अभिनव वाग्विलासिनी

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा सहा जून रोजी स्मृतिदिन आहे.त्यांचे जन्मशताब्दी वर्षही ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे. त्यानिमित्त या ज्येष्ठ कवयित्रीच्या कारकिर्दीची आठवण जागवणारा लेख.
Shanta Shelke
Shanta ShelkeSakal

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा सहा जून रोजी स्मृतिदिन आहे.त्यांचे जन्मशताब्दी वर्षही ऑक्टोबरमध्ये सुरू होत आहे. त्यानिमित्त या ज्येष्ठ कवयित्रीच्या कारकिर्दीची आठवण जागवणारा लेख.

`असेन मी, नसेन मी

​तरी असेल गीत हे

​फुलाफुलात येथल्या

​उद्या हसेल गीत हे'',

असं आपल्या कवितेतून सांगणाऱ्या शांताबाईंनी साहित्याच्या विविध प्रांतांत लीलया मुशाफिरी केली. त्यांच्या बालपणाचा बराचसा भाग वडिलांच्या नोकरीच्या गावी राहण्यात गेला. त्यांचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना राहण्यासाठी ज्या जागा मिळत, त्याही गावापासून दूर असत. या काळात शांताबाईंची आई हीच त्यांची मैत्रीण होती. त्यांना वाचनाचे वेड लागले. सुटीत शेळक्यांच्या वाड्यात गेल्यानंतर लहानपणी विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यातून त्यांचे सूर तालांशी नाते जोडले गेले.

वडील गेल्यानंतर १९३० मध्ये त्या पुण्याला आल्या. त्यांनी हुजूरपागेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर स.प. महाविद्यालयात प्रा. श्री. म. माटे, के.ना.वाटवे आणि रा.श्री.जोग यांच्यासारखे गुरू त्यांना लाभले. फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळातील कवींच्या कविता यांनी भारावलेला तो काळ होता. आपणही लेखनाच्या क्षेत्रात धडपड करावी, असे त्यांना वाटू लागले. रविकिरण मंडळातील माधव ज्युलियन यांच्या काव्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शांताबार्इंची सुरवातीची कविता त्याच वळणाची होती. एम. ए. झाल्यानंतर शांताबाई मुंबईला आल्या आणि अत्र्यांच्याच `नवयुग'' साप्ताहिकात त्या काम करू लागल्या. आचार्य अत्र्यांसारख्या मुरब्बी संपादकाच्या हाताखाली शांताबाईंना खूप शिकायला मिळाले.

नाना तऱ्हेचे लेखन करण्याची सवय या काळात शांताबाईंना लागली. मुख्य म्हणजे प्रतिभा, स्फूर्ती, मूड लागणे, लेखनाची बैठक जमणे याखेरीजही लिहिता येते हे त्यांना जाणवले. आरंभीच्या काळात शांताबाईंना प्रौढ, विदग्ध आणि संस्कृतप्रचुर भाषाशैलीचे खूप आकर्षण होते. तसे लिहिणे म्हणजे खरे साहित्य, अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यांच्या लेखनाचे हे संस्कृत वळण अत्र्यांनी पार बदलून टाकले. शांताबाईंनी गद्य अनुवादाचा श्रीगणेशा `नवयुग''मध्ये केलेला असला, तरी त्यांच्या अनुवादाला कलात्मक परिमाण लाभले ते मात्र `हंस'' मासिकात. दर महिन्याला शांताबाईंनी केलेल्या कथांचे अनुवाद `हंस''मधून प्रसिद्ध होऊ लागले. शांताबाईंच्या अभिरुचीला मुंबईतल्या वास्तव्याने प्रगल्भ आणि विकसित केले. `मौज'' आणि `सत्यकथे''चे वाचन, श्री. पु. भागवत, राम पटवर्धन, मॅजेस्टिकचे केशवराव कोठावळे, वा. रा. ढवळे यांच्याबरोबरच्या चर्चांत त्यांच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या.

शांताबाईंनी विविध प्रकारचे साहित्य लिहिले असले, तरी त्यातले कवितेशी असलेले त्यांचे नाते सर्वांत जवळचे होते. १९४७ साली त्यांचा `वर्षा'हा पहिला कवितासंग्रह आला. त्यानंतर `रूपसी' हा कवितासंग्रह आला. या दोनही कवितासंग्रहांवर रविकिरण मंडळाच्या कवितांचा प्रभाव दिसतो. `गोंदण'' या कवितासंग्रहापासून शांताबाईंची कविता अनुकरणापासून दूर झाली आणि तिला स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व लाभले. पुढे त्यांची कविता अधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रयोगशील होत गेली. चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची पहिली संधी शांताबाईंना दिनकर द. पाटील यांनी `राम राम पाव्हणं'' या चित्रपटात दिली. पण चित्रपटासाठी गाणी कशी लिहावीत, याचा वस्तुपाठ त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला. ‘सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत. तुमचं वाङ्मय, साहित्य सारं विसरा आणि रोजच्या अगदी साध्या बोलायच्या भाषेत जणू आपण एकमेकांशी बोलतो आहोत, अशा भाषेत लिहा. बघू, काही सुचेल, आपोआप सुचेल!', असे भालजींनी त्यांना सांगितले. ​`स्वराज्याचा शिलेदार' साठी शांताबाईंनी गाणी लिहिली. नंतर त्या गीतलेखन करीत राहिल्या.

