जे जे ‘उत्कट’, उदात्त, उन्नत...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या करुणरस, वीररस ते अगदी प्रेमरस यांनी भारलेल्या कोणत्याही कविता वाचताना ठळकपणे उठून दिसते ती त्यामागील उत्कटता आणि त्याच्या माध्यमातून साधलेला परिणाम.
vinayak damodar savarkar
vinayak damodar savarkarsakal

- मयूर भावे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या करुणरस, वीररस ते अगदी प्रेमरस यांनी भारलेल्या कोणत्याही कविता वाचताना ठळकपणे उठून दिसते ती त्यामागील उत्कटता आणि त्याच्या माध्यमातून साधलेला परिणाम. स्वातंत्र्यवीरांच्या आजच्या (ता.२६) स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या काव्यांचा घेतलेला मागोवा.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘जयोऽस्तुते...’ हे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र’ लिहिताना जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते... असे म्हटले. उत्कटता हा सावरकरकाव्याचा गुण आहे आणि त्यामुळे साधला जाणारा परिणामही! सावरकरांच्या काव्यातून विविध प्रकारची रसनिष्पत्ती होत असली, तरी त्यात उत्कटता हा समान धागा जाणवतो. करुणरसातही सावरकरांची उत्कटता दिसते. ‘स यत्स्वभावः कविस्तदनुरूपं काव्यम्’ या राजशेखर काव्यमीमांसेप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली उत्कटताच त्यांच्या काव्यात उतरली असावी.

सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. के. ना. वाटवे यांनी असे म्हटले होते, ‘ज्या हाताने सावरकरांनी कृती केली. त्याच हाताने त्यांनी तीवर काव्य रचले. त्यांचे कार्य जितके तेजस्वी, तितकीच त्यांची कविताही उत्कट.’ भा.कृ. केळकर यांनी म्हटले आहे की, सावरकरांच्या असामान्य जीवनामुळे व त्यांच्या उत्कट ध्येयवादामुळे त्यांच्या साहित्यातील अनुभूती ही फार मोठी आहे.

नेपोलियन कवी असता, तर त्याने काय लिहिले असते? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले दिव्य जीवन कोणत्या शब्दांनी वर्णिले असते? भगतसिंगाने फासाचे चुंबन घेण्यापूर्वी कविता केली असती, तर ती किती भावोत्कट झाली असती? या सगळ्यांची अनुभूती उत्कटच होती. मात्र, सावरकरांनी ती उत्कटता काव्यात उतरवली.

त्यांनी स्वातंत्र्याचा उल्लेखही ‘स्वातंत्र्यलक्ष्मी’ असा केला. ‘तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूचि...’ असे म्हणताना ‘मोक्ष, मुक्ती ही तुझीच रूपे...’ असेही ते म्हणतात. याच कवितेतील ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण...’ ही स्पष्टोक्ती, ठामपणा उत्कटतेतूनच आला आहे.

वीररसपूर्ण पोवाडे

सावरकरांनी बाजीप्रभूंचा आणि सिंहगडाचा असे दोन पोवाडे लिहिले. त्यातही हीच उत्कटता आहे. सिंहगडाच्या पोवाड्यात लढणारा तान्हाजी धारातीर्थी पडला हे सांगताना ते लिहितात की,

मग त्या गडची भूमी ठेवी तानाजिस उदरी

तेव्हापासुनि रत्नाकर बहु तीचा द्वेष करी

समुद्राकडे जगभरातील अनेक मौल्यवान रत्ने असली, तरी ‘तान्हाजी’ हे रत्न सिंहगडावरच राहिलं. यामुळे तोदेखील सिंहगडाचा द्वेष करतो. बाजीप्रभूंच्या पोवाड्यातील वर्णन तर अंगावर काटा आणते-

घ्या सूड म्लेंच्छ मत्ताचा। त्याचा मस्तक चेंडू साचा।

समररंगणी चेंडूफळीचा डाव भरा आला

शत्रूचं डोकं हा जणू चेंडू आहे व ते उडवणारे बाजी समररंगणी चेंडूफळीचा डाव खेळताहेत, हे वाचताना दोन हातात दोन दांडपट्टे घेतलेले, लाल रंगात रंगलेले बाजीच डोळ्यांसमोर येतात.

ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर सावरकरांना ‘सागरास’ ही कविता स्फुरली. यात ते भावव्याकुळ झालेले दिसतात. मात्र, त्या क्षणीही ‘अबला न माझी ही माता रे। कथिल हे अगस्तिस आता रे।’ असे समुद्राला ठामपणे सांगून ‘जो आचमनी एक क्षणी तुज प्याला...’ अशी भीतीही त्याला दाखवतात.

सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव काळ्या पाण्यावर गेले. धाकटे बंधू डॉ.नारायणराव यांनाही अटक झाली. स्वतः सावरकर तेव्हा लंडनमध्ये होते आणि त्यांच्याही मागे पोलिसांचा ससेमिरा होता. एकाच घरातील तिन्ही भाऊ स्वातंत्र्यसमरात स्वतःच्या जीवनाचे अर्घ्य देत होते. अशा स्थितीत घरी होती ती सावरकरांची पत्नी आणि मोठी वहिनी. त्याही परिस्थितीत त्यांनी वहिनीला दोन पत्रे पाठवली. त्या दोन्ही कविताच होत्या.

‘सांत्वन’ कवितेत ते लिहितात-

धन्य धन्य तो आपला वंश। सुनिश्‍चये ईश्‍वरी अंश।

तर, ‘माझे मृत्यूपत्र’मध्ये म्हणतात की,

हे काय बंधु असतो जरी सात आम्ही।

त्वस्थंडिलीच असते दिधले बळी मी।

म्हणजे, तीनच काय आम्ही सात भाऊ असतो, तरीही त्यांनी देशासाठी प्राणत्यागच केला असता.

प्रचंड प्रतिभेचा कवी सावरकरांनी लिहिलेल्या प्रेमकविताही या उत्कटतेला अपवाद नाहीत. जाई-जुईची फुले तोडणाऱ्या एका सुंदर मुलीचे वर्णन त्यांनी ‘तनुवेल’ नावाच्या कवितेत केले. त्यात ते म्हणतात-

उंचाविता कर छातिवरी ये चोळी तटतटुनी

कुरळ केश रूळतात गोरट्या मानेवरि सुटुनी

अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जे तुला

फुलवेलीहून तनुवेलचि तव मोहक दिसली मला

‘संगीत संन्यस्तखड्ग’ नावाच्या सावरकरांनी लिहिलेल्या नाटकातील प्रियकराची वाट पाहणारी नायिका म्हणते-

शत जन्म शोधिताना। शत आर्ति व्यर्थ झाल्या।

शतसूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या।

तेव्हा पडे प्रियासी। क्षण एक आज गाठी।

मात्र तो आलेला क्षणही एकाच क्षणात गेला, हे रंगवताना तात्याराव लिहितात-

क्षण तो क्षणात गेला। सखी हातचा सुटोनी।

याबद्दल पु. ल. देशपांडे असे म्हणाले होते, ‘‘एका सूर्यमालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ. हा महाकवी शतसूर्य मालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिभा घेऊन आलेल्या कवीला कोठडीत राहावे लागले आणि ही भयाण कोठडी ‘कमला’, ‘सप्तर्षी’, ‘विरहोछ्वास’ असल्या प्रतिमेची उत्तुंग शिखरे दाखवून देणाऱ्या काव्यांची जन्मस्थळे ठरली.’

‘मी वृत्तीने कवी किंवा कलावंत आहे. परिस्थितीने मला राजकारणी केलं’, असं म्हणणाऱ्या सावरकरांचे काव्य त्यांच्यासारखेच अनादि, अनंत आहे. सावरकरांचे आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले असल्याने त्याचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकालाच ते उत्कट वाटते. त्यामुळेच त्यांची कविताही उत्कट ठरते. कारण-

‘तूतेचि अर्पिली नवी कविता रसाला।

लेखांप्रति विषय तूचि अनन्य झाला।’

हा ‘अनन्य’भाव त्यांच्या काव्यात आहे आणि तो देशप्रेमासारखाच उत्कट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com