कोरड्यापेक्षा ओला बरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wet drought is better than dry drought

कोरड्यापेक्षा ओला बरा!

- महेंद्र सुके

राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. मॉन्सूनबद्दल नेहमीच नाराजी व्यक्त करणाऱ्या मानवी प्रवृत्तीला या वर्षीच्या पावसाने मात्र फार तक्रार करण्याची संधी दिली नाही. हवामान खात्याचे काही अंदाज चुकवत जरा उशिराच दाखल झालेल्या पावसाने जून-जुलै महिन्यात शेतशिवार हिरवेगार केले. नदीनाल्यांना पूर आले. धरणे ओव्हरफ्लो झाली. पेरणी झाल्यानंतर लागणाऱ्या पिकांना गरज असलेल्या पावसानेही आता हजेरी लावली आहे. हा पाऊस पिकांसाठी बूस्टर डोस ठरेल.

गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे या वर्षीही काही ठिकाणी अतिवृष्टीच्या फटक्याने मोठे नुकसान झाले हे वास्तव आहे; मात्र पावसाच्या त्या जोरधारा पेलण्यासाठी आपली यंत्रणा नेहमीप्रमाणेच नापास ठरली. दोष पावसाला देऊन यंत्रणेने आपण निर्दोष असल्याचे सांगणे भविष्यात धोकादायक ठरणार आहे. अतिवृष्टीचे पाणी शेतशिवारांत, घरादारांत आणि शहरांतील रस्त्यांवर का आले, या मूळ प्रश्‍नाचे उत्तर शोधताना आपलेच दोष अधोरेखित होतात. शहरे फुगत चालली आहेत. महानगराशेजारची गावखेडी शहरांना जोडली गेली आहेत. त्या गावागावांतले नदीनाले नामशेष होत आहेत. पूर नियंत्रण रेषा ओलांडून नदीच्या किनाऱ्यांवर टोलेजंग इमारती आपणच उभ्या केल्या आहेत. कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याची वाट अडवली आहे. नदीनाल्यांवर केलेल्या या अतिक्रमणाला मान्यता देऊन आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत, याची जाणीव होणे गरजेचे आहे.

पाऊस आपल्या गरजेनुसार मोजूनमापून पडला पाहिजे, या अपेक्षेची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे पावसाला दगाबाज, अतिरेकी, अकाली, अपेक्षाभंग करणारा वगैरे विशेषणे लावून हिणवतो आणि आपण निसर्गाविरुद्ध केलेल्या चुकांवर पांघरुण टाकत असतो. पाऊस शंभर टक्के पडला तरी ते पावसाचे पाणी साठवून ठेवण्याचे धरणांशिवाय दुसरे साधन आपल्याकडे नाही. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी छोट्या छोट्या तलावांचा आग्रह धरून पाऊस साठवण्याचा मार्ग वारंवार सुचवला आहे. गावोगावी असे छोटे छोटे तलाव होते तेव्हा ती गावे जलसमृद्ध होती. राजस्थानमधील उदयपूर, महाराष्ट्रातील ठाण्याला तलावाचे शहर म्हणून ओळख होती.

विदर्भातील भंडारा-गोंदिया तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध होते. आता ठाणे शहरातील किती तलाव आपण जगवले आणि किती नामशेष केले, याचीही बेरीज-वजाबाकी करून आपण काय गमावले आहे याचा हिशोब मांडला पाहिजे. त्या तलावांची गरज ओळखली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात; मात्र तेवढीच नवीन झाडे लावून जगवली जात नाहीत. अशीच चूक जलस्रोताविषयीही आपण करत असतो.

मुंबई शहराच्या समुद्राशेजारी असणारी खाडी बुजवून नव्या वसाहती आकाराला येत आहेत. त्यातील वनस्पती नष्ट होत आहेत. पाणी अडवणाऱ्या या वनस्पती नामशेष करून पावसाचे पाणी शहरात घुसत असल्याचा कांगावा करत सुटलो आहोत. पर्यावरणाच्या नैसर्गिक रचनेवर असे आघात करणे आपल्याला परवडणारे नाही, हे जगभरात सुरू असणाऱ्या हवामान बदलाच्या वाऱ्यांनी सांगून टाकले आहे. ते वारे आपल्याकडेही येणार आहेत, आलेही आहेत; पण आपण किती काळ असेच झोपेचे सोंग घेऊन त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत, हा खरा सवाल आहे.

जलाशये भरण्यासाठी आपल्याला अतिवृष्टी वाटणाऱ्या पावसाचीच गरज असते. रिमझिम पावसाने धरणांची तहान भागत नसते. त्यामुळे येणाऱ्या पावसाने निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीशी लढणे आपल्याला जमले पाहिजे. त्यासाठीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कोरड्या दुष्काळाने घशाला कोरड पडण्यापेक्षा या धुवाधार पावसाचे मोकळेपणाने स्वागत करू या.

Web Title: Monsoon Update Wet Drought Is Better Than Dry Drought

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..