संडे स्पेशल लेख : तंत्र'ज्ञान' विश्वाच्या गवसणीचे

जयपाल गायकवाड 
रविवार, 19 मे 2019

मोबाईलने दुनिया मुठीत आली असली, तरी चांगल्याबरोबर वाईटही गवसते. त्यासाठी निरक्षीर विवेक बुद्धी वापरून घेण्याची वृत्ती जोपासली, तर मुलांचे जगणे अधिक समृद्ध होते, हे खरे. 

आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय नाचतो तो त्या गाण्यावर,'' असे कौतुकाने सांगताना दिसतात.

मोबाईलबाबत पाल्याचे असे तोंडभरून कौतुक अनेक पालक अगदी उत्साहात करतात. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल किंवा कॉंप्युटर वा लॅपटॉप अगदी लहान वयातसुद्धा सफाईदारपणे वापरू शकतात, याचा आजकालच्या पालकांना नको इतका अभिमान वाटतो. येणाऱ्या -जाणाऱ्या प्रत्येकासमोर त्याचे गुणगान करतात. 

अगदी पाळण्यात असल्यापासून मुलांच्या हातात खेळण्यासारखा मोबाईल दिला जातोय. आई आपल्या मुलाला शांत बसण्यासाठी हातात मोबाईल देते. मुलं मोबाईलमध्ये गेम्स किंवा यू-ट्यूबवर गाणी पाहत बसतात. मात्र, सुरुवातीला मोबाइलवरच्या गेम्सना टाळ्या वाजवणारी ही लहानगी कधी मोबाईलवेडी होतात, हे कळतदेखील नाही.

मोबाईलच्या सततच्या वापराने केवळ डोळ्यांवर परिणाम होतो, असा अनेक पालकांचा गैरसमज असतो. पण, डोळ्यांबरोबरच शरीराच्या इतर अवयवांवरदेखील मोबाईलचा अतिवापर वाईट परिणाम करतो. हे परिणाम शारीरिक तसंच मानसिकही असू शकतात. 

स्पॅनिश शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे, की मोबाईलच्या अतिवापरामुळे, अतिरिक्त हाताळणीमुळे मुलांमध्ये चिडचिडपणा, मूड बदलणे वाढते. ते नैराश्‍याकडे वाटचाल करतात. त्यांची वागणूक आणि शिकण्याची क्षमता मंदावते. त्यामुळे खोडकर, हट्टी मुलांना मोबाईल देताना पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ते करतात. 

प्रत्येक वेळी पालक मुलांना सांगतात, हे करू नको. ते करू नको. त्यामागचं कारण बहुतेक जण सांगत नाहीत. मग बालसुलभ वृत्तीने ज्यावेळी मोठी माणसं लक्ष द्यायला नसतात तेव्हा मुलं नको ते उद्योग करायचा प्रयत्न करतात. कारण एकच. मोठी माणसं सारखी नाही म्हणतात मग जे करू नको सांगतात, ते करून पाहण्याची उत्सुकता. 

मुलं मोबाईलवर नेमके काय करतात?

आजची लहान मुलं हातात मोबाईल घेतला, की सुरुवातीला यूट्यूबवर कार्टून किंवा आवडती गाणं पाहत बसतात. त्यासोबत अँड्रॉइड मोबाईलवर अनेक गेम्स उपलब्ध असतात, त्यामध्ये टेम्पल्स रन, फॉरेस्ट ऍनिमल, डोरोमोन, डॉक्‍टर किड्‌स, व्हिलेज अँड फार्म, स्टार वॉर्स यांच्यासारख्या अनेक गेम्समध्ये ही मुले गुंतून जातात. त्यात ती रमतात. पूर्वी शाळेतून घरी आल्यावर खेळण्यासाठी जाणारी मुलं आता घरात आले रे आले की तहानभूक हरपून मोबाईलकडे पळताना दिसत आहेत. 

मुलांसाठी मोबाईलमध्ये काय असावे?

सध्याची परिस्थिती पाहता मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे पालकांना कठीण असले, तरी त्यावर मार्ग काढणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मुलांना मोबाईलमध्ये गेम्स आणि गाणी, संगीत यांच्याव्यतिरिक्त काय आवश्‍यक आहे, हे जाणून घ्यावे. कोणतेही तंत्रज्ञान जसे वापरू त्यावर त्याची उपयुक्तता अथवा विध्वंसकता अवलंबून असते. सिनेमा, चांगले संस्कार करणारे, माहिती देणारे पाहिले तर पिढी चांगली घडते; मारामारी, खून, बलात्कार असले प्रसंग पाहिले, तर नकळत त्याचे विपरीत परिणाम होतात. त्याप्रमाणे मोबाईलचा विधायक वापर मुलं कसा करतील, हे पाहावे. त्यासाठी खरेतर खूप चांगल्या प्रकारची ऍप्स, यूट्यूबवर कार्यक्रम, फिल्म्स उपलब्ध आहेत. ती मुलांना संस्कार देण्यापासून ते विज्ञान, गणित, भाषा, विविध प्रकारची शास्त्रे, विद्याशाखा यांबाबत माहिती देणारी, त्यांना शहाणी करणारी, त्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना शाळेबाहेरचे विविध प्रकारचे शिक्षण देण्याचे कार्य करू शकतात.

म्हणून मुलांना काय द्यायचे जसे आपल्या हातात आहे, तसेच त्यांनी काय करावे, यावर देखरेख ठेवली, त्यांना तसे चांगले वळण लावले, तर ती अधिक प्रगल्भ, अभ्यासू, संस्कारी, पारंगत होऊ शकतात, हे निश्‍चित. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile is Not Game Its Modem of Development article by Jaypal Gaikwad