उपरोधिक शैलीचा मिष्कील कवी

आपल्या उपरोधिक काव्यशैलीने प्रेक्षकांना पोटधरून हसवत अंतर्मुखही करणारे प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आज (२९ डिसेंबर) वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत.
ashok naygavkar
ashok naygavkarsakal

आपल्या उपरोधिक काव्यशैलीने प्रेक्षकांना पोटधरून हसवत अंतर्मुखही करणारे प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आज (२९ डिसेंबर) वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने...

सभागृह रसिक श्रोत्यांनी खचाखच भरलेले असते. अशोक नायगावकरांनी सभागृहात प्रवेश करताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो. व्यासपीठावर कविसंमेलन सुरू झाले, की इतर कवींच्या कविता सादर होत असताना नायगावकरांचा हजरजबाबीपणा प्रत्ययाला येतच असतो. त्याला श्रोत्यांची दिलखुलास दाद मिळत असतेच. ‘आता नायगावकर कविता सादर करतील,’ असं सूत्रसंचालकाने जाहीर केले की, काही तरी वेगळं आणि भन्नाट ऐकायला मिळणार म्हणून श्रोते उत्सुक असतात. झुपकेदार मिशांचे नायगावकर नेहरू शर्टची बाही सावरत त्यांच्या खास शैलीतील ‘मी तुम्हाला सांगतो...’ या पहिल्याच वाक्यात सभागृहातील श्रोत्यांचा ताबा घेतात.

‘तुम्ही सगळे कसे इथे अगदी प्रेमाने जमलेले आहात. आमच्या घरी तुम्हाला सांगतो, माझ्या मुली म्हणतात...

अशोक नायगावकर आवर फादर।

आलिया भोगासी असावे सादर।।''

असे एकेक मजेशीर किस्से सांगत श्रोत्यांना मनमुराद हसवतात. त्यानंतर आपल्या खास शैलीत कविता सादर करतात. सभागृहात चैतन्य ओसंडून वाहत असते. मनापासून दाद देणारे श्रोते आपल्या शेजारी बसलेल्या रसिक मित्राला टाळ्या देत कविसंमेलनाचा आनंद घेत असतात, हा नित्याचाच अनुभव. नायगावकरांच्या कविता वर्षानुवर्षे ऐकणाऱ्यांनाही हाच अनुभव येत असतो. मराठीत काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम करण्याची परंपरा खूप जुनी आहे. रविकिरण मंडळातल्या कवींनंतर काव्यवाचनाच्या जाहीर कार्यक्रमांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या कवींनी. चांद्यापासून बांद्यापर्यंत काव्यवाचनाचे कार्यक्रम करून या थोरांनी कविता अगदी खेड्यापर्यंत पोचवली. ही पिढी थकल्यानंतर काव्यवाचनाची ही पालखी आपल्या खांद्यावर घेतली अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, फ. मुं. शिंदे या कवींनी आणि ती दिमाखात मिरवली. प्रत्येकाच्या कवितेचा बाज निराळा, सादरीकरणाची शैली निराळी आणि विषयही वेगळे. या विविधतेमुळे रसिकश्रोत्यांनाही हे कार्यक्रम आवडले. नायगावकरांसारखा मिष्कील कवी सर्वांना भावला तो त्यांच्या उपरोधिक शैलीमुळे.

