काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चे गड तूर्त तरी शाबूत

दयानंद माने
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे लोण मराठवाड्यात कुठपर्यंत आलेय, याची चर्चा गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात व माध्यमांत झाली.

महाराष्ट्र माझा : मराठवाडा

राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे लोण मराठवाड्यात कुठपर्यंत आलेय, याची चर्चा गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात व माध्यमांत झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी नात्याचे संबंध असणारे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, आमदार राहुल मोटे यांच्यापासून ते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नावांची चर्चा रंगली. या चर्चेनंतर या नेत्यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, असे असले तरी पडद्याआड बऱ्याच गोष्टी घडत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जाणवते. काँग्रेसचे नेते व सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीआधीच भाजपप्रवेशाच्या घोषणेचा बार उडवून दिल्याने त्यांचा प्रवेश ही औत्सुक्‍याची गोष्ट राहिलेली नाही.

राजकीय अस्तित्वाविषयी धास्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ मराठवाड्यातही येणार आहे. त्या वेळी काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ची बरीच मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. संभाव्य पक्षांतराच्या बातम्यांनंतर ‘राष्ट्रवादी’च्या वरिष्ठ नेत्यांकडून संबंधित नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या अनेक नेत्यांवर भाजपने मोहिनी घातली आहे, हे नक्की. विशेषतः लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवानंतर या नेत्यांच्या मनात स्वतःच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भीती निर्माण झाली आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये त्यांचा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सोडला आहे, हे ओळखून पक्षांतर होण्याची शक्‍यता आहे. मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये प्रवेश केला. पण, संबंधित जागा शिवसेनेकडे असेल तर काय करायचे? या भीतीनेही, तसेच आपल्या राजकीय सोयीसाठी शिवसेनेत प्रवेश करायचा, असाही विचार काही नेते करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यात कमालीची चुरस
विशेषतः ज्या जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा ‘राष्ट्रवादी’ कमजोर आहे, तेथे ‘राष्ट्रवादी’चे नेते; तर जेथे ‘राष्ट्रवादी’ बळकट आहे तेथे काँग्रेस नेते पक्षांतर करण्याच्या विचारात आहेत. याचे उदाहरण म्हणजे नांदेड जिल्हा. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी येथील ‘राष्ट्रवादी’ खिळखिळी केली, असा आरोप ‘राष्ट्रवादी’चे नेते करतात. प्रत्येक वेळी पक्षनेतृत्वाने सांगितल्यानुसार काँग्रेसचा प्रचार करायचा, याला वैतागून येथील ‘राष्ट्रवादी’ची मंडळी भाजपकडे जात आहेत. पक्षाचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच, पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या मदतीने जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद मिळविले आहे. या दोघांनी चिखलीकर यांच्या गावातील सत्काराला हजर राहून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. तसेच, यापुढील आपली राजकीय वाटचाल भाजपमधून करणार असल्याचे सूतोवाच केल्याने पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व कंधार व किनवट वगळता नाममात्र राहिले आहे. जिल्ह्यात प्रदीप नाईक हे एकमेव आमदार ‘राष्ट्रवादी’चे आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण व त्यांच्या विरोधातील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप, असा राजकीय प्रवाह जिल्ह्यात निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्षपद नसल्याने आता अशोक चव्हाण हे जिल्ह्यावरील आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, तर चव्हाणांचा प्रभाव संपविण्यासाठी काहीही करण्याचे धोरण चिखलीकरांनी आखल्याने जिल्ह्यात सर्व निवडणुका चुरशीच्या होतील.

भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बीड व लातूर जिल्ह्यांत निवडणुकीच्या आधीच अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षबदल केला आहे. आपली हयात काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’त घालविलेले जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेची, तर सुरेश धस यांनी याआधीच भाजपची कास धरली आहे. लातूर जिल्ह्यातही महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये अनेक जण गेले होते. तेथे संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मुसंडी मारली आहे. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगकर यांच्या या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आपले वैभव पुन्हा मिळवेल काय, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. एकंदरीत, राज्यभरातील पक्षांतराच्या लाटेचा तूर्त तरी फार मोठा फटका मराठवाड्यात बसलेला नसला; तरी काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या नेतृत्वाला डोळ्यांत तेल घालून आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Congress, NCP yet when the strength of intact