esakal | 'तंदुरुस्त' लढ्याचा आश्वासक मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

fitness

जेव्हा विषाणू नवा होता, तेव्हा त्याला पसरू देण्यापासून रोखणे हा नक्कीच सर्व शक्तीनिशी करून पाहण्याचा उपाय होता. तो आपापल्या शक्तीप्रमाणे जगातल्या सर्व देशांनी केला.

'तंदुरुस्त' लढ्याचा आश्वासक मार्ग

sakal_logo
By
डॉ. मिलिंद वाटवे

कोविडला आळा घालण्यासाठी व्यूहनीती परिस्थितीचा अभ्यास करून बदलली पाहिजे. नवनव्या वैज्ञानिक संशोधनांच्या प्रकाशात आपल्याला नक्की वाट सापडेल. त्यादृष्टीने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेले संशोधन जो मार्ग दाखवत आहे, तो समजून घेतला पाहिजे. 

अल्पकाळात जगभर पसरलेल्या विषाणूच्या समस्येशी आपण एक युद्ध समजून सामोरे जात आहोत. सुरुवातीपासूनच ही युद्धाची भाषा वापरली जात आहे. साथीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींचा ‘कोविड योद्धे’ म्हणून गौरव करीतच आहोत. तो गौरव योग्यच आहे; पण जर आपण याला युद्ध मानत असू तर त्यात डावपेच महत्त्वाचे असतात आणि परिस्थितीप्रमाणे ते बदलावे लागतात. एखादे वेळेस एका आघाडीवर विजय मिळतो असं वाटत नसेल, तर तिथून माघार घेऊन दुसऱ्या आघाडीवर मुसंडी मारता येते. त्यातून विनाश टाळता येऊ शकतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेव्हा विषाणू नवा होता, तेव्हा त्याला पसरू देण्यापासून रोखणे हा नक्कीच सर्व शक्तीनिशी करून पाहण्याचा उपाय होता. तो आपापल्या शक्तीप्रमाणे जगातल्या सर्व देशांनी केला. काहींना चांगलं यश मिळालं, काहींना नाही. ज्यांना काही काळ चांगलं यश मिळालं त्यांपैकी काहींमधे आता दुसरी लाट येण्याची लक्षणंही दिसताहेत. एकूण जगभरातलं चित्र पाहिलं, तर विषाणूला पसरण्यापासून थांबवणं क्वचित एखाद्या देशालाच जमलं आणि तेही कायमचं अशी खात्री नाही. आता या आघाडीवरचं मर्यादित यश पाहिलं तर आपले डावपेच बदलले पाहिजेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हताश होण्याचे कारण नाही
साथ पसरू लागताच वयोवृद्ध आणि त्याबरोबर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या जुनाट व्याधी असलेल्या व्यक्तींना मृत्यूचा धोका अधिक आहे, हे स्पष्ट होऊ लागले होते. यासारखे रोग तर सहसा बरे होत नाहीत, असं म्हटलं जातं. मग ज्यांना ते आहेतच त्यांना काय करता येणार, अशी हताश भावना सर्वत्र दिसते. अधिक संशोधनानंतर हताश होण्याचं कारण नाही, हेही स्पष्ट होऊ लागले आहे. अलीकडचे अनेक अभ्यास असं दाखवतात की वय, रक्तातली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे किती आहेत यापेक्षा फिटनेस किती आहे ते जास्त महत्त्वाचं. ही गोष्ट मधुमेहाच्या घातक परिणामांनाही लागू आहे आणि कोविडपासून होणाऱ्या मृत्यूच्या धोक्‍यालाही लागू आहे. याविषयी अनेक शोधनिबंध आता प्रसिद्ध होत आहेत. व्यायाम आणि फिटनेस हा कोविडचे मृत्यू टाळण्याचा कदाचित सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. अर्थात हा मार्ग लागण झाल्यानंतर नाही, तर होण्यापूर्वीच अवलंबायचा आहे. फिटनेस चांगला असेल तर लागण होत नाही, असं नाही तर शरीर त्या विषाणूला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतं. गंभीर लक्षणं दिसण्याची संभाव्यता कमी होते. इन्फेकशन होणं टाळता येत नसलं तरी मृत्यू टाळता येतो. ‘युरोपिअन जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजी’ च्या  सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेला इटालियन संशोधकांचा एक शोधनिबंध व्यायामामुळे कोविड घातक होणं कसं टाळलं जातं त्याची कारणमीमांसा सांगतो.

