साक्षात्कार

विश्‍वास सहस्रबुद्धे
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

साक्षात्कार ही एक विलक्षण संकल्पना आहे. साक्षात्कार म्हणजे कोठल्याही प्रयत्नाशिवाय ज्ञान प्राप्त होणे. सहसा आपण असे मानतो, की साक्षात्कार होणे ही सामान्य माणसाच्या अखत्यारीतील बाब नव्हे; पण वाच्यार्थाने प्रत्येकाने केव्हा ना केव्हा साक्षात्काराचा अनुभव घेतलेला असतो. उदाहरणार्थ आपली एखादी हरवलेली गोष्ट- समजा किल्ली- आपण शोधण्याचा खूप प्रयत्न करतो; पण ती काही केल्या सापडत नाही. शेवटी आपण नाद सोडून देतो. अचानक आकाशात वीज चमकावी तसे आपणाला आठवते, की ती गोष्ट अमुक जागी असायला हवी आणि काय आश्‍चर्य! ती वस्तू त्या जागी सापडते.

साक्षात्काराचे वरील उदाहरण अगदीच व्यावहारिक पातळीवरचे आहे. म्हणजे त्यात आपल्याला एका गोष्टीचा, उदाहरणार्थ किल्लीचा शोध होता; परंतु आपल्याला साक्षात्कार या गोष्टीचा परिचय होतो, तो काही गूढ आख्यायिकांवरून. सहसा या आख्यायिका अधिकारी व्यक्तींच्या संदर्भात असतात. त्यांनी कोठल्या तरी निर्जन स्थानी जाऊन तपश्‍चर्या केली आणि आणि त्यांना साक्षात्कार झाला, अशा किंवा यासारख्या आशयाच्या या आख्यायिका असतात; परंतु या व्यक्तींना नेमका कशाचा शोध होता, हे स्पष्ट होत नाही. अनेकदा हा शोध "अंतिम सत्या'चा होता असे सांगितले जाते; पण "अंतिम सत्य' म्हणजे नेमके काय?- याचा उलगडा केला जात नाही. साक्षात्कार ही गोष्ट सामान्य माणसाच्या बाबतीत घडणे शक्‍य नाही. असे किंवा उलटपक्षी साक्षात्काराचा अनुभव घेतलेली व्यक्ती सामान्य कोटीतील न राहता अधिकारी या वर्गात जाते असे समजले जाते.

वर दिलेले, हरविलेली किल्ली सापडण्याचे उदाहरण हे साक्षात्काराचे आहे असे मानता येते. साक्षात्काराला "झटिती प्रत्यय' असेही म्हटले जाते. असे अनुभव तत्त्वज्ञान, विज्ञान आणि कला या सर्व क्षेत्रांत आल्याची उदाहरणे आढळतात. तर्कशुद्ध व पायरी पायरीने (स्टेप बाय स्टेप) अशा पद्धतीऐवजी एखादी गोष्ट अचानक सुचणे म्हणजे "झटिती प्रत्यय'. केकुल या शास्त्रज्ञाला बेन्झिनच्या रेणूची रचना षटकोनी असल्याची कल्पना स्वप्नात सुचली (किंवा दिसली) होती असे सांगितले जाते. ग. दि. माडगूळकर किंवा जगदीश खेबुडकर यांच्यासारख्या प्रतिभाशाली कवींना काही मिनिटांतच एखादे सुंदर काव्य कसे स्फुरत असे, याचे अनेक लोक साक्षी आहेत; परंतु त्यामुळे "साक्षात्कार' ही गोष्ट चमत्काराच्या श्रेणीतील आहे असे समजू नये. फार तर आजमितीला आपल्याला ते नेमके कसे घडते हे कळलेले नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. साक्षात्कार ही गोष्ट अतर्क्‍य असली तरी अतार्किक नव्हे आणि चमत्काराच्या कोटीतील तर नक्कीच नव्हे.

माणसाचे मन हा प्रांत अजूनही खूप सारा अज्ञात आहे. मनोव्यापारांची कोडी उलगडण्यासाठी माणसाचे अथक परिश्रम आणि संशोधन सुरू आहे. आज ना उद्या अशा गोष्टींमागील कार्यकारणभाव उलगडल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: marm coloum