न सुटलेली कोडी

mrunalini chitale
mrunalini chitale

एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यांनी हे काम या क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवलं नाही. कुपोषण, बेरोजगारी, सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, सक्तीचे धर्मांतर, वनतस्करी अशा अनंत प्रश्नांना भिडून ते सोडविण्यासाठी ते अथक परिश्रम करत आहेत. चाफेकरांच्या कामाचा आवाका असाच थक्क करणारा. त्यांनी स्थापन केलेल्या ‘जाणीव’ आणि ‘वंचित विकास’ या संस्थांद्वारे भटके आणि विमुक्त, आदिवासी, हातगाडीवाले, फेरीवाले, दलित, गरीब शेतकरी, परित्यक्ता, वेश्‍यायांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले. व्याख्यानं, पथनाट्यं, अभ्यासवर्ग यांच्या निमित्तानं अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. कुणीही नतमस्तक व्हावं असं यांचं कार्य. त्यांच्याविषयी कुतूहल जागं झालं ते त्यांना लहानपणापासून असलेल्या आजारांविषयी ऐकून. डॉ. कोल्हे हे हृदयविकाराचे रुग्ण. हा मुलगा फार काळ जगू शकणार नाही, असं डॉक्‍टरांनी केलेलं निदान. सततच्या रुग्णालयाच्या फेऱ्या.

चाफेकर हे लहानपणापासून मधुमेह आणि मणक्‍याच्या विकारानं त्रस्त. सर्दी, ताप, कानदुखी नेहमीची. आजारपणानं दोघांचंही बालपण आणि तारुण्य झाकाळून टाकलं. परंतु, त्यामुळे झोकून देऊन सामाजिक काम करण्याची त्यांची आच मात्र कमी झाली नाही. काम करताना त्यांनी ना कधी खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळल्या की पथ्यपाणी. मिळेल त्या वाहनानं तर कधी चक्क पायी प्रवास करताना अनेकदा उपास घडायचे, तर कधी कमरेचे काटे ढिले पडायचे. कधी मनुष्यस्वभावाचे विदारक अनुभव वाट्याला यायचे, तर कधी टळटळीत अपयश पदरी पडायचे. अनंत प्रकारचे मानसिक ताण आणि ताणामुळे वाढावेत असे आजार सोबतीला असताना या आजारांना काबूत ठेवण्याचं कसब त्यांनी कसं कमावलं असेल? जन्माला येतानाच ते अपराजित वृत्ती घेऊन आले असतील की नानाविध अनुभवांतून तावूनसुलाखून निघताना एका अबोध क्षणी ती आतून उमलून आली असेल? त्यांच्या अंतरंगात वाहणारा करुणेचा झरा इतका खळाळता असेल का, की शारीरिक व्याधींचा बांध त्याला रोखू शकला नसेल? कोल्हे आणि चाफेकर यांची जीवनशैली आणि त्यांचे आजार यांचं समीकरण वैद्यकशास्त्राच्या चौकटीत मांडणं अवघड. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं तर कोड्यात टाकणारं. पण अशी न सुटलेली कोडी आयुष्याच्या गणिताची मात्र वेगळीच रीत शिकवून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com