चळवळी देऊ शकतील काँग्रेसला संजीवनी

डॉ. जे. एफ. पाटील
शनिवार, 1 एप्रिल 2017

निरोगी, सशक्त लोकशाहीसाठी सामर्थ्यशाली सत्ताधारी पक्षाला लोकमताच्या दबावाखाली ठेवू शकणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असते. ती भूमिका पार पाडण्याकरिता प्रभावी विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला आत्मचिंतन करून पक्षाची व्यापक, सखोल, वैचारिक व मानसिक फेररचना करण्याची गरज आहे. काँग्रेसमुक्त भारताचे (दिवा)स्वप्न पाहणे हे राजकीय बेजबाबदारीचे स्वप्नरंजन, तर इतिहासक्रमाचे अज्ञान व्यक्त करणारे आहे.

निरोगी, सशक्त लोकशाहीसाठी सामर्थ्यशाली सत्ताधारी पक्षाला लोकमताच्या दबावाखाली ठेवू शकणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असते. ती भूमिका पार पाडण्याकरिता प्रभावी विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला आत्मचिंतन करून पक्षाची व्यापक, सखोल, वैचारिक व मानसिक फेररचना करण्याची गरज आहे. काँग्रेसमुक्त भारताचे (दिवा)स्वप्न पाहणे हे राजकीय बेजबाबदारीचे स्वप्नरंजन, तर इतिहासक्रमाचे अज्ञान व्यक्त करणारे आहे.

‘काँग्रेस’ या शब्दाचा नेमका अर्थ लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ॲलन, ह्यूम, ॲनी बेझंट, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, न्या. रानडे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,व्योमेशचंद्र बॅनर्जी इत्यादी अनेक नेत्यांच्या विचारांच्या प्रचंड घुसळणीतून निर्माण झालेली लोकसंग्रहाची व लोकसंघर्षाची व्यवस्था म्हणजे काँग्रेस. काँग्रेसच्या या उत्क्रांतीमध्येच ‘स्वतंत्र भारता’ची संकल्पना स्फटिकीकृत झाली. तिचे वैधानिक प्रारूप म्हणूनच जिची तुलना नाही, अशी भारतीय घटना लिखित स्वरूपात जन्माला आली आहे. प्रादेशिक, वांशिक, धार्मिक, जातीय, भाषिक तथा वर्णीय अल्पसंख्याकांचे राजकीय / सामाजिक हक्क, स्वातंत्र्य सुरक्षित व संवर्धित करण्याचे उत्तरदायित्व सत्ताधारी पक्षाने घेणे संविधानात्मक बंधनकारक असणारी व्यवस्था म्हणजे ‘उदारमतवादी लोकशाही’. फक्त मतदानावर आधारित लोकशाही म्हणजे आत्म्याशिवाय शरीर अशी अवस्था होते.

सध्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे सत्ताधारी पक्षाचे राजकीय उद्दिष्ट व मानसिक लक्षण झाले आहे. निरोगी लोकशाहीमध्ये समर्थ विरोधी पक्षाचे स्वागत करणारा सत्ताधारी पक्ष लोककल्याणाच्या वृद्धीसाठी अधिक सुसंगत व सुसंस्कृत ठरावा. ज्या पक्षाने स्वातंत्र्यचळवळ चालवली व देशाचे स्वातंत्र्य मिळविले, तो काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वदूर एकसंध, बंधुभावाचा होणे ही प्राथमिक गरज आहे. तसे झाले तर भारताची लोकशाही निरोगी व सक्षम राहील. या बदलत्या परिस्थितीत काँग्रेसचे पुनरुत्थान होण्यासाठी अनेक गोष्टी घडण्याची गरज आहे. या सर्वच गोष्टी एकाच वेळी सुसंगत पद्धतीने होणे सद्‌भाग्याचा योग ठरावा.

सामान्यतः सध्या सर्वत्र मांडली जाणारी पहिली गोष्ट आहे ती नेतृत्वबदलाची. अर्थात, हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे; पण या मुद्द्याचे महत्त्व दुर्लक्षित करता येणार नाही. सध्याच्या तथाकथित नेतृत्वाने स्वतःमध्ये क्रांतिकारक बदल करण्याची गरज आहे, असाही त्याचा अर्थ होतो. तसा बदल पूर्वी एका नेत्याने केला होता. काही वेळेला असेही मांडले जाते, की प्रादेशिक नेत्यांचे सक्षमीकरण करणे आवश्‍यक आहे. ‘हायकमांड’ने देशभर नेतृत्व लादण्याचे दिवसही संपले आहेत, असे वाटते. सक्षम, समर्थ असे प्रादेशिक नेते पक्षात असणे ही यशाची आवश्‍यक अट आहे; पण तेवढ्याने भागत नाही. सत्तेवर येण्यासाठी महत्त्वाकांक्षी राजकीय पक्षाला लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक व्हावे लागते. 

