श्रीखंड आणि कडूनिंब! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1940 चैत्र शुद्ध प्रतिपदा. 
आजचा वार : श्रीखंडयुक्‍त आईतवार. 
आजचा सुविचार : अवकाळी पावसात भिजू या चिंब। खा हो खा अमुचा कडूनिंब !! 

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) आपल्या नववर्षाचा आजचा पहिला दिवस. नवे संवत्सर सुरू झाले आहे. हातात नवीकोरी डायरी घेतली. यंदा नामलेखनाचा लक्ष पूर्ण करायचा आहे. होईल, होईल !! येते संवत्सर आम्हा साऱ्यांना "अच्छे' जावो, अशा शुभेच्छा स्वत:स देण्याचा मंगल दिवस !! ठरविल्याप्रमाणे सकाळी उठलो. शुचिर्भूत होऊन सर्वांत आधी मोबाइल फोन हातात घेऊन कपाळाला लावला.

"नमो नम:' असा नामाचा गजर करून (दिल्लीतील) सर्व इष्टदैवतांना आधी गुढी मॉर्निंग' केले, मग लागलीच "गुढी पाडव्याच्या शुभेच्छा' असा व्हाट्‌सऍप संदेश पाठवला. पाठोपाठ रिप्लाय आला : "नुसत्या शुभेच्छा चालणार नाहीत. प्रत्येक मंत्र्याने आपापल्या निवासात गुढी उभारून त्याचा फोटो सेंड करावा.' दिल्लीहून आलेली अशी सूचना म्हणजे जवळ जवळ अध्यादेशच असतो. त्यामुळे सर्व मंत्र्यांना तसे कळवले. 

बाय द वे, गुढी उभारणे हे काम वाटते तितके सोपे नसते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तर नाहीच नाही ! गुढीचे वस्त्र (कपाटातून) शोधून काढण्यापासून शेजारच्या बंगल्याच्या आवारातील कडूनिंबाचा पाला ओरबाडून आणण्यापर्यंत असंख्य कामे कर्त्या पुरुषास करावी लागतात. गुढीच्या डोक्‍यावर चंबू ठेवताना त्याचा ब्यालंस सांभाळणे (ब्यांक ब्यालंसइतकेच) कठीण जाते. ज्याच्या घराच्या सज्जाला गजाच्या खिडक्‍या असतात, त्यांना बरे पडते. पण स्टुलावर उभे राहून गुढी उभारायची वेळ आली की नशीब डुगडुगत्ये !! मीदेखील गुढी उभारण्यासाठी स्टुलावर चढलो होतो... जाऊ दे. मुरगळलेला पाय अंमळ दुखतो आहे. 

आज आल्यागेल्याला कडूनिंबाची चार पाने खायला लावायचीच, असा चंग बांधला. आज सुट्‌टी होती म्हणून ! नाहीतर कडूनिंबाचा भारा विधिमंडळात नेऊन सर्वांना खायला लावला असता. आमची गुढी (कशीबशी) उभारून हुश्‍श करतो न करतो तोच घाईघाईने आमचे चंदूदादा कोल्हापूरकर आले. त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही कडूनिंबाची चार पाने त्यांच्या हातावर ठेवून शुभेच्छांची परतफेड केली. 
""गुढीचा फॉर्वडेड फोटो फाइल केला तर चालेल का?'' कडवट तोंड करत त्यांनी विचारले. ""का? बांधा की नवी !'' आम्ही नकार दिला. आम्हीही नुकताच कडूनिंब खाल्ला होता ना ! 

""घरी स्टूल नाहीए...,'' त्यांनी अडचण सांगितली. आम्ही आमच्या घरचे स्टूल दिले. संध्याकाळी परत करा, हे सांगायला विसरलो नाही. चंदूदादा येऊन गेले, पाठोपाठ विनोदवीर तावडेजी आले. 

""माझ्याकडे टेबललॅम्प साइजची गुढी आहे. दरवर्षी ती मी भेट पाठवत असतो. त्याचा फोटो चालेल का?'' त्यांनी विचारले. हा मनुष्य हाती आलेल्या प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम बदलायला निघाला आहे !! मी ठाम नकार दिला. म्हणालो, नथिंग डुइंग...फूल साइज गुढीचाच फोटो हवा !! 

अखेर सगळ्यांनी सुमारे दहा फूट उंचीची, केसरिया रंगाची, तांब्याच्या गडूची गुढी उभारणेची असून साखरगाठी व कडूनिंब अनिवार्य आहे, याची संबंधितांनी नोंद घेणेची आहे, असे सरकारी भाषेत पत्रकच काढून मोकळा झालो. वनमंत्री मुनगंटीवारजी ह्यांना सांगून कडूनिंबाचे भारे आणवले आणि सगळ्यांकडे होम डिलिवरी केली !! म्हटले, सरकारी कामात उगीच संभ्रम आणि विलंब नको. श्रीखंड खा, पण सोबत कडूनिंबही चावा !!

सध्या आपला पक्ष ह्याच दोन चवी आलटून पालटून अनुभवतो आहे !! ...पण संभ्रम नको, असे म्हणून चालते थोडेच ! "चक्‍का घरचा हवा की रेडीमेड श्रीखंड आणावे?' अशी क्‍वेरी काहींनी काढलीच !! मी लगोलग चातुर्याने नेहमीचे उत्तर पाठवले : अभ्यास चालू आहे ! 
 

Web Title: Marathi News Pune Edition Pune Editorial Dhing Tang