याआधी काही अभ्यासांनी असं दाखवलं होतं, की गंभीर आजार होणाऱ्या आणि कुठलीच लक्षणं न दिसता सुटका होणाऱ्या लोकांमध्ये विषाणूच्या शरीरातील संख्यावाढीमध्ये फार फरक नसतो. मग फरक कशात असतो, तर शरीर विषाणूंना कसा प्रतिसाद देतं, त्यात फरक असतो. मुळात शरीरयंत्रणा क्षीण असतील तर त्या लवकर कोलमडतात. किंवा  काहींचं शरीर इतकी तीव्र प्रतिक्रिया देतं की विषाणूच्या हल्ल्यापेक्षा शरीराच्या दाहप्रक्रियेनीच जास्ती इजा होते. संशोधन असं दाखवतं, की व्यायामामुळे शरीराची जंतूसंसर्ग पेलण्याची क्षमताही वाढते आणि दाहप्रक्रियेवरचं नियंत्रणही. व्यायामाचा फायदा सगळ्यांनाच होतो; लठ्ठ असा व बारीक, मधुमेही असा नसा, रक्तदाब नॉर्मल असो व वाढलेला. म्हणून व्यायामाची व फिटनेसची आघाडी ही विषाणूबरोबरचं युद्ध जिंकण्याची सर्वाधिक भरवशाची आघाडी आहे. ही जर समाजाने चांगली सांभाळली तर विषाणू एकदम नाहीसा होणार नाही; पण मृत्यू मोठ्या प्रमाणावर टाळता येतील. मग इतर सर्दी खोकल्याच्या विषाणूचाच हा आणखी एक प्रकार बनून राहील. पण आपण असे करंटे की व्यायामशाळा बंद ठेवून हे युद्ध जिंकता येईल, अशा भ्रमात आहोत. 

व्यायामाविषयीचे गैरसमज
व्यायामाविषयी गैरसमजही भरपूर आहेत. स्थूलपणा कमी करण्यासाठीच व्यायाम करायचा असतो, अशी अनेकांची भाबडी समजूत असते. त्यामुळे जे लठ्ठ नाहीत त्यांना वाटतं मी कशाला व्यायाम करायला पाहिजे? जे लठ्ठ आहेत त्यांचा अनुभव असतो, की करून पहिला व्यायाम थोडे दिवस, वजन काही म्हणावं तसं कमी झालं नाही. मग काय करायचंय व्यायाम करून? तंदुरुस्ती, फिटनेस या शब्दांचे अर्थ याच्या खूप पलीकडचे आहेत. दमसास, स्नायूंची ताकद, सांध्यांची लवचिकता, चपळपणा, क्षणार्धात निर्णय घेऊन विजेच्या वेगाने हालचालींची क्षमता, तोल सांभाळण्याचं कौशल्य अशी अनेकविध अंगे तंदुरुस्तीचा भाग असतात. वयाबरोबर थोडा फरक पडणं नैसर्गिक आहे; पण आपण न वापरल्यामुळेच शारीरिक क्षमता जास्ती करून घालवून बसतो. या क्षमतांबरोबरच जीवाणू-विषाणूना तोंड देण्याची क्षमताही हळूहळू क्षीण होत असते. एरवी बैठी जीवनशैली असेल तर व्यायाम ही जीवनावश्‍यक गोष्टच समजली जायला हवी. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊननंतर जेव्हा जीवनावश्‍यक व्यवहार सुरू झाले, तेव्हाच सर्व प्रकारचे व्यायाम करण्याच्या सुविधाही जीवनावश्‍यक म्हणून सुरू व्हायला हव्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्यातील व्यायामाचे महत्त्व
याला दुसरीही बाजू आहे. आपल्या बहुतेक जिम अशा ठिकाणी आणि अशाप्रकारे बांधल्या गेल्या आहेत की तिथे हवा पुरेशी खेळत नाही. बऱ्याचदा जिमला तळघरात जागा दिलेली असते. किंवा उच्चभ्रु लोकांच्या जिम ए. सी. असायला हव्यात म्हणून नैसर्गिक खेळत्या हवेला मज्जाव केलेला असतो. कोंदट ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्‍यता असते ही गोष्ट खरी. पण असं असण्याचं मूळ कारण आपण फिटनेसला अजून पुरेसं महत्त्व दिलेलं नाही हे आहे. बऱ्याच ठिकाणी इतर कारणांसाठी वापरता येणार नाही अशी जागा जिमला दिलेली दिसते. आतातरी जागे होऊन आपण व्यायामाचं आरोग्यातलं प्राधान्य ओळखलं आणि सगळ्यांना परवडतील अशा व्यायाम सुविधा सर्वत्र उपलब्ध करून दिल्या तर आतापर्यंत या साथीत गमावलेल्या जीवांची किंमत सार्थकी लागली असं तरी म्हणता येईल. ज्यांनी योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायाम ठेवून मधुमेह, रक्तदाबासारख्या आरोग्य समस्यांना दूर ठेवलं त्यांना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूलाही बऱ्याच अंशी टाळता आलं. ज्यांनी चुकीच्या जीवनशैलीनी आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्षमता घालवल्या तेच जास्ती करून विषाणूला बळी पडले. अशा मृत्यूंची जबाबदारी त्या विषाणूची समजायची की आपलीच?

loading image