भारतीय राज्यघटना समाजात उदारमतवादी लोकशाहीचे प्रारूप राबवू इच्छिते. त्यामार्गे ‘भारताची संकल्पना’ वास्तवात आणताना बहुसंस्कृती परंपरेचे रूपांतर आधुनिक राष्ट्र- राज्य या संस्थेत करण्याची भूमिका होती; परंतु समाजरचनेच्या पारंपरिक विषमताधारित घडवंची नष्ट करण्यात आपण फारसे यश प्राप्त करू शकलेलो नाही. आजही आमच्या लोकशाहीला उदारमतवादी लोकशाहीचा आशय अपेक्षित प्रमाणात प्राप्त झाला नाही. तसे होण्याची शक्‍यता सध्या अधिक धूसर झाली आहे.

जे राजकीय पक्ष घटनेच्या मूळ सिद्धांत व तत्त्वांशी एकनिष्ठ राहून पुढे जाऊ इच्छितात, त्यांनी साहजिकच घटनेची मानांकने पाळण्याची गरज आहे. अशी बांधिलकी नसल्यास सत्ताधारी पक्ष वेगळ्या धोरण- कार्यक्रमाची आखणी करेल, अशी शक्‍यता वाटते. तसे घडण्यातून उदारमतवादी लोकशाहीचा बळी पडेल. भारताच्या व्यवस्थेत दोन प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. भारताची संकल्पना मान्य करणारे राजकीय पक्ष बहुसांस्कृतिकता व अनेकतेत एकता शोधण्याचा प्रयत्न करतात; तर इतर पक्ष भारतीय लोकशाही एकाच प्रभावी संस्कृतीचा आविष्कार मानण्याचा आग्रह धरतात. ‘हिंदुत्व’ म्हणजेच ‘राष्ट्रवाद’ असे म्हणण्यापर्यंत मजल जाते! अर्थात, त्याच्या बिगर-हिंदू घटकांवर (अल्पसंख्याक) होणाऱ्या परिणामांमुळे उदारमतवादी लोकशाही संकुचित होणार, हे उघड आहे.

खरे तर ‘भारत एक कल्पना’ या अर्थाने काँग्रेस या राजकीय पक्षाची उत्क्रांती झाली. साहजिकच काँग्रेस पक्ष मूलतः उदारमतवादी लोकशाहीचा समर्थक आहे. पण आता होता, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. सत्ता, उपकार व मत्ता यांच्या प्राप्तीची वाट, असे सध्या काँग्रेस पक्षाचे स्वरूप दुर्दैवाने झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने (काळाच्या ओघात त्यातून विभक्त झालेल्या अनेकांना पुन्हा संमीलित करून) आता पुन्हा उदारमतवादी लोकशाही हा जैविक घटक असणाऱ्या भारत या संकल्पनेचा पाठपुरावा केला पाहिजे. हा बदल विश्‍वासावर आधारित पाहिजे, सोयीवर नव्हे! या दोन्हीतील फरक आता मतदार ओळखू लागले आहेत.

उपरोक्त बदल प्रथमप्राधान्य आहे. त्यापाठोपाठ क्रम येतो पक्षांतर्गत लोकशाहीचा. उदारमतवादी लोकशाहीशी पक्षांतर्गत हुकूमशाही किंवा सरंजामशाही सुसंगत नाही. पुन्हा एकदा काँग्रेस ही एक लोकचळवळ झाली पाहिजे. फक्त निवडणुकीसाठी ‘हात’ दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा वर्षाचे ३६५ दिवस समाजाचे, सामान्य लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वत्र गावोगाव, गल्लीगल्लीत, लोकसमूह ते लोकसमूह असे सातत्यपूर्ण विधायक पद्धतीने कामाच्या माध्यमातून पोचले पाहिजे. राज्य व लोकांमधील मध्यस्थीचे साधन म्हणून काँग्रेस पक्षाने काम केले पाहिजे. सोशल मीडियाच्या आधुनिक आविष्कारातून लोकसंपर्काचे, प्रचाराचे, प्रबोधनाचे, प्रभावाचे सातत्य ठेवले पाहिजे. भ्रामक प्रचाराच्या निष्प्रभीकरणाचाही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

काँग्रेसने आपल्या पुनर्निर्माणासाठी विविध उपाययोजनांचे संतुलित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातूनच सत्तेवर पुन्हा येऊ शकणारा एक सक्षम विरोधी पक्ष उत्क्रांत होऊ शकतो.

Web Title: Movement can give boost to Congress