`पुनवेचा चंद्रमा आला घरी'', `ही चाल तुरूतुरू, उडती केस भुरूभुरू'' सारखी त्यांची खटकेबाज गीते आजही लोकप्रिय आहेत.

पुढे पं.जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या `वासवदत्ता'' आणि `हे बंध रेशमाचे'' या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली.

​माझिया शब्दांवरी माझा ठसा माझा ठसा

​हे शब्द माझे चेहरे अन् हे शब्द माझा आरसा ..

असं म्हणणाऱ्या या शांताबाईंचा ठसा त्यांच्या सर्वच लेखनप्रकारांवर उमटलेला आहे. ‘बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादावून गेले. शब्दांशी खेळत राहिले. शब्दांच्या वेडाने नादावून जाताजाता अर्थांच्या विशाल परिसरात मी कधी शिरले, ते मला आता आठवतही नाही. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे, मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थांच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शहरांतूनच पण शहरांच्या पलीकडे जावे, असे मला वाटते. शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वांत मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये, असे मला वाटते,' असे त्यांनी लिहिले आहे.

जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता पाहता हाती आलेल्या अनुभवाच्या त्या छोट्याशा तुकड्याचे अनेक कंगोऱ्यातून दर्शन घडविणे हेच सर्जनशील कलावंतासमोरचे मोठे आव्हान असते. ते शांताबाईंनी आपल्या प्रतिभेच्या बळावर पेलले. म्हणूनच शांताबाईंच्या कवितेचे, गीतांचे आणि इतर लेखनाचेही गारूड वाचकांच्या मनावर आजही कायम आहे. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाईंनी भूषविले. सहा जून २००२ रोजी ही अभिनव वाग्विलासिनी कालवश झाली.

मी डोलकर डोलकर...

हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांची सर्वांत गाजलेली आणि लोकप्रिय झालेली गीते म्हणजे कोळीगीते. बंगालमध्ये पालखी वाहून नेणारे भोई पालखी खांद्यावरून नेताना श्रमपरिहारासाठी गाणी गातात. पालखीच्या गतीशी त्या गीतांच्या लयीचा मनोज्ञ मेळ जमतो. आपण याच पद्धतीने कोळीगीते करावीत, ही हृदयनाथ मंगेशकरांची कल्पना होती. शांताबाईंना समुद्रावरचे जीवन, कोळ्यांची भाषा, त्यांचे विषय काहीच माहिती नव्हते. त्यांनी समुद्रच पाहिला होता तो एम.ए.च्या परीक्षेच्या वेळी. लताबाई परदेशात गेल्या होत्या. त्या आल्यानंतर गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते. शांताबाईंकडून गाणी लिहून तयार नाहीत, हे समजल्यानंतर हृदयनाथ काहीसे रागावले आणि शांताबाईंना म्हणाले, `‘तुमच्याकडून हे काम होत नसेल, तर तसे मला सांगा. मी दुसऱ्या कोणाकडून तरी गाणी लिहून घेईन.'

हृदयनाथांचे हे बोलणे ऐकल्यावर शांताबाई अस्वस्थ झाल्या. त्यांनी कोळ्यांविषयी माहिती गोळा करायला सुरवात केली. कोळ्यांची पारंपरिक गीते आणून ती वाचली. त्यातून होडी, समुद्राची भरती-ओहोटी, स्त्रियांचा साजशृंगार, होळीसारखे सण, तरुण स्त्री-पुरुषांच्या प्रेमभावना या गोष्टी समजून घेतल्या. त्यांना `डोलकर'' हा सुंदर आणि समर्पक शब्द र. वा. दिघे यांच्या `गातात न् नाचतात धरतीची लेकरे'' या पुस्तकात मिळाला. त्या शब्दाबरोबर -

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा।

घर पान्यावरी बंदराला करतो ये जा ।।

या ध्रुवपदाच्या ओळी लगेच त्यांच्या मनात जुळून आल्या.

(लेखक मसापचे कार्याध्यक्ष आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com