भाष्य : विज्ञान ज्ञान देई... देई न प्रेम, शांती

माधव गाडगीळ
मंगळवार, 16 जुलै 2019

आज एकेकटा मनुष्यप्राणी हातात मोबाईल घेऊन गेल्या चाळीस-पन्नास हजार वर्षांच्या छोट्या-मोठ्या कंपूंत गप्पा मारण्याच्या, मिळून मिसळून गाण्याच्या, नाचण्याच्या परंपरांना फाटा देऊन या सगळ्यांची एका सायबरमंचावर प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गावर आहे.

आज एकेकटा मनुष्यप्राणी हातात मोबाईल घेऊन गेल्या चाळीस-पन्नास हजार वर्षांच्या छोट्या-मोठ्या कंपूंत गप्पा मारण्याच्या, मिळून मिसळून गाण्याच्या, नाचण्याच्या परंपरांना फाटा देऊन या सगळ्यांची एका सायबरमंचावर प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गावर आहे.

वै शाख वणव्यात गडचिरोली जिल्हा होरपळत होता. आम्ही पोटेगावाला तिथल्या शाळेच्या आवारात सामूहिक वनसंपत्तीचे नेटके व्यवस्थापन करणाऱ्या तरुणांचे अनुभव समजावून घेण्यासाठी जमलो होतो. चौफेर अरण्याने वेढलेल्या शाळेसमोरच्या थांब्यावर दोन वेगवेगळ्या लग्नांच्या वऱ्हाडातले पंचवीस-तीस आणि इकडचे-तिकडचे पाच-सहा जण बसची वाट पाहत होते. त्यांनी ठरवले, ताटकळत उभे कशाला राहायचे? सगळे बाल-वृद्ध स्त्री-पुरुष एका रिंगणात गोळा झाले आणि एकमेकांच्या कमरेभोवती हात घालून गाणी गात गोंडांचा रेला नाच नाचायला लागले.

सर्व मानवी समाजांत लोक हजारो वर्षे एकमेकांशी गप्पा मारतात, गातात, नाचतात. आपली भाषा ५०-५५ हजार वर्षे पुरातन आहे. भाषेबरोबरच उद्‌भवली सौंदर्याची अनुभूती आणि रंगबिरंगी शंख-शिंपल्यांच्या माळा. चाळीस हजार वर्षांपूर्वीची हाडाची बासरी सापडली आहे. पस्तीस हजार वर्षांपूर्वीपासून शिळांवरची पशूंची, शिकारीची चित्रे सापडू लागतात. या वेगवेगळ्या आविष्कारांतून लोक एकमेकांशी स्नेहबंध घट्ट करत होते, एकमेकांपासून शिकून घेत होते. या शिक्षणात हत्तीसारख्या महाकाय पशूंच्या शिकारीची तंत्रे, डावपेच हा महत्त्वाचा भाग होता. रात्रीच्या बिनभिंतीच्या शाळांमध्ये याबद्दलचे अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे हसत-खेळत, गात-नाचत शिकले-शिकवले जात होते.

एकदा गडचिरोलीतल्या मेंढा गावात मी याची चुणूक पाहिली. रात्री दहाच्या सुमाराला सगळे गावकरी चिंचेच्या राईतल्या मैदानात जमले. तासभर सगळे मिळून रेला नाचले. मग सुरू केले गव्याच्या शिकारीचे नृत्य-नाट्य. पंधरा-विसातल्या दोघा नटांनी शिंगवाले-शेपूटवाले कापड पांघरून गव्याचे सोंग केले. तिघांजवळ धनुष्य-बाण होते, बाकीचे हाकेकरी. आधी कल्पसृष्टीतला गव्यांचा कळप हेरत, त्याला फोडायचा प्रयत्न करत राहिले. मग हशा-टाळ्यांच्या गजरात चार-पायी, दोन माणसांच्या अद्वातद्वा धावणाऱ्या गव्याचा प्रवेश झाला. त्याच्यावर बोथट बाणांचा मारा सुरू झाला. अखेर एक जिव्हारी लागून तो कोसळला. सबंध वेळ संवाद चालले होते; हशा पिकत होता. प्रेक्षक संवादात भाग घेत होते; नटांनी काय करावे सुचवत होते. या ना त्या प्रकारे नाटकात सहभागी होते.

नाटकाबरोबरची गाणी जरा बेसूरच होती. मग सुरेल गायन आले कुठून? मी हे केरळातल्या मुळ्ळपेरियारच्या पठारावर समजावून घेतले. निलगिरीवरची कुंती नदी जैववैविध्यसंपन्न सायलेंट व्हॅलीच्या पठारावर रुंदावते. १९८०च्या सुमारास इथे धरण बांधण्याबद्दल मोठा वाद झाला. त्याची शहानिशा करणाऱ्या समितीवर मी होतो. प्रकल्पाच्या पुरस्कर्त्यांचे प्रतिपादन होते की, सायलेंट व्हॅली काहीच खास नाही, शबरीमलयाच्या उतारावरचे विस्तृत मुळ्ळपेरियार पठार त्याहून सरस आहे. विचारले, ‘या बाबतीत काय ठोस माहिती आहे?’ सायलेंट व्हॅलीबद्दल थोडीशी, मुळ्ळपेरियारबद्दल शून्य पूज्य. मुळ्ळपेरियार पार करायचे तर त्या वाघ, हत्ती, गवे, अस्वलांच्या रानात दोन रात्री मुक्काम करावा लागेल. विचार केला, झकास, याला तर खास मजा येईल. ठरले, की मी प्रत्यक्ष हिंडून माहिती गोळा करावी. लगतच्या गावांतल्या वाटाड्यांबरोबर सकाळी निघालो. चालता चालता दिसले की या रानात भरपूर वणवे लागतात, त्यातून रान विरळ झाले आहे. आमचे वाटाडे म्हणाले, ‘‘हा आहे आमचाच प्रताप. आमचे या रानाशी घनिष्ठ संबंध आहेत, रानभर पन्नास-साठ हेक्‍टरच्या एकूण एक टापू-टापूंना अस्वलाचा ओढा, बेहड्याची टेकडी अशी काहीतरी नावे ठेवलेली आहेत. आम्ही रानमेवा गोळा करायला या रानातून फिरतो. रानात शिरलो की कुठे आहोत ते सांगणाऱ्या ललकाऱ्या देत एकमेकांच्या संपर्कात राहतो. रात्री शेकोट्या पेटवतो, ती आग अधूनमधून पसरते.’’

