लग्न कशासाठी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

लग्न कशासाठी?

सु स्‍थिर समाजासाठी आणि नव्या पिढीच्या संवर्धनासाठी कुटुंब व्यवस्‍था महत्त्‍वाची असते, हे कुणीच नाकारत नाही, पण कुटुंब व्यवस्‍था साकारत असते ती लग्नसंस्‍थेतून. साहजिकच आजची तरूणाई- तिची लग्नासंदर्भातली मानसिकता - यावरच कुटुंब व्यवस्‍थेचं भवितव्य ठरणार आहे. आजच्या तरूण-तरूणींचं करिअरला प्राधान्य असलं तरीही कुटुंबात मिळणारं स्‍थैर्य, सौख्य हेही त्यांना हवंच आहे. मात्र हेही खरं की आजच्या काळात, लग्नानंतरचे विसंवाद, घटस्‍फोटाचे प्रमाणही वाढलं आहे. उच्चशिक्षित तरूण-तरूणींमध्ये ते लक्षणीय आहे. ‘स्‍पाऊज’मध्ये शोभा डे तर म्‍हणतात, ‘आज मुंबईतले झाडून सगळे क्‍लब आणि लाऊन्स बार तिशीतल्‍या एकेकट्या घटस्‍फोटित तरूण-तरूणींनी भरभरून वाहताना दिसतात.’

लग्नसंस्‍था टिकावी असं वाटत असेल तर मुळात ‘लग्नं’ टिकली पाहिजेत. ती बहरली पाहिजेत, यशस्‍वी झाली पाहिजेत. त्‍यासाठी काय -खरं तर काय काय - करावं लागेल, कोणती दक्षता घ्यावी लागेल, हाच विचार आपण पुढील काही लेखांत करणार आहोत. लग्न हे आयुष्यातलं एक मोठं वळण असतं. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात काही बदल होणार असतात. बंधनं येणार असतात. जबाबदाऱ्या वाढणार असतात. या अपरिहार्य आणि महत्त्‍वाच्या गोष्टींवर लग्नापूर्वीच काही चिंतन-मंथन व्‍हायला हवं. त्‍यावर दोघांत विचार विनिमय व्‍हायला हवा, संवाद व्‍हायला हवा. प्रत्‍यक्षात या गोष्टींचा विचारच होत नाही. आजची तरूणाई लग्नाकडे एक ‘इव्‍हेंट’ म्‍हणून पाहताना दिसते. प्री वेडिंग शुट, डेस्‍टिनेशन वेडिंग, ब्राइडल मेकअप, संगीत... यावरच सगळा भर. मौज म्‍हणजे ही मंडळी लग्नातील पारंपारिक विधीही ‘एन्जॉय’ करताना दिसते. जरूर करावेत. पण त्‍यातील अर्थ आणि गांभीर्य ध्यानात घेणं, हेही आवश्‍यक असतं.

पहिला प्रश्‍न आहे तो लग्न कशासाठी? हा प्रश्‍न कदाचित अप्रस्‍तुत वाटेल. ‘सगळेच तर करतात... सहजीवनासाठी समाजमान्यता आणि मुलं- यासाठी तर लग्न करावंच लागतं,’ हे त्‍यावर उत्तर दिलं जाईल. पण आता लग्नाशिवाय सहजीवन (लिव्‍ह इन रिलेशनशिप), अपत्‍यांसाठी सरोगसी- हेही पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय अर्थातच बहुसंख्यांना रूचणारे नाहीत, पण त्‍यासाठी ‘लग्न करावंच लागतं’ हा दृष्टिकोन असेल तर ते आयुष्यभर निभावणं कठीण जाऊ शकतं. लग्न, संसार, कुटुंब म्‍हणजे या खेरीजही खूप काही असतं, याचं भान ठेवायला हवं. लग्न कशासाठी तर दोघांनाही ‘घर’ हवं आहे, आवडत्‍या जोडीदारासोबत त्‍या घरात राहायचं आहे, आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायची आहे, सुख दुःखं ‘शेअर’ करायची आहेत, आयुष्यातील ‘चढ उतारां’ना तोंड देत परस्‍परांच्या सोबतीनं वाढायचं आहे, स्‍वतंत्र आणि एकत्रही फुलायचं आहे, मुलं तर हवी आहेतच, त्‍यांना वाढवण्यातला आनंदही घ्यायचा आहे...

ही खरी लग्नासाठीची ‘सबळ कारणं’ म्‍हणता येतील.

प्रत्‍यक्षात, (बऱ्याच) स्‍त्रियांची याहीपेक्षा काही वेगळी कारणं असू शकतात. ‘स्‍त्रिया लग्न का करतात?’ मंगला आठलेकर म्‍हणतात, ‘स्‍पष्टच सांगायचं तर त्‍यांच्या खाण्यापिण्याचा, राहण्याचा, शरीरसुखाचा, आई बनण्याचा, सामाजिक प्रतिष्ठेचा... एवढे सगळे प्रश्‍न एका लग्न करण्यानं सुटतात. बापाच्या घरी मुलगी फार काळ राहिली तर ती लोढण्यासारखी वाटायला लागते. विशी-पंचविशीनंतर तिलाही तिथं राहणं अवघड वाटू लागतं... मग ती येईल त्‍या स्‍थळाशी लग्न उरकून मोकळी होते!’ हे विवेचन खूपच परखड वाटू शकेल, पण हेही तितकंच खरं ‘आर्थिक स्‍थैर्य’ हाच काही स्‍त्रियांचा निकष असू शकतो.

तोच मुख्य उद्देश असेल तर इतर म्‍हणजे मानसिक, भावनिक गरजांची पूर्ती झाली नाही तर चालणार आहे का- हाही प्रश्‍न स्‍त्रियांनी स्‍वतःला विचारायला हवा. काही स्‍त्रियांचा ‘मातृत्‍वासाठी लग्न’ हाच मुख्य उद्देश असू शकतो, पण लग्न निभावण्यासाठी तो पुरेसा नसतो. ‘आई’ ही भूमिका महत्त्‍वाची असली तरी ‘पत्नी’ ही त्‍याहून महत्त्‍वाची (व अवघड) भूमिका असते. त्याहीपेक्षा महत्त्वाची असते ती स्वतःची अस्मिता. स्वतःकडे किंवा पतीकडे दुर्लक्ष करून त्या संदर्भातल्या गरजा दुय्यम लेखून कुठलीही स्त्री आईची भूमिका योग्य पद्धतीने निभावू शकत नाही.

थोडक्यात काय केवळ बरेचसे प्रश्‍न सुटतात या सोईस्कर विचाराने स्त्रियांनी (आणि पुरुषांनीही) लग्न करण्याचे दिवस आता राहिले नाहीत.