दमदार कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

विशिष्ट कालावधीत आपल्याकडे येणारा मोसमी पाऊस ही खरे म्हणजे निसर्गाची केवढी मोठी देणगी! पण इतका नित्यनेमाने येत असला तरी प्रत्येक मॉन्सूनचा स्वभाव वेगळा. तो कधी आनंदाने चिंब करतो, मनालाही न्हाऊ घालतो; तर कधी चक्क डोळ्यांत पाणीही आणतो.

विशिष्ट कालावधीत आपल्याकडे येणारा मोसमी पाऊस ही खरे म्हणजे निसर्गाची केवढी मोठी देणगी! पण इतका नित्यनेमाने येत असला तरी प्रत्येक मॉन्सूनचा स्वभाव वेगळा. तो कधी आनंदाने चिंब करतो, मनालाही न्हाऊ घालतो; तर कधी चक्क डोळ्यांत पाणीही आणतो. कधी चातकासारखी वाट पाहायला भाग पाडतो, तर कधी ‘नको घालू धिंगाणा अवेळी’ अशी आर्त साद घालायला लावतो. काही भागांत तो ओसंडून वाहातो, तर काही भागांत हात आखडता घेतो. पावसाच्या या सगळ्या लीला यंदाही अनुभवायला मिळाल्या असल्या, तरी एकुणात पावसाने यंदा दमदार कामगिरी केली आहे. पाऊस सरींनी सरासरी ओलांडल्याचे शिक्कामोर्तब भारतीय हवामान खात्याने केले असून, बहुतेक धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला, ही सर्वांनाच दिलासा देणारी बाब आहे. विशेषतः उजनी आणि जायकवाडी धरणातील तुडुंब पाणीसाठ्याने सर्वसामान्यांना; विशेषतः बळिराजाला मोठाच दिलासा मिळाला आहे.

मोसमाच्या सुरवातीला काहीशा रुसलेल्या आणि आक्रसलेल्या पावसाने ‘स्लॉग ओव्हर्स’मध्ये मात्र धुवाधार फलंदाजी केली. महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात झाला. गेल्या वर्षी पुण्यात मॉन्सून सरासरीही गाठू शकला नव्हता. राज्यातील ३६पैकी ३१ जिल्ह्यांत पाऊस सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा जास्त झाला. तथापि, मराठवाड्यात सरासरीपेक्षा पाऊस बारा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे, ही चिंतेची बाब. त्यामुळे पिण्याच्या प्रश्‍नाबरोबरच शेतीचे काय असा प्रश्‍न उभा राहिला आहे. तिकडची म्हणजे ‘तृष्णा’काठची वेदना पाऊस पूर्णपणे दूर करू शकला नाही, तर दुसऱ्या बाजूला सांगली, कोल्हापूर भागांत त्याने भयानक पूरस्थिती निर्माण केली. अर्थात, पावसापेक्षा पुराला मानवनिर्मित व्यवहारच जास्त जबाबदार आहे, याकडे अनेक पर्यावरण व नगरनियोजन तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. प्रामुख्याने बेकायदा बांधकामे आणि नदीनाल्यांवरील आक्रमणे या समस्यांचे गांभीर्य त्यांनी लक्षात आणून दिले आहे. या आघाडीवर काही सुधारणा होणार काय, हा प्रश्‍न कळीचा आहे. तसे झाल्यास सरासरी ओलांडणाऱ्या पाऊसमानाचा आनंदही वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon rain