उपरोध आणि उपहासाचा वापर

अशोक नायगावकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईचा. तेथे आणि मनमाडमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांचे लहानपण कष्टात गेले. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी कामे त्यांनी अर्थार्जनासाठी केली. पुढे वाईच्या किसनवीर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये एकतीस वर्षे नोकरी केली. लहानपणासून त्यांना वाचनाची आवड होती. उदंड वाचन आणि श्रवण करणाऱ्या नायगावकरांना याच प्रवासात कविता सापडली. आचार्य अत्र्यांसारख्या विनोदी साहित्यकाराचे लेखन वाचताना आणि त्यांची भाषणे ऐकताना गंभीर आशयही हसतखेळत सांगता येतो हा संस्कार नायगावकरांवर झाला. जीवनातील विसंगतीकडे दयाबुद्धीने आणि खेळकर वृत्तीने ते पाहू लागले. विलक्षण संवेदनशीलता, सजगता, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, तरल विनोदबुद्धी लाभलेल्या नायगावकरांनी उपरोध आणि उपहास यांचा सहजतेने वापर करत समाजातल्या विसंगतीवर आणि दंभावर आपल्या कवितेतून बोट ठेवले. सादरीकरणाच्या खास शैलीमुळे नायगावकरांना विलक्षण लोकप्रियता लाभली. ‘वाटेवरच्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९९३मध्ये प्रसिद्ध झाला. ‘कवितांच्या गावा जावे’ या समकालीन मराठी कवींच्या महेश केळुसकर यांनी संपादित केलेल्या संग्रहात नायगावकरांच्या पंधरा कवितांचा समावेश आहे. वरवर पाहता नायगावकरांच्या कविता विनोदी आणि हसवणाऱ्या वाटत असल्या, तरी त्यातील आशय खूप गंभीर असतो. त्यामागे त्यांचे सखोल चिंतन असते. महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, इस्राईल, कतार, डेट्रॉईट, दुबई, न्यू कॅसल, पिटसबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक आदी महाराष्ट्र मंडळातही त्यांच्या काव्यवाचनाचे झालेले कार्यक्रम खूप गाजले.

विपुल गद्य लेखन

नायगावकरांनी विपुल विनोदी गद्यलेखनही केले आहे. ‘अनंत अपराधी’ या नावाने त्यांनी ‘प्रिय तातूंस’ लिहिलेली पत्रेही खूप गाजली. लालित्य आणि विनोदाचे मनोहारी मिश्रण त्यांच्या या गद्यलेखनात आहे. नायगावकरांना त्यांच्या काव्यलेखनासाठी महाराष्ट्र शासनाच्या कविवर्य केशवसुत पुरस्कार, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा काव्य पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा आचार्य अत्रे पुरस्कार, जगद्गुरू तुकाराम, आद्यकवी मुकुंदराज, संत नामदेव पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले नायगावकर सिंगापूर येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातही कविसंमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आणि कोमसापच्या विभागीय संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या नायगावकरांचा विशेष भावणारा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अतिथी निवासात राहणे त्यांना आजही आवडते. मसापच्या कार्यालयात चहा घेत गप्पांचा फड रंगविण्यात त्यांना भारी आनंद मिळतो. ‘या वास्तूत एक वेगळीच ऊर्जा आहे. तिचा प्रत्यय मी नेहमी घेत असतो,’ असे मोकळेपणाने सांगणाऱ्या श्रद्धाळू नायगावकरांच्या मनात साहित्यसंस्था आणि त्यांची समृद्ध परंपरा याविषयी विलक्षण आदराची भावना आहे. ती त्यांच्या कृतीतूनही व्यक्त होत असते. श्रेष्ठ कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी नायगावकरांनी दहा हजार रुपयांचा धनादेश या हाताचे त्या हाताला कळू न देता प्रेमाने महाराष्ट्र साहित्य परिषदेला पाठवला होता. काही दिवसांपूर्वी नायगावकरांनी व्हॉटसॲपवर संदेश पाठविला. ‘मला २९ डिसेंबरला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच मराठी साहित्य परिषद, तेलंगण या संस्थांना देणगी देण्याचे मनात आहे. कसे वाटते? त्यादृष्टीने मार्गदर्शन करावे.’ वाचून मी अवाकच झालो. ही नायगावकरांची विनम्रता. त्यांच्या इच्छेनुसार हा निधी त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात दिला जाणार आहे.

एकदा त्यांचा लंडनहून संदेश आला. ‘मी गेली चार महिने लंडनमध्ये आहे. काल मोठ्या मुलीचा प्राचीचा वाढदिवस होता. आम्ही सर्वजण बेकर स्ट्रीटवर फिनिक्स पॅलेस या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथे योगायोगाने सचिन तेंडुलकर सहकुटुंब जेवायला आला होता. त्याने ओळखही दिली. माझी नात जिजाबरोबर गप्पा मारत फोटोही काढू दिला जेवणावरून उठून! आम्हाला धन्य वाटले.’ किती साधेपणा! आपल्याला झालेला आनंद तत्काळ जवळच्या माणसांना कळवायला नायगावकरांना खूप आवडतो.

अशा या मनस्वी कवीला परमेश्वराने दीर्घायुरारोग्य द्यावे, हीच शुभेच्छा.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com