आम्ही पण रात्री शेकोटी पेटवायचो, वाटाडे आळीपाळीने जागे राहून त्यात वाळके लाकूड, वेळूचे तुकडे फेकत राहायचे. खुशीत येऊन एखादे गाणे गायला लागायचे, जोडीला एका लयीत वेळूच्या तापलेल्या पोकळ कांड्या फुटण्याचे फटाके वाजवत राहायचे. त्या आवाजाने अस्वले, हत्ती लांब राहायचे. मधूनच परिसरात दुसरे कोणी असले तर त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एखादी जोरकस ललकारी द्यायचे. अशा ललकारीची जी खासी ध्वनिरचना आहे, ती आहे मानवाच्या संगीताचा स्रोत. आपल्या साध्या बोलण्यात नानाविध स्वरांचे अद्वातद्वा मिश्रण असते. त्याला काही लय नसते. काही स्वर आपल्याला अगदी नीट ऐकू येतात, काहींना आपले कान तितकेसे संवेदनशील नसतात. असा कोलाहल काही दूरवर नेटके संदेश पोचवू शकत नाही. त्यासाठी मोठा आवाज पाहिजेच; पण आपल्याला भावतात असे स्वर अधिक प्रमाणात वापरायला पाहिजेत. प्रत्येक स्वर स्पष्ट वेगळा ऐकू आला पाहिजे, अनेक स्वर लांबवले पहिजेत, ताना घेतल्या पाहिजेत. एकदाच उच्चारून काही शब्द सहज समजणार नाहीत, म्हणून तो संदेश पुन्हा पुन्हा आळवला पाहिजे. या आळवण्याला लय पाहिजे, त्यात एक ठेका पाहिजे. अशा नादमधुर ललकाऱ्यांतून आपण गायला शिकलो, याच पायावर संगीत उभे राहिले.

आरंभी गाणे, नाचणे मुख्यतः रात्रीचे, सामूहिक उपक्रम होते. समाजात श्रीमंत वर्ग निर्माण झाल्यावर शास्त्रोक्त संगीत, नृत्याला जीवन वाहून घेतलेले कलाकार अस्तित्वात आले; पण अनेक शतके त्यांच्या कलेचा आस्वाद मर्यादित लोकांनाच घेता येत होता. आकाशवाणीचे युग सुरू झाल्यावर हे कलाविष्कार सर्वसामान्यांपर्यंत पोचणे शक्‍य झाले. आता स्मार्टफोनच्या जमान्यात पुरा कायापालट झाला आहे. पुण्यातल्या वेताळ टेकडीवरच्या खडकावर जिथे सुलोचना आणि मी विद्यार्थी असताना खुशीत गप्पा मारत बसायचो, त्याच खडकावर नव्या युगातले युवक-युवती शेजारी शेजारी बसलेले असतात. पण दोघेही आपापल्या स्मार्टफोनकडे टक लावून काहीतरी पाहत चुपचाप असतात. आजमितीस आदिवासी मुलखाबाहेर कुठेही बससाठी जमलेले तीस-पस्तीस जण सहज रिंगण करून गायला-नाचायला लागणार नाहीत. सगळे आपापल्या मोबाईलवर बोलण्यात, नाही तर त्यावर टक लावून काही तरी पाहण्यात गर्क असतील. एका टोळक्‍यात जमून गप्पा, सगळ्यांनी मिळून गाणं, सामुदायिक नाच अजूनही चालू आहेत; पण दिवसेंदिवस हे सगळं ओहोटीला लागलं आहे. दुसऱ्या बाजूने आयुष्य समृद्ध होत चाललेलं आहे. कुणालाही अगदी विनासायास, एका जागी गप्प बसून एक टिचकी मारून आपल्याला हव्या त्या चित्रपटातील हवे ते संवाद ऐकता येतात, भीमसेन जोशींच्या भक्तिगीतांपासून ते ‘सैराट’मधल्या ‘झिंग झिंग झिंगाट’पर्यंतची नाच-गाणी ऐकता, पाहता येतात. याबरोबरच कोणीही हौशी गायक ‘यू-ट्यूब’सारख्या विश्वव्यापी मंचावर आपलं गाणं फुकट, पटकन चढवू शकतो, प्रतिसाद मिळाला तर पैसेही कमावू शकतो. सगळे काही प्रत्यक्ष जमिनीवर नाही, तर सायबरमंचावर चालले आहे. म्हणतात उद्या माणसाच्या मेंदूतही संगणकाच्या चिप्स बसवल्या जातील, आपणही सायबरमंचावरचे नट, कदाचित बाहुल्या बनू. तंत्रज्ञानाच्या किमयेतून काय काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पण एक नक्की, विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे,
‘विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया,
देई न प्रेम शांती, त्याला इलाज नाही!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile article write madhav gadgil in editorial