तंत्रकुशल रणरागिणी

संजय जाधव
Monday, 19 August 2019

मोहिमेसाठी पाठबळ देणारे, तांत्रिक माहिती पुरविणारे आणि रणमैदानाबाहेरची आघाडी समर्थपणे आणि बिनचूकपणे सांभाळणाऱ्यांची नावे समाजासमोर तेवढ्या प्रकर्षाने येत नाहीत. हे चित्र हळूहळू बदलू लागल्याची सुखद जाणीव स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांच्या गौरवामुळे झाली आहे.

युद्धाच्या आघाडीवर थेट शत्रूवर हल्ला करणाऱ्या वीरांची नावे इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात. ते स्वाभाविकही आहे. त्यांच्या वीरश्रीची गाथा इतरांनाही प्रेरणा देते, त्यामुळेच `युद्धस्य कथा रम्या' असे म्हटले जाते. मात्र, या वीरांना मोहिमेसाठी पाठबळ देणारे, तांत्रिक माहिती पुरविणारे आणि रणमैदानाबाहेरची आघाडी समर्थपणे आणि बिनचूकपणे सांभाळणाऱ्यांची नावे समाजासमोर तेवढ्या प्रकर्षाने येत नाहीत. हे चित्र हळूहळू बदलू लागल्याची सुखद जाणीव स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांच्या गौरवामुळे झाली आहे.

युद्धात तंत्रज्ञानाचे महत्त्व विलक्षण वाढत असून त्यादृष्टीनेही ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव संपूर्ण देशाला परिचित आहे. याचवेळी बालाकोटमधील हवाई हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हालचाली या प्रसंगाच्या दरम्यान, महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांचे नाव मागील आठवड्यापर्यंत कोणाला माहीत नव्हते. दोन्ही मोहिमांच्यावेळी संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून हवाई दलाच्या विमानांना मिंटी मार्गदर्शन करीत होत्या. अभिनंदन यांनाही हल्ल्यावेळी शत्रूच्या विमानांच्या हालचालींसह इतर महत्त्वाची माहिती मिंटी यांच्याकडून मिळाली होती. अशा या वीरांगनेला युद्ध सेवा पदक जाहीर झाले. यानंतर मिंटी यांचे नाव प्रकाशझोतात आले. हवाई दलाच्या मिराज- 2000 विमानांनी 26 फेब्रुवारीला बालाकोट येथे "जैशे महंमद'च्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या हवाई दलानेही याला 24 तासांत प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका मिंटी यांनी बजावली. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी घेतलेल्या जलद आणि योग्य निर्णयांमुळे हे शक्‍य झाले.

मिंटी यांच्यासह सात जणांचे "फायटर कंट्रोलर'चे पथक 27 फेब्रुवारीला कार्यरत होते. पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांचे हल्ले परतवून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. त्याचवेळी भारतीय हवाई दलाची कोणतीही हानी होणार नाही, याची खबरदारीही घेतली. त्या वेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनाही परतण्याच्या सूचना मिंटी यांनी केल्या होत्या. मात्र, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी संपर्क यंत्रणा जॅम केल्याने अभिनंदन यांना या सूचना स्पष्ट ऐकू आल्या नाहीत. यामुळे त्यांचे विमान पाकिस्तान पाडू शकले. मिंटी यांचा युद्ध सेवा पदकाने सन्मान करण्यात आला असून, हे पदक मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. प्रत्यक्ष युद्धभूमीवर थेट न लढता शत्रूच्या पाडावात आणि देशाच्या संरक्षणासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीरांचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minty Agarwal becomes first woman awardee of Yudh Seva Medal