेपर आत आलेला असतो. दाराला अडकवलेल्या पिशवीत दूध येऊन पडते. आवरून फिरायला बाहेर पडेपर्यंत गाडी स्वच्छ पुसलेली असते. 

पण, हे सारं बिनबोभाट करणारी मुलं क्वचितच नजरेला पडतात. गोष्टी वेळच्या वेळी घडतात, तोपर्यंत त्यांचं अस्तित्वही जाणवत नाही. लगबग करणाऱ्या त्या मुलांकडं पाहताना मनात आलं... ही मुलं किती प्रसन्नपणे आपला दिवस सुरू करून देत असतात. थंडी, वारा, पाऊस... काही असो, पायांना भिंगऱ्या लावल्यासारखी पहाटेपासून भिरभिरत असतात ती. 
त्यांचे हात सुकाणूंसारखे वळवत राहतात त्यांचा दिवस. ठरल्यानुसार एकेका घरी ती पेपर, दूध टाकत जातात. त्यांना कधी सुटी असत नाही. ती कधी संप पुकारत नाहीत. कॉम्प्युटरमधे फीड केलेल्या प्रोग्रॅमसारखा आखलेला असतो त्यांचा दिवस. ती उठतात आणि गतीचं बोट पकडून कामाला लागतात. 

वाटलं, भोवती किती काय काय घडत असतं, त्यानं ती बिथरत नसतील काय? कशी सोडवत असतील ती बाहेरचा वेग आणि आतले आवेग यांचं गणित? त्यांच्या रक्तदाबाला उसंत असत नसेल वर-खालीचे नखरे करायला. जगण्याच्या अरुंद रस्त्यावरून धावताना त्यांचं हृदय धडधडत असेल निमूट शरीराच्या नियमांनुसार.... त्यांच्या देहबोलीवरून वाटत नाही की कधी ती अगतिक होत असतील. 

आपला दिवस सुरू करून देणारी ही प्रातःस्मरणीय मुलं पाहून छोटी छोटी कामं करणाऱ्या अशा अनेक माणसांचा विचार मनात पिंगा घालायला लागला. रोज येणारी घरकाम करणारी बाई, जिने झाडून ओला- सुका कचरा घेऊन जाणारा माणूस, रोज ठराविक ठिकाणी बसणारी भाजीवाली, प्लंबिंग, लाईटची किरकोळ कामं करणारी मुलं... 

ही सगळी साधीसुधी माणसं आपल्या कितीतरी गरजा भागवत असतात. आपलं रोजचं जगणं सुरळीत करत असतात. राजकारण, समाजकारणातल्या विविध वादांपासून, आजूबाजूला घडणाऱ्या समाजविघातक "ऐतिहासिक' वाटणाऱ्या घटनांपासून चार हात दूर असतात. होता होईल तेवढं ती परिस्थितीशी जमवून घेतात. सहसा रस्त्यावर येत नाहीत.

पण ती "निष्क्रिय' असतात, असं मात्र नाही. समाजस्वास्थ्य टिकवून ठेवण्याचं मोठं काम त्यांच्याही नकळत ती करत असतात. बाल्कनीतून त्यांच्याकडं पाहताना वाटलं, ही पृथ्वी केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर नाही, तर जगभरातल्या अशा साध्या माणसांच्या अविचल जिजीविषेवर तोल सावरत फिरते आहे. 

Web Title: Marathi News Pune Edition Article On Start Day Written by Asavari Kakade